प्रेम जिव्हाळा

योगेश नगरदेवळेकर

एकमेकांप्रति प्रेम भावना, आत्मियता, जिव्हाळा हा केवळ माणसांमध्येच नव्हे तर प्राण्यांमध्येही तितक्याच तीव्र असतात.

‘लळा जिव्हाळा शब्दच खोटे सगळी फसवी नाती’ असे माणसांच्या नात्यांबद्दल उद्वेगाने लिहिले असले तरी मानवी नात्यांतील आपलेपणा नेहमीच आढळून येतो. जनमानसात प्रेमभावना आढळून येते तशी प्राण्यांत पण असते का, हा प्रश्न प्राणीशास्त्रज्ञ नेहमीच पडतो.

कधी कधी प्राणी अतिशय विचित्र असे वर्तन करतात व असे प्रेम असते याचा प्रत्यय आणून देतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका कासवाची चर्चा जोरात चालू आहे. कासव म्हटले की संथपणा असेच आपल्या डोळय़ांसमोर येते. ससा- कासवाच्या शर्यतीतही कासव जिंकले ते केवळ ससा झोपला म्हणून. असे संथ चालणारे कासव वेगात चालून चालून चालणार किती. पण ‘फ्रेडी’ नावाच्या एका कासवाने एका दिवसात म्हणजे २४ तासांत चक्क १० कि.मी. अंतर कापले. या कासवाचे वय आहे ७० वर्षे आणि हे कुठल्या मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी नाही तर त्याच्या ‘एस्ट्रिड’ नावाच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी कासवमहाशय पळून गेले.

‘एस्ट्रिड’ आणि ‘फ्रेडी’ आधी एकत्र राहत होते. एका व्यक्तीने ‘फ्रेडी’ला विकत घेतल्याने त्यांची ताटातूट झाली. बरीच वर्षे मालकाकडे राहूनही फ्रेडी आपल्या मैत्रिणीला विसरला नव्हता. संधी मिळताच त्याने पळ काढला. शोधाशोध केल्यावर हे कासवबुवा आपल्या मैत्रिणीजवळ सापडले. यामध्ये त्याने लक्षात ठेवलेला रस्ता आणि झपाटय़ाने कापलेले अंतर हा संशोधनाचा विषय ठरले आहे.

मानवी मनात जसा केमिकल लोच्या होतो आणि प्रेमभावना जागृत होते तसा खरंच प्राण्यांमध्ये होते का हे गूढ आहे. पण बरेच प्राणी आणि पक्षी अशा प्रकारचा एकमेकांप्रति आपलेपणा दर्शवितात.

कुत्र्यांच्या एका जोडीमध्ये अशाप्रकारचे वर्तन आढळले आणि तो कौतुकाचा विषय झाला होता. दांडगा नर कुत्र्याचे पिल्लू त्याच्यासोबत राहणाऱया कुत्रीला सारखा त्रास देत असे. तिचे खाणे हिसकवून घेणे, तिच्या जागेवर झोपणे, नाना प्रकार. कालांतराने त्या कुत्रीच्या पायाला कॅन्सर झाला. त्याच्या प्रादुर्भावाने तिचा पाय कापावा लागला. या वेळेस मात्र त्या कुत्र्याचे तिच्याप्रति वर्तन बदलले. आपल्या वाटणीचा खाऊ तिला देणे, तिची मदत करणे. इतकेच नव्हे तर तीन पायांवर चालताना तिला आधार देणे यासारखे प्रेम पण तो दर्शवू लागला. ती स्वयंपूर्ण झाल्यावर मात्र त्याचा मूळ स्वभाव पुन्हा जागृत झाला.

आपल्या जोडीदाराला न विसरणे जसे कासवाने दर्शवले तसे अनेक पशुपक्षी आयुष्यभर एकाच जोडीदाराबरोबर राहतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे रामायणाच्या सुरुवातीलाच ज्या क्रौंच वधाचा उल्लेख आहे ते कौंच किंवा सारस पक्षी. हे पक्षी सायबेरियातून हिंदुस्थानात येतात. आयुष्यभर ते एकाच जोडीदाराबरोबर राहतात. जोडीदार गेल्यास ते त्याबद्दल दुःखभावना व्यक्त करतात.

मानवच आपल्या जोडीदाराप्रति प्रेमभावना ठेवतो असे नाही. मानवाला जवळचा मानला गेलेला ‘कपी गणातील’ ‘गीबन’ जातीच्या ‘कपी’मध्येही अशाप्रकारे प्रेमभावना आढळून येते. ‘दो हंसों का जोडा’ या गाण्यातील हंससुद्धा आयुष्यभराकरिता एकच जोडीदार निवडतात. अशाप्रकारे दीर्घकाळ एकत्र राहणाऱया जोडय़ांमध्ये गिधाडे आणि चक्क लांडग्यांचासुद्धा क्रम लागतो. आपण पिंजऱयात पाळलेल्या लव्ह बर्डस्मधला एक मेला तर दुसरा नाराज होतो किंवा उदास होतो हे अनुभवायला मिळते.