गुजरातमध्ये आणखी एका मंत्र्याचे बंड

सामना ऑनलाईन,अहमदाबाद

कमी महत्त्वाचे खाते दिल्यावरून उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करून बंडाचे निशाण फडकावले होते. आता पटेल यांच्यानंतर मच्छीमार मंत्री पुरुषोत्तम सोळंकी यांनीही कमी महत्त्वाचे आणि केवळ एकच खाते दिल्यावरून रुपानी सरकारविरुद्ध बंड केले आहे.

भाजपला गुजरातमध्ये काठावरचे बहुमत आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे भय आता उरलेले नाही. त्यातूनच नितीन पटेल यांना प्रथमतः बंड केले. त्यांना यावेळी अर्थ खाते न दिल्याने त्यांनी मंत्री पदाचा कार्यभारच स्वीकारला नाही. पण दुसऱया दिवशी ते बंड करणार असल्याचे वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले. यानंतर दिल्लीतून अध्यक्ष अमित शहा यांनी फोन करून त्यांना अर्थ खाते देण्याचे आश्वासन दिले. यानंतर त्यांचे बंड थंड झाले. आता सोळंकी यांनी नाराजी व्यक्त करून एक प्रकारे बंड पुकारले आहे.

मी पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेलो आहे. मला केवळ एकच खाते दिले आहे. हा राज्यातील मछीमार समाजाचा अपमान आहे, अशी उघड नाराजी सोळंकी यांनी व्यक्त केली आहे. शिवाय मंत्र्यांची कार्यालये असलेल्या गांधीनगर येथील स्वर्णीम संकुलातही ते आलेले नाहीत. यातून त्यांनी बंड पुकारल्याचे स्पष्ट होत आहे.