आणखी एका वीरपत्नीची गौरवगाथा


सामना प्रतिनिधी । नागपूर

सैन्यातील पतीच्या मृत्यूनंतर जिद्दीने खडतर प्रशिक्षण घेऊन सैन्यातच लेफ्टनंट झालेल्या स्वाती महाडिक संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. तशीच एक घटना गडचिरोलीत घडली आहे. पोलिसात असलेले पती नक्षली हल्ल्यात शहीद झाल्यानंतर ही वीरपत्नी जिद्दीने प्रशिक्षण घेत उपशिक्षणाधिकारी झाली. अंगावरची हळद सुकायच्या आधीच भाळी आलेल्या वैधव्याचा बाऊ न करता या वीरपत्नीने पुढील आयुष्य एकट्यानेच जगण्याचा निश्चय केला आणि ती यशस्वीही झाली.

श्रीमती हेमलता जुरु परसा हे या वीर पत्नीचे नाव. हेमलता आणि जुरु दोघेही गोंड-माडिया आदिवासी. भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम हिदूर हे जुरु केये परसा यांचे गाव. घरची परिस्थिती बेताची. दहावीपर्यंत त्यांनी लोकबिरादरी आश्रमशाळेत अध्ययन केले. तेथे असताना डॉ. प्रकाश आमटे यांच्यापासून प्रेरणा घेऊन जुरुंनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि ते पोलिस दलात भरती झाले. नोकरीनंतर कुरखेडा तालुक्यातील मूळ रहिवासी असलेल्या हेमलता नैताम यांच्याशी जुरुचे लग्न झाले. हेमलता तेव्हा एम. ए. बी. एड. झालेल्या होत्या. त्या आरमोरी तालुक्यातील चुरमुरा येथील वैनगंगा विद्यालयात शिक्षिका होत्या.

लग्नानंतर दोघेही गडचिरोली येथे राहू लागले. लग्नाला चार महिने होत नाही, तोच लाहेरी येथे नक्षल्यांशी झालेल्या चकमकीत जुरु शहीद झाल्याची बातमी आली. तो दिवस होता ८ ऑक्टोबर २००९. संसाराच्या वेलीवर फूल उमलण्याआधीच पतीला वीरमरण आल्याने हेमलताचे अवसान गळाले. हेमलताने दुसरे लग्न न करण्याचा निर्णय घेतला. दु:खाच्या काटेरी वाटेवरुन चालता चालता ६ वर्षे निघून गेली. अखेर पोलिस विभागाने मदतीचा हात पुढे केला आणि २०१५ मध्ये हेमलता गटशिक्षणाधिकारी झाल्या. यशाचे एक शिखर पादाक्रांत झाले होते. परंतु जिद्द आणि चिकाटी कायम होती. हेमलता यांनी पुन्हा एकदा जिद्द केली. शहीद पतीला सलामी देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. यावर्षी १० जानेवारीला आयोगाने निकाल जाहीर झाला आणि त्यात हेमलता यांची निवड झाली. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी हेमलताला बोलावून घेतले आणि शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला.
हेमलता जुरु परसा यांच्या जिद्दीला संपूर्ण जिल्हा सलाम करीत आहे.