लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे घाटकोपरमध्ये राष्ट्रीय स्मारक

49


सामना प्रतिनिधी, मुंबई

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बिनीचे शिलेदार शाहीर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे निवासस्थान असलेल्या घाटकोपरमधील चिरागनगरमध्ये राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे. स्मारकाच्या निमित्ताने चिरागनगरचाही पुनर्विकास करून तेथे नऊ मजल्यांची इमारत बांधण्यात येणार आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अण्णाभाऊ साठेंचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यास मंजुरी दिल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली.

1969 पर्यंत अण्णाभाऊ साठे चिरागनगरमधील वस्तीत राहत होते. तेथेच त्यांचा मृत्यू झाला होता. ते राहत असलेले घर संबंधित मालकाने अण्णांच्या स्मारकासाठी देण्याची तयारी दर्शवली आहे. स्मारक उभारताना चिरागनगरचाही पुनर्विकास राज्य सरकार करणार आहे. हा पुनर्विकास कोणत्याही खासगी विकासामार्फत न करता म्हाडा, एसआरए आणि शिवशाही पुनर्वसन प्रकल्प यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

घाटकोपर हे फ्लाइंग झोनमध्ये येत असल्याने तेथे इमारतींच्या उंचीवर बंधने आहेत. त्यामुळे तेथे फक्त नऊ मजली इमारती उभारण्यात येतील असे कांबळे यांनी सांगितले. या स्मारकासाठी व पुनर्विकासासाठी लागणारा निधी राज्य सरकार देणार असून आगामी अर्थसंकल्पात तशी तरतूद करणार असल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले.

सध्या 4.5 हेक्टरवर असलेल्या चिरागनगरचा पुनर्विकास केल्यानंतर तेथे एक हेक्टर जमिनीवर अण्णाभाऊ साठेंचे स्मारक उभारले जाणार आहे. 2020 हे अण्णांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने या स्मारकाचे काम लवकर सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या स्मारकात एक हजार व्यक्तींचे सभागृह आणि सुसज्ज लायब्ररी उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्मारकाच्या दर्शनी भागात अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या