माझा खाऊ, मला द्या

भरत जोशी, वन्यजीव अभ्यासक

आपल्यापैकी प्रत्येकाची पचनशक्ती वेगळी असते. हे विधान केवळ माणसांपुरते मर्यादित ठेवले तर प्राण्यांची पचनशक्ती अर्थातच आपल्याहून वेगळी असते हे आपल्या सहजच लक्षात येईल. पण तरीही आपण माणसं आपलं खाणं अगदी सहजपणे पशुपक्ष्यांवर लादतो आणि त्यातही पुण्याचा शोध घेतो…

निसर्गातील वन्यजीवांमध्ये भक्ष्य आणि त्यांचे निसर्गातील शत्रू ही मालिका ठरलेली आहे. या निसर्गातील काटेकोर शृंखलेमध्ये माणूस उगीचच विनाकारण हस्तक्षेप करताना दिसतो. ‘बघा ना… सर्प, नाग यांचे भक्ष्य उंदीर, बेडूक, सरडे, पाली, पक्षी, पक्ष्यांची अंडी, त्यांची छोटी-मोठी पिले हे असतं, परंतु ते त्यांना न देता दूध पाजलं जातं, त्यांच्या तोंडात अंडं नळीद्वारा कोंबलं जातं. चिमटय़ाने तोंड उघडून मांसाचे लहान लहान तुकडे त्यांच्या तोंडात रेटले जातात आणि बोटांच्या सहाय्याने मानेपासून ते पुढेपर्यंत बोट घालून ते मांसाचे तुकडे पोटापर्यंत कृत्रिमपणे, बळजबरीने रेटले जातात. सर्पांचे भक्ष्य दूध नव्हे. कारण सर्प हे मांसाहारी आहेत. सर्प जिवंत भक्ष्याची शिकार करून भक्ष्य खातात. मांसाचे तुकडे नाही. हे सर्व बळजबरीने भरविल्यामुळे सापाला अपचन होते, त्या वन्यजीवाला न्यूमोनिया होऊन तो सर्प निसर्गातून नष्ट होत असतो.

विशेषतः प्राणी संग्रहालयात राष्ट्रीय उद्यानात पिंजऱयातील हरणे, सांबर, शहामृग, एकशिंग्या, चितळ इत्यादी प्राण्यांना येणारे पर्यटक त्यांच्याकडे जे खाद्य असेल ते भरवत असतात. पिंजऱयावर लावलेल्या सूचनांकडे आपण संपूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे निसर्गदेखील त्या प्राण्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो.

वानरांना, माकडांना काहीही दिले जाते

माकडांचे, वानरांचे तसेच लंगूर यांचे मुख्य खाद्य म्हणजे जंगलातील  फळे, कोवळी पाने, जांभळे हे असतं. परंतु प्रत्यक्षात आपण पाहतो ती माणसांची ढवळाढवळ. कर्नाळा पक्षी अभयारण्याजवळील रस्त्यांवर, भिंतीवर बसलेल्या माकडांना एखाद्या वाहनाने जाताना पॉपकॉर्न, चणे, उरलेले ब्रेडचे तुकडे, पोळय़ांचे तुकडे खायला दिले जातात आणि त्यांचे आरोग्य बिघडत जाते. तोंडाला सूज येते, पायात अळी होतात तसेच रस्त्यात वाहनांच्या रहदारीमुळे अपघातामुळे अपंग होतात किंवा मृत्युमुखी पडतात. कानेरी केव्हज् तसेच केरळ, आसाम येथे हौशे-नौशे-गौशे माकडांना चक्क थम्स अप, कोकाकोल्याची बाटली किंवा टीन देतात. त्यामुळे माकडांची पचनशक्ती बिघडते.

जशी माणसांना ऑसिडिटीचा त्रास होतो तसा माकडांनासुद्धा होतो. त्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडविण्यात माणूसच कारणीभूत असतो.

काही प्राणिसंग्रहालयात असे आढळून आले आहे की, ज्या वस्तू पचतच नाहीत किंवा ज्याचे विघटनच होत नाही त्या काही वस्तू पर्यटक पाणघोडय़ाच्या तोंडात टाकतात. काही वर्षांपूर्वी अशाच कारणांमुळे एका पाणघोडय़ाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे कारण शोधून काढण्यासाठी जेव्हा पोस्टमार्टम करण्यात आले तेव्हा धक्कादायक बातमी उघडकीस आली. ती म्हणजे त्या बिचाऱया पाणघोडय़ाच्या पोटात रबरी बॉल (चेंडू) सापडले व त्याची कुजवट होऊन त्याचा मृत्यू झाला.

पाणघोडा त्याच्या सवयीनुसार आपला मोठा जबडा उघडत असतो. त्या वेळेस काही पर्यटकांनी हे चेंडू टाकल्याचा संशय व्यक्त केला गेला होता. निसर्गात त्यांचे खाद्य प्राणी बरोबर शोधतात. माणसाने उगीचच स्वतःच्या मजेसाठी किंवा त्यांच्या मुलांच्या उत्साहपूर्तीसाठी हे करता कामा नये.

कबुतरांना दिले जातात चणे, दाणे

कबुतरांचे भक्ष्य किंवा खाद्य हे जरी चणेदाणे, कीटक, जिवाणू असले तरी निसर्गात ते टिपताना नीट टिपतात. परंतु कबुतरखान्यात आपण पाहतो, पोतीच्या पोती जमिनीवर ओतली जातात. भुकेपोटी सकाळी ती कबुतरे ती खातात, परंतु त्याच जागेत त्यांची विष्टा, पंखामधील जंतू यांचा प्रादुर्भाव त्यांच्या जीवनशैलीत किंवा आरोग्यावर कालावधीप्रमाणे होतच असतो. कारण त्या प्रमाणात स्वच्छता ठेवली जात नाही. केवळ धर्मापोटी आपण हे सर्व त्यांच्या आरोग्याचा विचार न करता सातत्याने करीत राहतो.