…म्हणून सॅमसंग ३६०० कोटी रूपये अॅपलला देणार


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अॅपल आणि सॅमसंग या दोन बलाढ्य मोबाईल कंपन्यांमध्ये सात वर्षांपासून सुरू असलेल्या डिझाइन चोरीच्या खटल्याचा निकाल अखेर लागला आहे. अमेरिकेच्या न्यायालयाने या खटल्याचा निकाल अॅपलच्या बाजूने देत सॅमसंगला दोषी ठरवले आहे. तसेच नुकसान भरपाई म्हणून ३६०० कोटी रूपये अॅपलला देण्याचे आदेश दिले आहेत.

अॅपलने सॅमसंगच्या विरोधात २०११मध्ये एक खटला दाखल केला होता. ज्यामध्ये सॅमसंगने अॅपलचे पेटेंट असलेल्या आयफोनच्या डिझाइनची चोरी केली असल्याचा आरोप करण्यात आला होता. सुरुवातीच्या सुनावणीमध्ये सॅमसंगला दोषी ठरवण्यात आले होते आणि अॅपलला एक अब्ज डॉलरची नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला होता. परंतु नुकसान भरपाईच्या रक्कम कमी करण्यात यावी अशी मागणी सॅमसंगतर्फे करण्यात आली होती.

सात वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात अमेरिकेच्या न्यायालयाने अॅपलच्या बाजूने निकाल दिला. यावर बोलताना अॅपलने सांगितले की, ते न्यायालयाच्या निर्णयामुळे खुश आहेत. आमच्यासाठी हा खटला पैशांपेक्षा जास्त महत्त्वाचा होता. अॅपलने सॅमसंगवर तीन डिझाइनचे पेटेंट आणि दोन यूटिलिटी पेटेंट चोरी केल्याचा आरोप केला होता. न्यायालयाने पेटेंटबाबतचा करार मोडल्याप्रकरणी सॅमसंगला हा दंड ठोठावला आहे.