अश्लील चित्रफीत बनवण्याचा धंदा माहीत झाल्याने सुपारी घेऊन अनिकेतची हत्या!

सामना ऑनलाईन । सांगली

चोरीचा बनाव करून पोलिसांनी अनिकेतला अटक केली असली तरी तो काम करीत असलेल्या ‘लकी बॅग’ या दुकानाचा मालक दुकानावरील दुसऱया मजल्यावर अश्लील चित्रफीत बनवण्याचा धंदा करत होता. हा प्रकार अनिकेतला माहीत झाल्यामुळे पोलिसांना सुपारी देऊन त्याची हत्या घडवून आणली, असा आरोप अनिकेतचा भाऊ अमित आणि पत्नी संध्या यांनी केला. बॅगच्या दुकानात उपनिरीक्षक कामटे याची ऊठबस होती, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, या प्रकरणातील पोलीस हवालदार अनिल लाड याला आज न्यायालयाने २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली.

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाचे पडसाद आज तिसऱया दिवशीही उमटले. शेतकरी संघटनेने जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांचा पुतळा जाळला, तर दलित महासंघाने युवराज कामटेच्या प्रतीकात्मक पुतळय़ाची धिंड काढली. जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी तातडीने कायदा व सुव्यवस्थेचा आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हेही उपस्थित होते. बैठकीला अतिरिक्त पोलीस अधिकारी शशिकांत बोराटे, अप्पर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.

‘डीएनए’ चाचणी न झाल्यामुळे मृतदेह सोपवला नाही
आंबोली परिसरातून अनिकेतचा मृतदेह आज सांगली येथील सरकारी रुग्णालयात आणण्यात आला. मात्र, अद्याप ‘डीएनए’ चाचणी करायची बाकी असल्यामुळे मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आलेला नाही. ‘डीएनए’ चाचणीची प्रक्रिया पार पाडल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.