सगळय़ांशी गोड बोलणं हीच प्रार्थना! – अनिल गवस

अभिनेता, दिग्दर्शक अनिल गवस यांना माणसामध्येच देव दिसतो.

देव म्हणजे ? – देव ही संकल्पना व्यक्तिसापेक्ष आहे. माणसातल्या माणुसकीत मी देव बघतो. आई-वडील, निसर्ग माझ्यासाठी देव आहेत. जे लोक दुसऱयांसाठी राबतात ते आपल्यासाठी देव आहेत.

आवडते दैवत – गणपतीची मूर्ती आवडते.

धार्मिक स्थळ – कोणतंही नाही.

आवडती प्रार्थना – आपण लोकांबरोबर छान बोलतो. ती प्रार्थनाच आहे. सगळ्यांशी गोड बोलणं हीसुद्धा प्रार्थना

देवाचं आवडतं गाणं – देव देव्हाऱयात नाही…

धार्मिक साहित्य कोणतं वाचलंय का ? – मला त्याची गरज वाटत नाही. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं हाच अध्यात्माचा शेवट आहे. माणुसकी हा धर्म मानावा हे मी मानतो. मी माणसं वाचतो. स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे माणसं वाचू शकतो. यामुळे आलेल्या चांगल्या अनुभवांचा इतरांनाही फायदा व्हावा यासाठी प्रयत्न करतो. आज आपल्या देशात ज्या वाईट घटना घडतात त्या प्रामाणिकपणा नसल्यामुळे घडत आहेत असे मला वाटते.

आवडता रंग – आकाशी

अशी गोष्ट जी केल्यावर समाधान मिळतं – दुसऱयाचं दुःख कमी केलं, त्यांना मदत-परोपकार, माझ्यातील चांगल्या गोष्टी इतरांना शिकवल्या की समाधान मिळतं.

दुःखी असता तेव्हा… – आयुष्यात कधी दुःखी होतच नाही. मी खूप सकारात्मक माणूस आहे. माझ्याकडून दुसऱयांसाठी काय करू शकेन ते करतो.

नास्तिक लोकांबद्दल काय सांगाल? – नास्तिक, आस्तिक या दोन्ही गोष्टींचा जगण्याशी दुरान्वयानेही संबंध नाही असे मी मानतो.

देवभक्त असावं पण देवभोळं नसावं… तुमचं मत काय ?- देवभक्त असणं वाईट नाही, पण देवभोळं नसावं.. मुळात दोन्हीही नसावं. कारण दोन्हीचा अर्थ एकच आहे असं माझं म्हणणं आहे.

इच्छा पूर्ण होण्यासाठी नवस करता का? – नवस दैववादी आहे, मी कर्मवादी आहे. माझी लायकी नसतानाही आज मला सगळं मिळालंय.

अभिनय आणि भक्तीची सांगड कशी घालता? – भक्तीचा अर्थ व्यापक आहे. तो देवाशी जोडला तर ती देवभक्ती होते. जीवन जगण्यालाही भक्तीची गरज असते. आपण जगतो तोही एक अभिनयच आहे.

मूर्तिपूजा महत्त्वाची वाटते की प्रार्थना ? – याची गरज जे मानसिकदृष्टय़ा कमकुवत आहेत त्यांना आहे. ज्ञान आणि अनुभवाच्या बळावर तुमचा कमकुवतपणा दूर होतो. आयुष्यात वाईट होऊन होऊन काय होईल तर मृत्यू होईल. यापलीकडे काही होत नाही. मृत्यूला जे घाबरतात ते यामध्ये अडकतात असं मला वाटतं.