Nitin Desai नितीन देसाई अनंतात विलीन, मुलीने दिला पार्थिवाला खांदा

कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज कर्जत येथील एनडी स्टुडिओ येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन देसाई यांच्या मुलीने त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी मनोरंजन, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होते.

बॉलिवूडमधून आमीर खान, आशुतोष गोवारीकर, मधुर भांडारकर तर मराठी चित्रपटसृष्टीतून रवी जाधव, सुबोध भावे, मानसी नाईक, निखील साने यांनी नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. आत्महत्येआधी नितीन देसाई यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत त्यांनी त्यांच्यावर एनडी स्टुडीओतच अंत्यसंस्कार करण्या़ची इच्छा व्यक्त केली होती. जोधा अकबरच्या सेटजवळ असलेल्या हेलिपॅडवर माझ्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावे असे त्यांनी त्या चिठ्ठीत लिहले होते.

 ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘ट्रफिक सिग्नल’, ‘द लिजंड ऑफ भगतसिंग’, ‘जोधा अकबर’ अशा सुपरहिट बॉलीवूड फिल्मसह ‘सच अ लाँग जर्नी’, ‘होली सेफ’, ‘बुद्धा’, ‘सलाम बॉम्बे’ अशा हॉलीवूडपटांचे प्रख्यात कलादिग्दर्शक आणि एन.डी. स्टुडिओचे सर्वेसर्वा नितीन देसाई यांनी मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. जिथे भव्यदिव्य सेट उभारले त्या कर्जतच्या एन.डी. स्टुडिओतच त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच बॉलीवूडसह अवघा महाराष्ट्र हादरला आहे.

गेल्या काही वर्षांपासून स्टुडिओत बंद पडलेले चित्रपट निर्मितीचे काम, नामांकित निर्मात्यांनी स्टुडिओकडे फिरवलेली पाठ आणि त्यामुळे उभा राहिलेला 252 कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर यामुळे प्रचंड तणावात असलेल्या देसाई यांनी मृत्यूला कवटाळले.

फायनान्स कंपनीचे 254 कोटींचे कर्ज

2020 पासून देसाई हे प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले होते. स्टुडिओतील चित्रपट निर्मितीचे काम बंद पडल्याने त्यांना मोठय़ा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत होते. नामांकित निर्मात्यांनी एन.डी. स्टुडिओकडे पाठ फिरवली होती. त्याआधी त्यांनी 2016 साली स्टुडीओचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी  सांताक्रुझ येथील एडलवाईज अॅसेट रिकन्स्ट्रक्शन फायनान्स कंपनीकडून 180 कोटींचे कर्ज घेतले होते. परतफेड न झाल्याने  ते 254 कोटींवर पोहोचले. त्यामुळे देसाई प्रचंड तणावात होते. देसाई यानां डिफॉल्टर म्हणून जाहीर करण्यात आले. बँक करप्सी कोर्टाने गेल्याच आठवडय़ात तशी केसही दाखल केली होती. त्यातच 7 मे रोजी त्यांच्या एन.डी. स्टुडिओला आग लागली. त्याच दिवशी त्यांना ‘लोन रिकव्हरी’ नोटीसही बजावण्यात आली होती. 30 जून 2022 रोजी त्यांचे खाते ‘नॉन परफॉर्मिंग’ म्हणून घोषित केले. एडलवाईज कंपनीने एन.डी. स्टुडिओ जप्त करण्याची परवानगी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडेही मागितली होती. कंपनीने देसाई यांच्याविरोधात ‘इनकॉर्पोरेट इन्सॉल्वन्सी रिझोल्युशन’ कार्यान्वित केले होते.