मोदींवर शाईफेक करणाऱ्याला २५ लाखाचे बक्षीस

2

 

सामना ऑनलाईन। कोलकाता

‘पंतप्रधान मोदींवर शाईफेक करणाऱ्याला २५ लाखांचे इनाम देण्यात येईल,’ असे चिथावणीखोर वक्तव्य कोलकात्यामधील टिपू मशिदीचे शाही इमाम सईद मोहम्मद रहमान बरकती यांनी केले आहे. याशिवाय  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने नोटबंदीच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल केली असून त्यांना ताबडतोब अटक करा असा फतवाच त्याने काढला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींवर अत्यंत बेजबाबदारपणे टीका करणाऱ्या इमामाला अटक करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

ऑल इंडिया मजलिस इ सुरा आणि ऑल इंडिया मायनॉरिटी फोरम यांच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत ते बोलत होते. यावेळी बरकती यांनी नोटबंदीचा निर्णयावर कडाडून टीका केली.

मोदी देशवासियांची दिशाभूल करत असून नोटबंदीमुळे  रोज सामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मोदींनी यापुढेही पंतप्रधानपदी राहावे अशी कोणाचीही ईच्छा नसल्याचा दावा यावेळी बरकती यांनी केला.

बरकती यांच्या फतव्यानंतर पश्चिम बंगालमधील भाजपचे राष्ट्रीय सचिव सिध्दार्थ नाथ सिंग यांनी  मोदींच्या विरोधात फतवा काढणे हे निषेधकारक कृत्य असून पंतप्रधानांचा अपमान करणारे आहे. यामुळे मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी  इमामाला अटक करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी  केली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाष्य केल्याप्रकरणी बरकती यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्याविरोधात फतवा काढला होता.