दत्तक विधान

आसावरी जोशी,[email protected]

चिन्मयी, सुमित राघवनने नुकतीच एक कन्या दत्तक घेतली आहे. बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातून… ही कन्या म्हणजे 9 महिन्यांचे बिबटय़ाचे पिल्लू तारा… पाहूया ही निरपेक्ष प्रेमाची देवाणघेवाण…

शहरी माणसांना, मनांना हिरवाई… निसर्ग नेहमीच अपूर्वाईचे असते… जोडून सुट्टी आली किंवा अन्य संधी उपलब्ध होताच मुंबईकरांची पावले आपसूक सह्याद्रीच्या वाटा शोधू लागतात. सह्याद्रीच्या वाटा नेहमीच भरभरून देणाऱया… इतिहास… शौर्य मनावर पुनःपुन्हा ठसविणाऱया… पण काही अरण्यवाटा आपल्या मुंबईनगरीतही सापडतात. पण अज्ञानामुळे म्हणा किंवा ‘पिकतं तिथे विकत नाही’ या तत्त्वानुसार आपल्या उद्योगनगरीतील जंगलांकडे आपलं बऱयाचदा दुर्लक्ष होतं.

जंगल प्रत्येक ऋतूत सुंदर दिसतं… हा प्रत्यय बोरिवली पूर्वेला असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बाबतीत नेहमीच येतो. हे कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आलंय. मुंबईकर बिबटय़ांचे हे हक्काचे घर. या घरातील नऊ महिन्यांच्या ताराचे ग्लॅमरस दत्तकविधान झाले आहे. चिन्मयी आणि सुमित राघवन. चित्रपट-नाटय़सृष्टीतील एक समंजस, सुजाण दांपत्य. अभिनय हा पिंड असला तरी ज्या समाजात, निसर्गात आपण राहातो त्याचं काही अंशी तरी देणं लागतो ही जाणीव या दोघांनाही बऱयापैकी आहे. या जाणिवेतूनच सध्या फक्त एक वर्षासाठी राष्ट्रीय उद्यानातील छोटीशी तारा, तारा सुमित राघवन झाली आहे. त्यामुळे ताराच्या भोवती सध्या छानसं ग्लॅमर खेळतं आहे.

tgiger-pp

तारा आणि सूरज

नगर येथील एका गावाच्या उसाच्या शेतात ताराचा आणि तिचा भाऊ सुरजचा जन्म झाला. ऊसतोडणीच्या वेळी माणसांना पाहून बिथरलेली त्यांची आई या दोन पिल्लांना तेथेच टाकून पळून गेली. या पिल्लांना तीन दिवस त्याच ठिकाणी ठेवून त्यांच्या आईची प्रतीक्षा केली गेली. पण ती आई तेथे फिरकलीच नाही. त्यामुळे ही दोन्ही बाळं मुंबईवासी झाली. अगदी अशक्त झालेली ही पिल्लं मुंबईचा पाहुणचार घेऊन आता मस्त उद्यानात खेळतात…

वाईल्ड फॅमिली

येथे चिन्मयी सुमित सांगते की, आम्ही खऱया अर्थाने आता वाईल्ड फॅमिली झालो आहोत. तेव्हा सुमित एका समाजसेवी संस्थेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत होता. तेव्हाच तो नद्यांच्या बाबतीतील कार्य पाहून प्रभावित झाला होता. याच संस्थेने आम्हाला बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात येण्याचे निमंत्रण दिले. आम्ही जरी शहरात राहत असलो तरी निसर्गाची, अरण्याची ओढ आमच्या पूर्ण कुटुंबालाच आहे. आम्ही उद्यानात शिरलो आणि अक्षरशः तिथलेच झालो. मुंबईचे एक वेगळे दर्शन आम्हाला होत होते. चिन्मयी भरभरून सांगत होती.  आमची मुलं तर पुरती तिथे रमली होती.

चिन्मयी म्हणाली, अभयारण्यात शिरल्यावर आम्ही बिबटय़ांच्या अधिवासात गेलो आणि ताराशी पहिली भेट आमच्या दियाशी झाली. तिच्या पिंजऱयाजवळ गेल्यावर छोटीशी ताराही आम्हाला लगेच सामोरी आली. अगदी सहजपणे तिने दियाच्या हातावर पंजा ठेवला आणि ओळख करून घेतली. तिच्या डोळ्यांत एक वेगळेच प्रेमळ भाव होते. येथील वनाधिकाऱयांनी आम्हाला त्यांच्या दत्तक योजनेविषयी माहिती दिली आणि दोन्ही मुलांनी त्या बछडय़ांना दत्तक घेण्याचा हट्टच धरला.

अर्थात हा निर्णय सुमित, चिन्मयीने अगदी तडकाफडकी घेतला नाही. घरी येऊन आम्ही त्यावर विचार केला आणि सर्वानुमते मुलगी घरात आणायचे ठरले. त्यानंतर काही दिवसांनी नाटक, चित्रीकरणातून सुमितला मोकळा वेळ मिळाला आणि त्याने राष्ट्रीय उद्यान गाठले व अर्ध्या तासात चिन्मयीला फोन आला की तारा आपली झाली. ताराच्या खाण्यापिण्याचा, औषधपाण्याचा एकूण वार्षिक खर्च 1 लाख 20 हजार रुपये सुमित आणि चिन्मयी करणार आहेत. शिवाय तिला त्यांना हवं तेव्हा भेटता येईल. तिची विचारपूस करता येईल. त्यांच्या नावाचा फलक तिच्या पिंजऱयाबाहेर लागलेला असेल.

येथे उद्यान प्रशासनाने सांगितले की, अत्यंत घडय़ाळाच्या काटय़ावर धावणारे मुंबईकर आणि त्यांच्याच अवतीभवती असलेले वन्यजीव यांच्यात आपुलकीचे नाते निर्माण व्हावे म्हणून ही दत्तक योजना आम्ही सुरू केली आहे. तसे पाहता प्रत्येक प्राणिसंग्रहालयात अशा प्रकारची योजना असतेच. पण ती योग्य पद्धतीने लोकांसमोर आणली जात नाही.

deer-2

 

वनचर आणि माणूस

आज मुंबईत आपण नेहमीच बिबटय़ा मनुष्य वस्तीत शिरल्याच्या बातम्या ऐकतो, वाचतो. खरे पाहता ते अतिक्रमण अगोदरच आपण त्यांच्यावर केलेले आहे. अर्थात हा एक लेखाचा स्वतंत्र विषय होईल. पण सामान्य माणूस आणि मुंबईतील वनचर यांच्यातील भावबंध दृढ होण्यासाठी हे एक चांगले पाऊल आहे.

मुळात वन्यप्राण्यांची काळजी घेणे हा एक खूप वेगळा अभ्यासाचा विषय आहे. मुळात हे राष्ट्रीय उद्यान मुक्त विहार करणाऱया बिबटय़ांचे घर आहे. या बिबटय़ांशी, इतर वन्य प्राण्यांशी नक्कीच या प्रकल्पातून सामान्य माणसाशी जवळीक वाढेल. या प्राण्यांची काळजी खूपच वेगळ्या पद्धतीने घेतली जाते. येथे वनाधिकाऱयांनी एक गमतीदार किस्सा सांगितला. माणसाची शिकार करून खाणं हे बिबटय़ांच्या किंवा अन्य वन्यप्राण्यांच्या ध्यानीमनीही नसतं. साधारणतः दीड ते दोन फुटांचे सजीव त्यांना आपल्या आवाक्यातील वाटतात. त्यांच्याशी ते संवाद साधण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यावेळेस भूक लागली असेल तर एवढय़ाच उंचीच्या सजिवाची शिकार करतात.

सध्या तारा आणि सुरज कोंबडी, अंडी यांचा आस्वाद घेताहेत. बाहेरील व्यक्तींपासून वन्यप्राण्यांना चटकन संसर्ग होतो. त्यामुळे जरी तारा सुमितची दत्तक कन्या असली तरी सुमितच्या कुटुंबीयांपैकी तिच्याशी थेट स्पर्शाच्या माध्यमातून संवाद साधू शकणार नाहीत. काही निर्बंध अर्थातच पाळावे लागतील. केवळ बिबटय़ाच नव्हे तर वाघ, सिंह, नीलगाय, भेकर, सांबर, चितळ हे वन्यजीवही दत्तक घेता येतील. अशा प्रकारे दत्तक घेण्यातून या वन्यजिवांचे जगणेही सामान्य माणसाला समजते. जाणून घेता येते.

स्वतःसाठी… स्वतःच्या कुटुंबासाठी… केवळ ‘स्व’च्या परिघात आपण नेहमीच जगत असतो. आनंदीही असतो. परोपकार करणे किंवा दान, मदत या संकल्पनाही माणसांच्या केवळ माणसांपुरत्याच अगदी घट्टपणे ठाम असतात. गरजू विद्यार्थी, निराधार स्त्रीया, अपंग, वृद्ध, आजारी यांना मदत करणे म्हणजेच सामाजिक कार्य ही एक माणसाने स्वतःच स्वतःला घालून घेतलेली मदतीची मर्यादा आहे. पण जरा मनाची कवाडं उघडून या मुक्या, निष्पाप जीवांकडे पाहूया… आपण त्यांना थोडंसं प्रेम दिलं तर त्यांच्या जिव्हाळ्याचं अख्खं भांडार ते आपल्यावर उधळतात… निरपेक्षपणे… थोडंसं या निसर्गावर… वन्यजिवांवरही प्रेम करून पाहूया…