भूल दे…

सामना प्रतिनिधी । मुंबई

वैद्यकीय क्षेत्रात भूलतज्ञ होणे मोठे जबाबदारीचे काम. ही एक चांगली करीयरची संधी आहे. अनेस्थेशिया म्हणजे भूल देणे. भूलतज्ञ ही वैद्यकशास्त्रातील विशेष शाखा. रुग्णाच्या शारीरिक स्थितीचा अभ्यास करून शस्त्रक्रिया योग्य प्रकारे होण्यासाठी भूलतज्ञांची गरज असते. एखाद्याची दाढ काढायची असो किंवा अवयव प्रत्यारोपणासारखी गुंतागुतींची शस्त्रक्रिया असो, त्यासाठी भूल देणे गरजेचे असते. शस्त्रक्रियेदरम्यान वेदना जाणवू न देणे, शरीरक्रियांवर योग्य नियंत्रण ठेवताना शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला पूर्ववत करणे हे महत्त्वाचे कामही भूलतज्ञ करतात.

शस्त्रक्रियेपूर्वी, दरम्यान आणि नंतरही भूलतज्ञ रुग्णासोबत असल्याने त्यांना रिऑपरेटिव्ह ‘फिजीशियन’ म्हटले जाते. भूलतज्ञांची भूमिका ही केवळ अतिदक्षता विभागापुरती मर्यादित राहत नाही, तर वेदनाशामक, रुग्णाला पूर्वस्थितीत आणण्यासाठी आणि शस्त्रक्रियेदरम्यानही अत्यंत महत्त्वाची ठरते. शस्त्रक्रिया लहान-मोठी असली तरी त्यासाठी द्यावी लागणारी भूल ही कमी किंवा जास्त प्रमाणात नसून प्रत्येक वेळी ती देताना पूर्ण अभ्यास करावाच लागतो. सध्याच्या स्पेशलायझेशनच्या युगात सर्जरीप्रमाणेच भूलतज्ञांमध्येही विशेषज्ञ असतात. बऱ्याचशा शासकीय, निमशासकीय रुग्णालयात भूलतज्ञांची गरज भासते.

आवश्यक गुण
– शरीरावरील लहानशा भागातही शस्त्रक्रिया असली तरी त्यादरम्यान हृदयाचे ठोके, रक्तदाब, शरीराचे तापमान, रक्तशर्करा, मूत्राचे प्रमाण आदी अत्यंत महत्त्वाच्या शरीरक्रिया सुरू राहणे आवश्यक असते. त्यांचेही व्यवस्थापन भूलतज्ञांमार्फत केले जाते.
– शस्त्रक्रियेचा प्रकार आणि रुग्णाची शारीरिक स्थिती यावर धोका अवलंबून असतो. यामुळे कधीकधी गुंतागूत निर्माण होऊ शकते. मात्र योग्य पूर्वतयारी, सावधानता आणि समयसूचक व्यवस्थापन हे गुण भूलतज्ञांकडे असल्यास धोका टाळता येतो.

पात्रता
– विज्ञान शाखेत बारावीनंतर भौतिक, रसायन, जीवशास्त्र्ा आणि गणित या विषयांत उत्तीर्ण होणे महत्त्वाचे आहे.
– मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस ही पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे.
– एनईईटी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. (मेडिकल एन्ट्रन्स एक्झाम)
– ऍनस्थेटिस्ट आणि ऍनेस्थिओलॉजिस्ट ही पदवी प्राप्त करता येते.
– डिप्लोमा इन ऍनस्थेशिया
– बीएससी इन ऍनस्थेशिया हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम
– बीएससी ऍनस्थेशिया टेलॉजी
– बीएससी अनस्थेशिया आणि ऑपरेशन थिएटर टेक्स, बीएससी मेडिकल टेलॉजी
– डॉक्टर ऑफ मेडिसिन इन ऍनस्थेशिया
– डॉक्टर ऑफ मेडिसिन इन ऍनस्थेशियोलॉजी
– पदवीनंतर डिप्लोमा इन ऍनस्थेशिया हा २ वर्षांचा कोर्सही उपलब्ध आहे.