अँड्रॉईड वापरताय? मग या ५ गोष्टी माहीतच हव्यात!

सामना ऑनलाईन । मुंबई

सध्याचं युग हे अँड्रॉईडचं युग आहे. हातातले फक्त बोलण्याच्या कामी उपयोगी असलेले फोन्स स्मार्ट झाले आणि सगळं जगच बदलून गेलं. या स्मार्टफोनमुळे जग स्मार्ट झालेलं असलं तरी अशाही अनेक गोष्टी आहेत ज्या स्मार्टफोनधारकांना माहीतही नसतात. आज आम्ही अशाच पाच फीचर्सची माहिती तुम्हाला देणार आहोत.

१. मॅग्निफिकेशन जेश्चर
या फीचरला ऑन केल्यानंतर तुम्ही कधीही डिस्प्ले मोठा करून पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर तीन वेळा टॅप करावं लागेल. त्यानंतर स्क्रीनवर असलेला कोणताही मजकूर किंवा चित्र मोठं दिसायला लागतं. तसंच मोठा झालेला मजकूर किंवा चित्र ड्रॅग करून तुम्ही पूर्णपणे वाचू शकता. हे फीचर ऑन करण्यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये अॅक्सेसिबिलिटी फीचरवर जावं लागेल.

२. टेक्स्ट टू स्पीच
या फीचरला ऑन केल्यानंतर तुमच्या फोनवर दिसणाऱ्या कोणत्याही मजकुराला तुम्ही ऐकू शकता. हे फीचर तुमच्या फोनच्या डिस्प्लेवर दिसणाऱ्या मजकुराला ऑडिओमध्ये कन्व्हर्ट करतो. उदा. जर तुम्ही कामात गढलेले आहात आणि त्याच वेळी एखादा महत्त्वाचा मेल किंवा बातमी वाचायची असेल तर हे फीचर तुम्हाला तो मेल किंवा बातमी वाचून दाखवेल. हे फीचरही तुम्हाला अॅक्सेसिबिलिटीमध्ये मिळू शकेल.

३. इन्व्हर्ट कलर
या फीचरमध्ये तुम्ही फोनचा बॅकग्राऊंड कलर बदलू शकता. अॅक्सेसिबिलिटीमध्ये जाऊन व्हिजन या पर्यायावर क्लिक केल्यास तुम्ही हे फीचर अॅक्टिव्हेट करू शकता.

४. टॉकबॅक
जर तुमची नजर कमजोर असेल किंवा चश्मा लावला नसेल तर हे फीचर तुम्हाला मदत करू शकतं. अँड्रॉईड फोनमध्ये टॉकबॅक हे फीचर ऑन केल्यानंतर तुम्ही जेव्हा कधी फोनच्या डिस्प्लेला टच कराल तेव्हा फोन तुम्हाला नेमकं कोणत्या फीचरला टच केलं आहे ते सांगेल. हे फीचरही अॅक्सेसिबिलिटीमध्ये जाऊन ऑन करता येईल.

५. इंटरॅक्शन कंट्रोल
या फीचरच्या साहाय्याने तुम्ही फोनच्या एका विशिष्ट टच फीचरला ब्लॉक करू शकता. उदा. जर तुम्हाला नोटिफिकेशन बारवर जर एखाद्या टच फीचरने काम करू नये, असं वाटत असेल तर इंटरॅक्शन कंट्रोलच्या साहाय्याने तुम्ही ते ब्लॉक करू शकता.