कार्यालयात घुसून अंगडियाला लुटले


सामना प्रतिनिधी । मुंबई

भुलेश्वर येथील एका अंगडियाच्या कार्यालयात घुसून चौघा अज्ञात इसमांनी लुटमार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी चॉपर आणि पिस्तुलाचा धाक दाखवत कार्यालयातील १४ लाख ४० हजारांची रोकड आणि तीन मोबाईल लुटून नेले. याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

भुलेश्वरच्या पुंभार टुकडा परिसरात राहणाऱया प्रकाश मंडल या अंगडियाचे कार्यालय आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मंडल रोकड घेऊन कार्यालयात आले होते. ते कार्यालयात असताना ५ वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात इसम कार्यालयात घुसले आणि त्यांनी प्रकाशला चाकू आणि पिस्तुलाचा धाक दाखवत १४ लाख ४० हजारांची रोकड व तीन मोबाईल असा १४ लाख ५८ हजार किमतीचा ऐवज हिसकावून लगेच पळ काढला. याप्रकरणी प्रकाश मंडल यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात चार लुटारूंविरोधात दरोडय़ाचा गुन्हा दाखल केला आहे.