ठसा : राजाभाऊ जोशी

साप्ताहिक ‘विवेक’ प्रसिद्ध करत असलेल्या हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण पुरुषोत्तम (राजाभाऊ) जोशी यांचे अलिकडेच पुणे येथे निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुंबईच्या पश्चिम उपनगर विभागाचे राजाभाऊ संघचालक होते. राजाभाऊ नंतर पुण्यात वास्तव्याला गेले. रा.स्व.संघ महाराष्ट्र प्रांत प्रचारप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. संघाच्या कामाच्या सोयीसाठी प्रांताच्या संघटनात्मक रचना बदलल्यानंतर राजाभाऊ पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रचारप्रमुख, संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत होते. विविध विषयांत त्यांना रस होता. संघाचे काम अनेक वर्षे केल्यामुळे ते अनुभवसंपन्न होते. त्याचा लाभ ते सहज गप्पांमधून तरुण कार्यकर्त्यांना देत असत. व्यवस्थापनशास्त्र हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्याची उदाहरणेही ते आवर्जून देत. नियोजन बैठकीत ‘गरमागरमी’ होऊ लागली की, राजाभाऊ सहजपणे हस्तक्षेप करून परिस्थिती निवळत. ‘विवेक’च्या लोणावळा बैठका आणि राजाभाऊ असे समीकरण होते. औपचारिक, कामांच्या भेटीच्या पलीकडे राजाभाऊंच्या घरी जाऊन अनेक विषयांवर मोकळ्या गप्पा होत असत. ‘विवेक’च्या हीरक महोत्सवानिमित्त गोवा, कोकण, मराठवाडा असा राजाभाऊ यांच्याबरोबर झालेला प्रवास भरपूर गप्पांनी खच्चून भरलेला होता. हसरे, खेळकर, थोडंसं खोडकर असं राजाभाऊ यांचं व्यक्तिमत्त्व होतं. अण्णा कार्यवाह आणि राजाभाऊ अध्यक्ष ही हिंदुस्थान प्रकाशन संस्थेची फेमस जोडी होती. एक वर्षापूर्वी अण्णा गेले आणि आता राजाभाऊ गेले. मुंबईत स्थिरस्थावर होण्यापूर्वी राजाभाऊ काही वर्षे गिरगाव येथील ठाकुरद्वार भागात आज ज्या ठिकाणी ’ज्ञानम्’ हे पुस्तक विक्री केंद्र आहे, त्या रामकृष्ण चिकित्सालयात ज्येष्ठ संघ प्रचारक शिवरायजी तेलंग यांच्यासोबत राहत होते. मूळ मोकळा स्वभाव आणि शिवरायजींचा विनोदाचे वावडे नसलेला (दुर्लभ!) सहजानंदी प्रेरक सहवास यातून राजाभाऊंच्या स्वभावातील चांगुलपणा फुलत गेला. गीतगायनाची आवड आणि गतीही त्यातूनच वाढीला लागली होती. राजाभाऊंना अनेक संघगीते कंठस्थ होती. राजाभाऊ सुरेलपणे गीत सांगत. सामान्य कार्यकर्त्यांना राजाभाऊंची ती सुरेलता आकर्षक करणारी होती. त्यांच्या मार्गदर्शनाचा सुगंध आजही तसाच दरवळत आहे. तो दरवळ सुखावणारा, पण त्यांचे कापरासारखे विरून जाणे दुखावणारे आहे.