मानधन वाढीसाठी अंगणवाडी सेविकांचे राज्यभर ‘जेल भरो’

सामना प्रतिनिधी । मुंबई

मानधनवाढीसाठी अंगणवाडी सेविकांनी राज्यभर पुकारलेल्या आंदोलनानंतरही त्यांच्या मानधनवाढीचा विषय सरकारने गांभीर्याने घेतलेला नाही. उलट अंगणवाडी सेविकांनी त्यांना दीड हजार मानधन देऊनही संप मागे घेतलेला नाही. हे चुकीचे असून उर्वरित अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तातडीने संप मागे घेऊन सेवेवर रुजू व्हावे, असे आवाहन महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.

अंगणवाडी सेविकांना मागील तीन वर्षांत दोन वेळा मानधनवाढ केली आहे. २०१४-१५ मध्ये २८९ कोटी रुपयांची तर आता साधारण ३६३ कोटी रुपयांची ऐतिहासिक मानधनवाढ केली आहे. नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार रुपयांची मानधनवाढ करण्यात आली आहे. त्यांच्या एकूण मानधनाच्या ३० टक्के इतकी ही वाढ आहे. यापूर्वी एका वेळेस इतकी मानधनवाढ कधीही देण्यात आली नव्हती. याशिवाय भाऊबीजही दुप्पट करण्यात आली आहे. शासन सकारात्मक असून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन व इतर मागण्यांबाबत भविष्यात अजूनही निर्णय घेण्याबाबत शासन पूर्ण सकारात्मक आहे. पण आत्ताच मानधनवाढ दिली असताना ती मान्य न करता अधिक मानधनवाढीसाठी बालकांना वेठीस धरणे चुकीचे आहे. हे कोणत्याही प्रकारे समर्थनीय नसून उर्वरित अंगणकाडी कर्मचाऱ्यांनी तातडीने संप मागे घेऊन सेवेवर हजर व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

जेलभरोसारखे आंदोलन चुकीचे
अंगणवाडी सेविका करीत असलेल्या आंदोलनालाही प्रशासनाने चुकीचे ठरवलेले आहे. आपल्या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जेलभरोसारखे आंदोलन करणे चुकीचे व बेकायदेशीर असून शासकीय कर्मचाऱ्यांकडून अशी कृती कोणत्याही प्रकारे स्वीकारार्ह नाही, असे एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे आयुक्त कमलाकर फंड यांनी कळविले आहे. आंदोलनकाळात शासनाचे मुख्यमंत्री, मंत्री यांच्याकर वैयक्तिक शेरेबाजी करणे, व्यंगचित्रे – फलक याद्वारे त्यांची वैयक्तिक बदनामी करणे, पुतळे जाळणे हेही चुकीचे आहे. अशी कृती केल्यास शासनाकडून त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.