अर्जुन तेंडुलकरची ऑस्ट्रेलियात चमक

सामना ऑनलाईन । सिडनी

‘द वॉल’ राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडने बुधवारी दमदार शतकी खेळी करीत शालेय स्तरावर ठसा उमटवल्यानंतर शुक्रवारी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने सातासमुद्रापार ऑस्ट्रेलियात अष्टपैलू चमक दाखवताना क्रिकेट क्लब ऑफ इंडियाला विजय मिळवून दिला.

१८ वर्षीय अर्जुन तेंडुलकर सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये स्पिरिट ऑफ क्रिकेट ग्लोबल चॅलेंज स्पर्धेत क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे प्रतिनिधित्व करतोय. ब्रॅडमन ओव्हल येथे झालेल्या हाँगकाँग क्रिकेट क्लबविरुद्धच्या ट्वेण्टी-२० लढतीत या पठ्ठय़ाने शानदार कामगिरी केली. अर्जुन तेंडुलकरने २७ चेंडूंत ४८ धावांची झंझावाती फलंदाजी केल्यानंतर चार षटकांमध्ये चार फलंदाजांनाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला हे विशेष.