मोदी सरकारवर विश्‍वास ठेवणे चूक, अण्णा आंदोलनावर ठाम

1

सामना प्रतिनिधी । पारनेर

जलसंपदा मंत्री डॉ. गिरीष महाजन यांनी कोणताही ठोस प्रस्ताव न दिल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासमावेत राळेगणसिद्धीत झालेली त्यांची सुमारे दीड तासांची चर्चा निष्फळ ठरली. नरेंद्र मोदी सरकारवर विश्‍वास ठेवणे गैर होईल असे सांगत हजारे यांनी आपण येत्या 30 जानेवारी पासूनच्या राळेगणसिद्धीतील आंदोलनावर ठाम असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नवी दिल्ली येथील आंदोलनादरम्यान देण्यात आलेल्या अश्‍वासनांची पुर्तता न झाल्याने येत्या 30 जानेवारीपासून हजारे हे राळेगणसिद्धीतील संत यादवबाबा मंदीरात बेमुदत उपोषणास बसणार आहेत. त्यांना या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी मंत्री डॉ. महाजन हे राळेगणसिद्धीत आले होते. दुपारी दोन वाजता ते येणार असे सांगण्यात आले होते, परंतू औरंगाबाद येथील कार्यक्रम लांबल्याने सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते राळेगणसिद्धीत पोहचले. तब्बल दीड तास हजारे व महाजन यांच्यात चर्चा झाल्यानंतर दोघांनीही माध्यमांशी संवाद साधला.

लोकपाल व लोकायुक्त नियुक्त करण्यासंदर्भात तांत्रीक तृटी दूर झाल्या असून सुमारे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. अलिकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनीही आढवा घेत लोकायुक्त नियुक्त करण्यासाठी काय करावे लागेल याची माहीती घेतली आहे. येत्या 27 तारखेस मुख्यमंत्री व हजारे यांच्यात भेट शक्य असून या भेटीतून तोडगा निघेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.