श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचं जुनं रुपडं खुलवणार, पुरातत्व विभागाकडून मंदिराची पाहणी 

91

सामना प्रतिनिधी । पंढरपूर 

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि मंदिर समितीच्या आखत्यारीत असलेल्या २८ परिवार देवताच्या मंदिराची पुरातत्व विभागाकडून पाहणी करण्यात आली आहे. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराला मुळ रूप देण्यासाठी लवकरच एक अहवाल मंदिर समितीला सादर केला जाईल अशी माहिती पुरातत्व विभाग सहाय्यय संचालक विलास वाहने यांनी दिली आहे. यासाठी मंदिरात अनावश्यक तो बदल काढून टाकून मंदिराचे गत वैभव प्राप्त होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे पुरातन काळातील स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. मात्र कालांतराने या मंदिराच्या बांधकामात अनावश्यक बदल केला गेला. तर आजमितीस मंदिरातील अनेक ठिकाणी दगडी बांधकामातील दगड निसटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी मंदिराचे पुरातत्व टिकवण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी राज्यातील तसेच केंद्रातील पुरातत्व विभागाशी पाठपुरावा केला. पुरातत्व विभागाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवता यांची पाहणी करून एक अहवाल समितीला नुकताच दिला. यामध्ये मंदिरातील वीज जोडणी, अनेक मूर्तींवर तेल, खाद्य पदार्थ लावणे, मंदिरावर केलेले रंगकाम, गर्भगृहात वातानूकुलीत यंत्रणा, फरशी, दर्शन रांगा आदी बाबत आक्षेप नोंदविले आहेत. याबाबत समितीच्या बैठकीत याबाबत तातडीने उपाय योजना करून मंदिराचे गत वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या मदतीने बदल करावा असा निर्णय घेण्यात आला.

 या पार्श्वभूमीवर पुरातत्व विभागाचे पुणे येथील सहाय्यक संचालक विलास वहाने, डॉ.पी.जी.साबळे, वास्तू रचनाकार प्रदीप देशपांडे आणि त्यांच्या पथकाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची पाहणी केली. या वेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महराज औसेकर समितीचे सदस्य ह,भ,प. ज्ञानेश्वर महराज जळगावकर,शिवाजी मोरे या वेळी उपस्थित होते.

या वेळी पुरातत्व विभागाने मंदिराच्या बाबतीत माहिती दिली. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये ग्रॅनाईट बसविण्यात आले आहे. या  मुळे मुर्तीवर आर्द्रतेचा परिणाम होऊ शकतो असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. त्यामुळे ग्रेनाईट, चुकीचे झालेले विद्युत जोडणी आदी केलेले बदल काढावे लागणार आहेत. त्यामुळे पर्यायाने मंदिराचे आणि मूर्तीचे आयुष्यमानात अजून वाढ होईल. मात्र यामुळे मंदिराला कोणताही धोका नाही असे वहाने यांनी स्पष्ट केले. दरम्यान, संत नामदेव पायरी पासून पश्चिम द्वार पर्यंतचे मंदिराच्या वास्तूची पाहणी पुरातत्व विभागाच्या पथकाने केली आहे. येत्या काळात मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडीट करून मंदिरात पुरातन रूप राहण्याच्या दृष्टीने काम केले जाणार आहे.

आता पर्यंत श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारित नव्हते मात्र हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अधिकारात आणण्यासाठी आवश्यक प्रयत्न होणार आहेत. या बाबत लवकरच एक अहवाल आणि त्यासाठी येणारा खर्च याबाबतची माहिती समितीला देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकंदरीत पुरातत्त्व विभागाने मंदिराच्या संवर्धनासाठी आता तातडीने कामे पूर्ण करून मंदिराला गत वैभव प्राप्त करून द्यावे अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या