अॅपल कंपनीने मागितली जगभरातील ग्राहकांची माफी

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

जगप्रसिद्ध आयफोन कंपनी अॅपलने जगभरातील ग्राहकांची माफी मागितली आहे. अॅपल कंपनीने आपले जुने आयफोन स्लो केले होते, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी अॅपल कंपनीविरोधात अनेक देशांमधील ग्राहक गुन्हा दाखल करत होते. ग्राहकांचा वाढता विरोध लक्षात घेऊन कंपनीने माफी मागितली आहे आणि जुन्या आयफोन ग्राहकांना कमी किंमतीत बॅटरी बदलून देण्याची ऑफर दिली आहे.

अॅपल कंपनीने ग्राहकांना वॉरंटी संपलेल्या आयफोनची बॅटरी २ हजार रुपयांमध्ये बदलून देण्याची ऑफर दिली आहे. या बॅटरीची बाजारामधील किंमत तब्बल ६ हजार ५०० रुपये आहे. कंपनीकडून देण्यात आलेल्या ऑफरमुळे ग्राहकांचा ४,५०० रुपयांचा फायदा होणार आहे. मात्र ही ऑफर फक्त आयफोन-६ आणि त्यानंतर आलेल्या आयफोनसाठीच लागू असणार आहे, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बॅटरी बदलून घेण्याची प्रक्रिया जानेवारी २०१८पासून सुरू होणार आहे.

याआधी अॅपलचे जुने आयफोन स्लो झाल्याप्रकरणी कंपनीवर ९ गुन्हे दाखल करण्यात आले होत्या. काही ग्राहकांनी कंपनीवर फसवणुकीचा आरोप करत भरपाईची मागणी केली होती. त्यानंतर कंपनीकडून जुने आयफोन जाणूनबुजून स्लो करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. बॅटरीची वाढती विक्री कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. स्मार्टफोनमधील प्रोसेसरकडून जास्त बॅटरीची मागणी करण्यात येते तेव्हा कंपनीला असा निर्णय घ्यावा लागतो, असे कंपनीने स्पष्ट केले होते.