अंकित बावणेचे दमदार शतक

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईनंतर आता महाराष्ट्रानेही विजय हजारे ट्रॉफीत सलग दुसऱया विजयावर मोहोर उमटवली. मराठमोळय़ा अंकित बावणेच्या नाबाद ११७ धावांच्या खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने बुधवारी झालेल्या ‘ब’ गटातील लढतीत उत्तर प्रदेशवर १०५ धावांनी दणदणीत विजय मिळवत महत्त्वाचे चार गुण संपादन केले.

महाराष्ट्राकडून मिळालेल्या ३४४ धावांचा पाठलाग करणाऱया उत्तर प्रदेशचा डाव २३८ धावांमध्येच गडगडला. उत्तर प्रदेशकडून मोहम्मद सैफने सर्वाधिक ४९ धावा केल्या. या लढतीत महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. प्रदीप दाढे, श्रीकांत मुंढे, सत्यजीत बच्चाव यांनी प्रत्येकी दोन गडी तर शमशुझामा काझी याने ३ मोहरे गारद केले.

दरम्यान, त्याआधी प्रथम फलंदाजी करणाऱया महाराष्ट्राने ३४३ धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने ५६ धावा करीत आश्वासक सुरुवात करून दिली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अंकित बावणेने १०६ चेंडूंत १ षटकार व १३ चौकारांसह नाबाद ११७ धावा फटकावत उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. नौशाद शेखने ६९ धावा फटकावल्या. उत्तर प्रदेशकडून कार्तिक त्यागी व सौरभकुमार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.