अंगणवाडी सेविकांचा संप मागे

सामना ऑनलाईन, मुंबई

राज्यभरातील दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविकांनी पुकारलेल्या संपाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाम पाठिंबा दिला. अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी उभे राहत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत अंगणवाडी सेविकांना मानधनवाढ झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एमएमआरडीए कार्यालयात अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची बैठक बोलावून अंगणवाडी सेविकांचे मानधन सेवाज्येष्ठतेनुसार १५०० रुपयांपासून १८०० रुपयांपर्यंत वाढविण्याचे त्याचप्रमाणे पुढील आर्थिक वर्षापासून पाच टक्के पगारवाढ देण्याचे मान्य केले. यामुळे राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचा संप मागे घेत असल्याची घोषणा कृती समितीने करीत शिवसेनेचे आभार मानले.

अंगणवाडी सेविकांना आपल्या मानधनवाढीसह अन्य मागण्यांसाठी   २७ दिवस आंदोलन पुकारले. आंदोलनादरम्यान अंगणवाडी सेविकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी आझाद मैदान येथील मोर्चात येऊन जाहीर पाठिंबा दिला. जोपर्यंत न्याय  मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवा, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे असे ठाम आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यानुसार अंगणवाडी सेविकांनी आंदोलन सुरूच ठेवत राज्यभरात जेल भरो आंदोलन पुकारले.  याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर घ्यावी लागली. आज सायंकाळी अचानक एमएमआरडीए कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले. यावेळी झालेल्या बैठकीत अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढविण्याबाबत सरकार सकारात्मक असून त्यांचे मानधन पाच हजार रुपयांवरून सेवाज्येष्ठतेनुसार १५०० ते १८०० रुपयांपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्याचप्रमाणे पुढील आर्थिक वर्षापासून पाच टक्के वाढ देण्यात येणार असल्याचेही त्यांनी आश्वासन दिले.

आधी देण्यात आलेल्या मानधन वाढीमुळे ३११ कोटींचा बोझा पडणार होता. मात्र, आता दिलेल्या मानधन वाढीमुळे ३५१ कोटींचा बोझा सरकारच्या तिजोरीवर पडेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पुढील वर्षापासून मानधन ५ टक्के वाढणार

वर्ष                   मानधन

०-१०                ६५०० रु.

१०-२०               ६६९५ रु.

२०-३०               ६७६० रु.

३० वर्षांवर          ६८२५ रु.

शिवसेना पक्षप्रमुखांचे आभार

अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला पाठिंबा दिला. दैनिक ‘सामना’मधून आमच्या मागण्या मांडण्यात आल्या. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे ठामपणे आमची मागणी लावून धरली. यामुळे मागण्या मान्य करून घेण्यात मोठी मदत झाली. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेनेचे आभार मानत असल्याचे कृती समितीचे निमंत्रक एम. ए. पाटील यांनी सांगितले.