जगण्याचे मंगलगान

27

>> ऋचा श्रीकांत फाटक

माझा काळ १९६४ सालचा. गरजेपुरते शिक्षण घेऊन वडिलांना हातभार लावण्याची गरज होती. त्याप्रमाणे नोकरीला लागले आणि घरचे वातावरण थोडेफार बदलू लागले. मला घरात फार महत्त्वाचे स्थान मिळाले. मग ओघाने लग्न, मूल हे सर्व छान पदरात पडलं, पण नंतर खरी कसोटी सुरू झाली. मुलाला वाढवणं हे किती कठीण आहे याची जाणीव झाली. मी हाडाची शिक्षिका असल्याने माझे मन मला स्वस्थ बसू देईना. माझ्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे आईवडील कसे घडवत होते हे मी जवळून पाहिले होते. म्हणून मीही माझ्या मुलाला शिकवू लागले. मुलगा सातवीत असताना मला नोकरी सांभाळून त्याला शिकवणं जड जाउै लागलं. म्हणून मी चांगल्या पगाराची नोकरी सोडून दिली, पण त्याचा मुळीच पश्चात्ताप झाला नाही. कारण माझ्या मुलाने त्याचे चीज केले आणि बारावीनंतर त्याला मेडिकलला प्रवेश मिळाला. नोकरी सोडल्यानंतर घरी क्लास सुरु केला होता, पण मग एका खासगी क्लासमध्ये जुजबी शिक्षण घेऊन घरगुती शिवण शिवू लागले. या छंदामुळे माझा वेळ खूपच छान जाऊ लागला. घरची जबाबदारी सांभाळून मी हे करू शकत होते.

मुलगा डॉक्टर झाला. लग्न झाले. सून डॉक्टर, एक नातू झाला. आता मला माझा छंद पूर्ण करायचा होता आणि तशी संधी मिळाली. भजनी मंडळात मी नवीन असूनही मला चांगला मान मिळाला. निवेदनाची संधी मिळाली. भजने शिकताना अभंग रचण्याची स्फूर्ती मिळाली आणि काही रचना मी केल्या. काही रचना मंडळात म्हणून दाखवल्या. पण या सगळ्यांमध्ये मला एक सुवर्णसंधी चालून आली. माझ्या नातेवाईकांच्या प्रत्येक कार्यात म्हणजे लग्न, मुंज, डोहाळ जेवण, बारसं, सहस्रचंद्रदर्शन अशा कार्यक्रमांसाठी मी काव्यरचना करीत असे. त्यांचा बऱयापैकी संग्रह माझ्याजवळ झाला आणि माझ्या मोठ्या जाऊबाई सुनीता यांनी त्या संग्रहाचे पुस्तक काढण्यासाठी मला उत्तेजित केले. ‘मंगल गीते’ पुस्तक निघाले. सर्वांच्या आयुष्यात विशेषतः उतारवयात असे छंद येवोत ही मी देवाजवळ प्रार्थना करते. मन प्रफुल्लित ठेवणं ही गरज छंदामुळेच भागवली जाते.

आपली प्रतिक्रिया द्या