पर्रीकर किती दिवस अमेरिकेतून कारभार पाहणार, दुसरा मुख्यमंत्री नेमा!


देवेंद्र वालावलकर, पणजी

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे पुन्हा उपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. यामुळे निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा फायदा उचलण्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या लोकशाहीची विटंबना चालू असून पर्रीकरांनी हट्टीपणा सोडावा आणि मुख्यमंत्री पदाची सूत्रे दुसऱ्याकडे सोपवावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवत्ते विजय भिके यांनी केली आहे.

काँग्रेसने शुक्रवारी दुपारी 12 वाजता विधीमंडळ गटाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत गोव्यातील सद्यस्थितीतील राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार आहे. बहुजन समाजातील एखादी व्यक्ती गोव्याची मुख्यमंत्री होईल या दुसरा मुख्यमंत्री नेमला जात नसल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. पर्रीकर यांच्या आरोग्यविषयक समस्या वाढल्याने भाजपने पूर्णवेळ तंदुरुस्त नेता मुख्यमंत्रीपदी नेमावा अशी मागणीही  काँग्रेसने केली आहे.

गोव्याच्या नेतृत्वावरून भाजप नेत्यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी नेतृत्वबदलाची कोणतीही शक्यता नसल्याचं वारंवार म्हटलं आहे. तर केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी गोवा भाजपाची कोअर कमिटी म्हणजेच गाभा समिती राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटणार असल्याचे म्हटले होते. याबाबत तेंडुलकर यांना विचारलं असता नेतृत्वबदलासाठी शहा यांना भेटण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हटले होते. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे दीपक ढवळीकर यांना केलेल्या विधानामुळे भाजपला जास्तच टेन्शन आलं आहे. त्यांनी म्हटलंय की आम्ही पर्रीकरांच्या नेतृत्वाखालील सरकारचाच विचार करीत आहोत आणि त्यांच्याच नेतृत्वाखालील सरकारला आम्ही पाठींबा दिला आहे. या उलटसुलट विधानांमुळे काँग्रेस भयंकर आनंदीत झाली असून गोव्यात आपल्याला सत्ता स्थापनेची संधी मिळेल असं त्यांना वाटायला लागलं आहे.