इक्बालच्या ’कोंबडय़ा’ वाढत चालल्या…खंडणीचा आणखी एक गुन्हा

सामना प्रतिनिधी, ठाणे

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जेलमध्ये असलेला भाऊ इक्बाल कासकर याचे अनेक कारनामे पुढे येत आहेत. खंडणीसाठी बडय़ा बिल्डरांना धमकविणाऱ्या इक्बालच्या ‘कोंबडय़ा’ आता वाढत चालल्या असून त्याच्या विरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. गोराई येथील ३८ एकर जमिनाचा सौदा करण्याप्रकरणी तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप इक्बालवर ठेवण्यात आला असून बिल्डरच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.

इक्बालने आणखी कोणाकडे खंडणी मागितली याचाही भंडाफोड होणार असून आता अनेकजण तक्रारीसाठी पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे इक्बालसमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

इक्बालच्या विरोधातील तिसरी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली असून सध्या तो ठाण्याच्या सेंट्रल जेलमध्ये आहे. गोराई येथील ३८ एकर जमिनीचा सौदा इक्बालने एक वर्षापूर्वी केला होता. मात्र अचानकपणे बिल्डरने या सौद्यातून माघार घेतली. त्यामुळे संतप्त होत त्याने बिल्डरकडे एक कोटीची खंडणी मागितली.

अॅडव्हान्स परत करण्यास नकार
संबंधित बिल्डरने जमीन खरेदीसाठी दिलेली दोन कोटी रुपयांची अॅडव्हान्स रक्कमही परत करण्यास ठाम नकार दिला. तसेच इक्बालने बिल्डरला धमक्याही दिल्या. अखेर त्या बिल्डरने ठाणे पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान यापूर्वीच त्याच्या विरोधात खंडणी मागितली म्हणून दोन गुन्हे दाखल झाले असून चौकशीनंतर त्याचे खंडणीचे आणखी कारनामे उघडकीस येणार आहेत.