स्वेतलानाचा स्पेसवॉक


व्हॅलेन्टिना तेरेश्कोवा यांच्या १९६३ मधील अंतराळ यशानंतर महिलांच्या अंतराळवाऱ्या वेग घेतील असं वाटलं होतं, पण तसं घडलं नाही. तेरेश्कोवा यांच्याबरोबर असलेल्या इतर चार कॉस्मॉनॉटना तशी संधी मिळाली नाही आणि १९६९ मध्ये रशियन अंतराळ कार्यक्रमातील महिलांचा गट विसर्जित करण्यात आला. त्यानंतर तब्बल १९ वर्षांनी अशी संधी स्वेतलाना सॅवित्स्काया यांना मिळाली. सोयूझ टी-७ या यानातून १९८२ मध्ये रशियाचीच ही अंतराळवीर अवकाशात जाऊन आली. दुसरी महिला कॉस्मॉनॉट होण्याचा मान स्वेतलानाला लाभला. एवढंच नव्हे तर पुन्हा १९८४ मध्ये तिला स्पेसमध्ये पाठविण्यात आले आणि अंतराळात चालण्याचा अनुभव घेणारी, नवा विक्रम करणारी ती पहिला महिला ठरली.

स्वेतलानाचा जन्म ८ ऑगस्ट १९४८ रोजी झाला. तिचे वडील दुसऱ्या महायुद्धातील योद्धे आणि सोव्हिएत हवाई दलात डेप्युटी कमांड-इन-चीफ होते. साहसाचा वारसा स्वेतलानाला घरातूनच मिळाला होता. तिने वयाच्या सोळाव्या वर्षी घरी कुणाला कल्पना न देताच पॅरॅशूटिंग सुरू केलं होतं. सतराव्या वाढदिवसापर्यंत तिच्या ४५० पॅरॅशूट जमा झाल्या होत्या. १३ ते १४ हजार हजार मीटरवरून पॅराजम्पिंग करण्याचा अनुभव तिने घेतला.

पदवीधर झाल्यानंतर स्वेतलाना १९६६ मध्ये मॉस्कोच्या एव्हिएशन संस्थेत दाखल झाली. १९७१ मध्ये तिला फ्लाइट इन्स्ट्रक्टरचा परवाना मिळाला. १९७२ मध्ये तिने टेस्ट पायलटचं शिक्षण घेतलं. त्यानंतर एअरक्राफ्ट निर्मितीच्या कारखान्यात काम करू लागली.

१९६९ ते ७७ या काळात स्वेतलाना रशियाच्या एअरोबॅटिक्स संघाची सभासद झाली. त्यात तिचं नैपुण्य सातत्याने दिसून आलं. १९७९ मध्ये सोव्हिएत अंतराळ कार्यक्रमांतर्गत पुन्हा एकदा महिलांचा गट स्थापन करण्यात आला. १९८० मध्ये स्वेतलाना त्याची सदस्य बनली.

डिसेंबर १९८१ मध्ये स्वेतलानाची निवड सॅल्यूट-७ या स्पेस स्टेशन उड्डाणासाठी झाली. आधीच्या ताफ्यातील कॉस्मॉनॉटचं उड्डाण रद्द करून तिची निवड झाली होती. १९ ऑगस्ट १९८२ रोजी सोयूझ-७ अवकाशयान अंतराळात झेपावलं आणि स्वेतलाना सॅवित्स्काया ही जगातील दुसऱ्या महिला अंतराळवीर ठरली.

स्वेतलाना अंतराळस्थानकावर पोहोचल्यावर अंतराळ स्थानकावर जाणारी प्रथम महिला ठरली. १२ दिवसांच्या अंतराळ निवासानंतर स्वेतलाना इतर दोन कॉस्मॉनॉटसह पृथ्वीवर सुखरूप परतली. १९८३ च्या डिसेंबरमध्ये स्वेतलाना यांना सॅल्यूट-७ स्पेस स्टेशनवर पुन्हा जाण्याची संधी मिळाली. यावेळी ‘सॅल्यूट’ची इंधन व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी काही अवजारं (टुल्स) घेऊन स्वेतलानाला पाठविण्यात आलं. १७ जुलै १९८४ रोजी प्रत्यक्ष उड्डाण झालं. याच ट्रिपमध्ये २५ जुलै १९८४ रोजी स्वेतलानाला सॅल्यूट-७ च्या बाहेर अंतराळात फेरफटका मारण्याची कामगिरीही देण्यात आली होती.

यानाला जोडलेल्या वजनरहित अवस्थेत अथांग अंतराळात चालण्याचा बहुमान स्वेतलाना या जगातील पहिल्या महिलेला मिळाला. हा स्पेसवॉक तीन तास ३५ मिनिटांचा होता. या काळात तिने सहअंतराळवीर ब्लादिमीर याच्यासह धातूच्या पट्टय़ा कापण्याचा व जोडण्याचा (वेल्डिंग) अंतराळी प्रयोग केला.

नंतरच्या काळात सोव्हिएत रशियाच्या अंतराळ कार्यक्रमातून ५७ अंतराळवीरांनी स्पेसवॉकचा अनुभव घेतला, परंतु त्यामध्ये स्वेतलाना एकमेव महिला अंतराळवीर ठरली. २९ जुलै ८४ रोजी ती पृथ्वीवर परतली. त्यानंतर तिची सॅल्यूट-७ स्पेस स्टेशनकडे जाणाऱ्या महिलांची कमांडर म्हणून नेमणूक करण्यात आली. १९८५ मध्ये सॅल्यूट-७ चा रेडिओ संपर्क तुटला. नंतर कमांडर वेस्युलीन यांच्या आजारपणामुळे पुढचा कार्यक्रम आणि आणखी महिला अंतराळवीर पाठविण्याचा विचार सोडून द्यावा लागला. १९८६ मध्ये ‘मीर’ स्पेस स्टेशनवर जाण्याची स्वेतलानाची संधी गर्भारपणामुळे हुकली, परंतु पहिली ‘स्पेसवॉकर’ अंतराळवीर म्हणून अंतराळ संशोधन क्षेत्रात स्वेतलानाच्या नावाची नोंद झाली ती कायमची.