लग्नानंतर विराट लागला कामाला, लोकांनी घेतली मजा

सामना ऑनलाईन । केपटाऊन

हिंदुस्थानच्या क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या ‘राजेशाही’ लग्नाची संपूर्ण देशातच नाही तर जगभरात चर्चा झाली. आता पुन्हा एकदा एका फोटोमुळे हे दोघे चर्चेत आले आहेत. विराट अनुष्कासोबत सध्या दक्षिण अफ्रिकेविरोधात होणाऱ्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी केपटाऊनला पोहोचला आहे. पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्याआधी विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत केपटाऊनमध्ये शॉपिंग करताना दिसला. विरूष्काचा शॉपिंग करतानाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये विराट आणि अनुष्का ५० टक्के सेल सुरू असलेल्या एका दुकानाच्या बाहेर उभे असलेले पाहायला मिळत आहेत.

विराट आणि अनुष्काच्या या फोटोवरुन सोशल मीडियावर युझर्स त्यांची खिल्ली उडवत आहेत. अनेकांनी या फोटोवर कमेंट करत मजा घेतली आहे. विराट आणि अनुष्काचा हा फोटो शेअर करत एका युजरने ‘विराट – हे बघ अनुष्का मी ५० टक्के वाला नाही तर १०० टक्के वाला आहे’ अशी कमेंट दिली आहे. तर दुसऱ्या एका युझरने ‘विराट कोहली वेडिंग प्लॅनरच्या बिलकडे पाहत असताना अनुष्का म्हणते चल शॉपिंगला जाऊ. त्यावर विराट – मला माहिती आहे एक चांगली जागा’ असं म्हणतो अशी कमेंटम दिली आहे. तर काहींनी ‘विराटने अनुष्काला रिसेप्शनवर एवढा खर्च केल्यानंतर आता सेलमध्येच शॉपिंग करावी लागणार डार्लिंग’ असं सांगितल्याची कमेंट केली आहे. विराट अनुष्का ११ डिसेंबरला इटलीमध्ये विवाह बंधनात अडकले. त्यानंतर दिल्ली आणि मुंबईमध्ये पार पडलेल्या रिसेप्शन सोहळ्यात या नवदाम्पत्याला लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी क्रीडा, सिने आणि उद्योग जगतातील सेलिब्रिटींनी आवर्जुन हजेरी लावली होती.