विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे ओरोस येथे जेलभरो आंदोलन

2

सामना प्रतिनिधी, सिंधुदुर्गनगरी

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केवळ आश्वासने देऊन वारंवार चकवा देणाऱ्या सरकारला वठाणीवर आणण्यासाठी आणि मानधनवाढ व भरती प्रक्रिया तात्काळ सुरू व्हावी या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सभेच्यावतीने आज ओरोस येथील रवळनाथ मंदिर येथे “जेलभरो” आंदोलन छेडण्यात आले. तसेच मागण्या मान्य न झाल्यास 25 फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशाराही शासनाला दिला आहे.

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधन्यासाठी महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जनरल सेक्रेटरी कमल परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ओरोस श्री देव रवळनाथ मंदिर येथे जेलभरो आंदोलन केले. यावेळी दिपाली पठानी, शालिनी तारकर, कुंदना कावळे, गुलाब चव्हाण, अर्चना गांधी, गीतांजली परब, रोहिणी लाड, कांचन शेणई, स्वाती पोयेकर, मंगल राणे यांच्यासह हजारोंच्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ देण्यासंदर्भात शासन निर्णय होऊनही त्याची अमलबजावनी केली जात नाही. अंगणवाड्यांसाठी सुरू केलेल्या अंब्रेला योजनेखाली मंजूर केलेले 10 हजार रुपये कोठे गेले याचा पत्ता लागत नाही. गरजूंसाठी 3 हजार रूपये देण्याचे शासनाने जाहीर केले होते. मात्र अद्यापही त्याबाबत कार्यवाही केली जात नाही. यासह अनेक आश्वासने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने दिली आहेत. मात्र अद्याप आश्वासनांची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे केवळ आश्वासने देऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना चकवा देणाऱ्या सरकार ला वठणीवर आणण्यासाठी आणि आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सभेच्यावतीने ओरोस श्री देव रवळनाथ मंदिर येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले.

हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अटक
आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधन्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने छेडलेल्या जेलभरो आंदोलनात जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोलीसांनी अटक केलि व त्यांना समज देऊन त्यांची सुटका केली.

गगणभेदी घोषणांनी परिसर दणाणला!
जेलभरो आंदोलना दरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी हमारी ताकद हमारी यूनियन, हम सब एक है, आमच्या मागण्या मान्य करा, अंगणवाडी कर्मचारी सभेचा विजय असो, ए शासको होश में आव, कमलताई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है आदि गगणभेदी घोषणा देत येथील परिसर दणाणून सोडला.

…..अन्यथा 25 फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर जाणार!

आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज राज्यभर जेलभरो आंदोलन केले आहे. हे आंदोलन एक झलक आहे. मात्र शासनाने लवकरच मागण्या मान्य केल्या नाहीत तर 25 फेब्रुवारीपासून अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा ईशाराही यावेळी कमल परुळेकर यांनी दिला आहे.

या आहेत प्रमुख मागण्या
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी, हरियाणा, केरळ, दिल्ली आदिप्रमाने महाराष्ट्रातही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 12 हजार रुपये मानधन देण्यात यावे, सेवा समाप्तीचा लाभ 1 लाखवरून 3 लाख करण्यात यावा, पेन्शन मिळावी, कर्मचारी भरती तत्काळ सुरू करावी, टीएचआर ऐवजी पोषण आहार दयावा, पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावा, अतिरिक्त कामाचा मोबदला दयावा आदि मागण्या करण्यात आल्या आहेत.