मी उषा नाडकर्णींकडे भाऊबीजेला जाणार नाही – अनिल थत्ते

3

सामना ऑनलाईन । मुंबई

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात अभिनेत्री उषा नाडकर्णी व पत्रकार अनिल थत्ते यांच्यात सतत खटके उडायचे. मात्र त्यातही आमचे नाते हे भाऊ बहिणीसारखे असून मी भाऊबीजेला उषा नाडकर्णी यांच्याकडे जाणार असल्याचे थत्ते यांनी जाहीर केले होते. मात्र उषा नाडकर्णी या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी प्रत्येक मुलाखतीत अनिल थत्ते यांच्यावर टीका केल्याने आता अनिल थत्ते यांनी त्यांच्या घरी न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

‘जर “आऊ” मला मानायला तयार नाहीत .. “भाऊ” ..तर मी भाऊबिजेला जाऊन अपमान कशाला करून घेऊ ?’ अशा मिश्कील शब्दात थत्ते यांनी ते उषा नाडकर्णी म्हणजेच आऊ यांच्याकडे भाऊबिजेला जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. ‘उषा नाडकर्णी यांना मी बहिण मानले सर्वांसमोर जाहीर केल्याप्रमाणे मी भाऊबिजेला त्यांच्याकडे जाणार होतो. मात्र त्यांनी प्रत्येक मुलाखतीत मला शिव्यांची लाखोली वाहिली आहे. मकरंद अनासपुरे यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी माझे नाव घेतल्यावर त्यांनी चक्क चप्पल काढून मारण्यासाठी उगारून दाखवली. या पार्श्वभूमीवर उषा नाडकर्णी यांच्याशी मी मानीत असलेले “बहीण भावाचे” नाते निरर्थक आणि एकतर्फी ठरते. त्यामुळे मी भाऊबिजेसाठी उषा नाडकर्णी यांच्याकडे जाणार नाही’ असे थत्ते यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.