आता दोन हजारात बदला आयफोनची बॅटरी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जगप्रसिद्ध आयफोन कंपनी अॅपलने हिंदुस्थानात आपल्या जुन्या स्मार्टफोन्सची बॅटरी बदलण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यापूर्वी अॅपलने याबाबत जगभरातील ग्राहकांची माफी मागितली होती. त्यानंतर आता अॅपल कंपनीने ग्राहकांना वॉरंटी संपलेल्या आयफोनची बॅटरी २ हजार रुपयांमध्ये बदलून देण्याची ऑफर दिली आहे. बॅटरी बदलण्याच्या प्रोग्राममध्ये बॅटरीची किंमत जवळपास ६०% पर्यंत कमी करण्यात आली आहे.

फोनच्या बॅटरीची बाजारामधील किंमत तब्बल ५ हजार ९०० रुपये आहे. मात्र कंपनीकडून देण्यात आलेल्या ऑफरमुळे ग्राहकांचा थोडा फायदा होणार आहे. ही ऑफर फक्त आयफोन-६ आयफोन ६ प्लस, आयफोन ६ एस, आयफोन ६ एस प्लस, आयफोन एसई, आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लससाठी उपलब्ध असणार आहे. या व्यतिरिक्त, अॅपल एक बॅटरी सॉफ्टवेअर ही आणणार आहे. हे सॉफ्टवेअर आयफोनच्या बॅटरीची कार्यक्षमता आणि स्थितीबाबत माहीती देईल.

अॅपलवर याआधी जुने आयफोन स्लो झाल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर काही ग्राहकांनी कंपनीवर फसवणुकीचा आरोप करत भरपाईची मागणी केली होती. त्यानंतर कंपनीकडून जुने आयफोन जाणूनबुजून स्लो करण्यात आल्याचे सांगण्यात आलं. तसेच स्मार्टफोनमधील प्रोसेसरकडून जास्त बॅटरीची मागणी करण्यात येते तेव्हा कंपनीला असा निर्णय घ्यावा लागतो, असे कंपनीने स्पष्ट केले होते. त्यामुळेच आता ग्राहकांना बॅटरी बदलून दिल्यानंतर फोन स्लो होण्याची समस्या दूर होईल असा दावा अॅपलने केला आहे.