प्लास्टिक बंदीची मोहीम तालुका पातळीवर राबविणार – रामदास कदम

सामना ऑनलाईन । मुंबई

प्लास्टिक बंदीची मोहीम तालुका पातळीवर अधिक गतीने राबवून तीर्थक्षेत्रे आणि पर्यटनस्थळी विशेष पथके नियुक्त केले जाणार असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी मंत्रालयात आढावा बैठकीत सांगितले. कदम म्हणाले, प्लास्टिक बंदीची लोकचळवळ मोठ्या शहरात चांगल्या पद्धतीने राबविली जात आहे. आता तालुका आणि त्यानंतर ग्रामपातळीपर्यंत ही मोहीम अधिक तीव्र करण्याची गरज आहे. नगरपालिका क्षेत्रात अधिकाऱ्यांची विशेष पथके तयार करुन प्लास्टिक वस्तुंचा साठा करणाऱ्यांवर आणि विक्री करणाऱ्यांवर धाडी टाकण्यात येणार आहेत.

तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या आणि कॅरीबॅग आढळून येतात. तेथील दुकानदारावर थेट कारवाई करण्यात येईल. विविध धार्मिक उत्सवाच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या थर्माकोलवर बंदी असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही कदम यांनी केले. या बैठकीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन् आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.