राखी बांधून परत ड्युटीवर जाताना परभणीच्या जवानाचा अपघाती मृत्यू

सामना प्रतिनिधी । परभणी

हिंगोली तालुक्यातील आंधरवाडी रेल्वे परिसरात रविवारी रात्री एका सैनिकाचा मृतदेह आढळला. मृत सैनिकाचे नाव प्रवीण शिवाजी गायकवाड (23) असे असून ते झारखंड येथील रांची येथे कार्यरत होते. मयत प्रवीण गायकवाड हे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी येथील रहिवासी होते.

हिंगोली येथील रेल्वेस्थानकाचा कर्मचारी चंदनकुमार हे पेट्रोलिंगसाठी जात असताना रविवारी रात्रीच्या सुमारास त्यांना एक मृतदेह आढळुन आला. त्यांनी याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. हिंगोली ग्रामीण ठाणे हद्दीतील घटना असल्याने पोलीस हेड कॉन्सटेबल राजेश ठोके व पोलीस नायक रविकांत हरकाळ यांनी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर पार्थिव जिल्हा रूग्णालयात आणले. ते सुटी संपवून कर्तव्यावर हजर होण्यासाठी रांची येथे होते. याच दरम्यान रेल्वेतून पडून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सोमवारी सकाळी जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी झाली होती. कर्तव्यावर हजर होण्यासाठी जाणाऱ्या मुलाचा मृतदेह डोळ्यासमोर आल्याने नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.

गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी येथील जवान प्रवीण शिवाजी गायकवाड हे 23 मार्च 2015 वर्षात परभणी येथे भारतीय सैन्य दलात दाखल झाले. सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पुर्ण झाल्याने सुटी घेऊन गावाकडे आला. प्रवीण शिवाजी गायकवाड हे 23 वर्षाचे जवान ड्युटीला निघाला असताना त्यांचा अपघात झाला.