आर्चीनंतर तिचे आई-वडीलही सिनेमात दिसणार

सामना ऑनलाईन । मुंबई

‘सैराट’ चित्रपटातील आपल्या भूमिकेने सगळ्यांना याड लावणारी आर्ची म्हणजे रिंकू राजगुरूनंतर आता तिचे आई-वडीलही चित्रपटात काम करणार आहेत. रिंकूची आई आशा राजगुरु आणि वडील महादेव राजगुरु हे आगामी ‘एक मराठा, लाख मराठा’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.

‘एक मराठा, लाख मराठा’ हा चित्रपट शेतकरी कुटुंबात राहणाऱ्या एका तरुणावर आधारित आहे. या चित्रपटात हा तरुण आपल्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असतो. कालांतराने त्याच्या संघर्षाचे रुपांतर मोठ्या जनआंदोलनात होते. मात्र हे झालेले रुपांतर त्याला कळत नाही. त्याच्या समोर केवळ एकच लक्ष्य असते, आणि ते म्हणजे आपल्या बहिणीला न्याय मिळवून देणे.

‘एक मराठा, लाख मराठा’ या चित्रपटाचे दिग्दर्शिन गणेश शिंदे यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती साई सिने फिल्म्सने केली आहे, तर संजय साळुंखे, अतुल लोहार आणि गणेश सातोर्डेकर यांनी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन केलं आहे. तसंच, मिलिंद गुणाजी, भारत गणेशपुरे, किशोर कदम, मोहन जोशी, विद्याधर जोशी, अरुण नलावडे, संजय खापरे, नागेश भोसले, विजय पाटकर, प्रिया बेर्डे, सुरेखा कुडची, उषा नाईक, नफिसा शेख, ढोले गुरुजी, भक्ती चव्हाण, सुरेश विश्वकर्मा आणि राधिका पाटील यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.