मालवणात बाप्पांचे जल्लोषात आगमन

सामना प्रतिनिधी । मालवण

कोकणचा महाउत्सव अर्थात गणेश चतुर्थी उत्सवाच्या निमित्ताने घरोघरी गणपती बाप्पांचे मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे. गणेश चतुर्थी दिवशी सकाळीच गणपती बाप्पांची विधिवत प्राणप्रतिष्ठापणा करण्यासाठी अनेक ठिकाणी आदल्या दिवशी बाप्पांची मूर्ती गणेश चित्रशाळेतून घरी नेण्यासाठी कोकणवासीयांची लगबग सुरू होती. काही ठिकाणी ढोल ताशांच्या व बेंजोच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत बाप्पा घरोघरी विराजमान झाले.

१२ रोजी विराजमान होणारे बाप्पा दीड, पाच, सात, नऊ व अकरा तसेच काही ठिकाणी सतरा, एकोणीस, एकवीस व पंचवीस दिवसही मुक्काम करणार आहेत. गणेशोत्सवात बाजरपेठा सजल्या असून गेले दोन दिवस खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. आठवडाभर पावसाने विश्रांती घेतल्याने उत्सवाच्या उत्साहात अधिकच भर पडली आहे.

मुंबई व अन्य प्रांतातून येणाऱ्या चकरमान्यांची मोठी गर्दी असून कोकण रेल्वे, बस व खासगी बस
जादा सोडण्यात आल्या तरी सर्वच मार्गावर वाहनांची मोठी गर्दी आहे. वाहनांच्या अधिक संख्येने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच गणेशोत्सव शांततेत पार पाडवा यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त सर्वत्र ठेवण्यात आला आहे.

भजन-आरतीचे सूर रात्र जागवणार
गणेशोत्सवाच्या निमित्ताने वाडीवाडीत घरोघर होणारी भजने, आरती यामुळे वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. अगदी पहाटेपर्यंत भजनांचे सुरू ऐकू येतात. त्यामुळे भजन-आरतीचे सूर रात्र जागवणार आहेत.