‘अॅपल’चे शेअर्स दीड टक्क्याने घसरले

सामना ऑनलाईन, कॅलिफोर्निया

आयफोनला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘ऍपल’ने दिमाखदार सोहळ्यात आयफोन ८, ८ प्लस लॉँच केला खरा. पण या दोन्ही फोनमध्ये नवे असे कुठलेच युनिक फीचर नसल्याने फोन लाँचिंग झाल्यानंतर लगेचच ‘अॅपल’चे शेअर दीड टक्क्याने घसरले.

‘अॅपल’चे सीईओ टीम कुक यांनी कॅलिफोर्नियातील स्टीव्ह जॉब थिएटरमध्ये या फोनच्या लाँचिंगची घोषणा केली. या फोनमध्ये अनेक खास गोष्टी असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु नव्या फोनमध्ये होम बटण नाही. फोनची स्क्रीन वरच्या बाजूने स्वाइप केल्यानंतरच होम ऑक्टिव्हेट होते. तसेच वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली. प्रोसेसरही ७० टक्क्यांहून अधिक वेगवान असल्याचे सांगितले, परंतु यात कुठलेही युनिक फीचर नसल्याचेच उघड झाले.

आयफोन ६-७ वर घवघवीत सूट
नवीन फोन लाँच केल्यानंतर ऍपलने अपेक्षेप्रमाणे जुन्या फोनच्या किमतीत मोठी घट केली असून ग्राहकांना तब्बल सात हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. आयफोन ६ एस, आयफोन ६ एस प्लस, आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लसच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. ३२ जीबीच्या आयफोन ७ च्या किमतीत सात हजारांनी घट झाली आहे. आयफोन सहा सीरिजच्या फोनवरही ग्राहकांना घवघवीत सूट मिळणार आहे. ५६ हजार रुपयांचा ३२ जीबीचा आयफोन ६ एस प्लस ४९ हजारांना खरेदी करता येईल.

आयफोनचे फीचर दुसऱ्या कंपनीच्या फोनमध्येही उपलब्ध

  • आयफोनमध्ये संपूर्ण स्क्रीन फ्रंट आहे. मागची बाजूही काचेची आहे. याशिवाय सर्जिकल ग्रेड स्टील, वॉटर आणि डस्ट रेजिस्टेंट आहे. स्पेस ग्रे आणि सिल्व्हर या रंगांमध्ये उपलब्ध आहेत.
  • जे फीचर्स आयफोनमध्ये युनिक असल्याचे सांगण्यात आले आहे तेच फीचर्स शाओमी एमआय मिक्स, एलजी एक्यू ६ आणि ऑनर, गॅलेक्सी नोट 8 या फोनमध्येही ही सर्व फीचर्स आहेत.

फेस आयडी
यूजरने फोनमध्ये पाहिल्यानंतर फोनची स्क्रीन अनलॉक होते. अंधारातही ही सुविधा काम करेल. फेस डेटा फोन सुरक्षित आहे, परंतु हे तंत्रज्ञान सॅमसंग गॅलेक्सी एस ८ आणि नोट ८ यामध्येही उपलब्ध आहे.

ओएलईडी स्क्रीन
सुपर रेटिना डिस्प्ले ६.८ इंच आहे, परंतु शाओमी मिक्समध्येही ही स्क्रीन असून त्याची साइज ६.४४ इतकी आहे.