काम करूनही पगार मिळत नसल्याने अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

सामना ऑनलाईन,जिंतूर

महिनाभर आंदोलन केले, सरकारपुढे गाऱ्हाणे मांडले. पण काहीही उपयोग झाला नाही. काम करूनही पगार मिळत नसल्यामुळे आज एका अंगणवाडी सेविकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना परभणी जिल्हय़ात घडली. आत्महत्या करण्यापूर्वी या अंगणवाडी सेविकेने एक चिठ्ठी लिहून ठेवली असून प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराचा त्यात पंचनामाच केला आहे.

गेल्या महिन्यातच अंगणवाडी सेविकांनी मुंबईत आझाद मैदानावर आपल्या विविध मागण्यांसाठी रेकॉर्डब्रेक आंदोलन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांनीच मध्यस्थी केल्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या काही मागण्या मार्गी लागल्या आणि आंदोलन थांबले. एवढे मोठे आंदोलन झाल्यानंतर तरी सरकारला दया येईल अशी अंगणवाडी सेविकांची अपेक्षा मात्र फोल ठरली. याच वैफल्यातून आज जिंतूर तालुक्यातील बोर्डी येथील अंगणवाडी सेविका सुमित्रा राखोंडे यांनी घरी गळफास घेतला. नांगणगाव येथे त्या अंगणवाडी चालवत होत्या.

व्यवस्थेने घेतलेला बळी

सुमित्रा राखोंडे यांची आत्महत्या हा व्यवस्थेने घेतलेला बळी असल्याचा आरोप शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. पगार मिळत नाही आणि आता ‘पीआरसी’ पथकामार्फत जुने रेकॉर्ड दाखवण्यासाठी येत असलेला दबाव यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड दहशत आहे. या धास्तीपोटी सुमित्राबाईंनी आत्महत्या केली असे त्या म्हणाल्या.

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या

राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाने सुमित्रा राखोंडे यांचा बळी घेतल्याचा आरोप अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे नेते दिलीप उटाणे यांनी केला. राज्यातील ६५ हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पाच महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. पीएफएमएस प्रणालीमुळेही त्रास होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मानधन देण्यात दिरंगाई करणाऱया अधिकाऱयांकिरोधात मनुष्यकधाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी अंगणकाडी कर्मचारी कृती समिताने केली आहे.

ऑनलाइन आणि डिजिटल इंडियाचा बळी

अंगणकाडी सेकिका सुमित्रा राखोंडे हिची आत्महत्या नसून शासनाने केलेली डिजिटल हत्या आहे. शासनाला जाब विचारलाच पाहिजे. १० वर्षांची सर्क रजिस्टर्स एकत्रित देण्याची जबरदस्ती करणाऱयांवर ३०६ चा गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नेत्या शुभा शमीम यांनी केली आहे.