किचन क्वीन!

  • शेफ विष्णू मनोहर

ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी. कसदार अभिनयाप्रमाणेच स्वयंपाकघरही त्यांच्या हातच्या रुचकर पदार्थांनी सजते.

रोहिणी हट्टंगडी यांची माझी ओळख 1985 साली झाली. त्यावेळी मी जेमतेम 15-16 वर्षांचा असेल. रोहिणीताई आणि जयदेव हट्टंगडी यांचं एक नाट्यशिबीर नागपुरात होतं आणि ते शिबीर मी केलं. त्यानंतर एक-दोनदा त्यांच्याशी नाटकांच्या निमित्ताने भेट झाली. नंतर मात्र मेजवानी परिपूर्ण किचन या कार्यक्रमात रोहिणीताई बऱ्याच वेळा येतं असत. पहिल्यांदा त्या आल्या तेव्हा त्या सिलिब्रेटी गेस्ट म्हणून, पण त्यांनी जे शोमध्ये पदार्थ बनविले ते अप्रतिम होते. तेव्हा त्यांची एकाग्रता, पदार्थ बनविण्याची पद्धत, वाखाणण्याजोगी होती. म्हणूनच पुढचे सलग तीन वर्षं त्या माझ्याबरोबर ‘महाराष्ट्राची किचन क्वीन’ या स्पर्धेत जज म्हणून होत्या. यादरम्यान त्यांच्याशी सेटवरच जजिंग करता-करता स्वयंपाक करता-करता गप्पा मारल्या. त्यांच्याबरोबर सलग 6-7 वर्षं काम केल्यामुळे त्यांच्या आवडीनिवडी, स्वयंपाक बनवण्याच्या पद्धती तर मला माहीतच होत्या. त्यामुळे गप्पा मारताना आता कुठला प्रश्न विचारू हा सवालच नव्हता!

रोहिणीताईंबद्दल सांगायचं झालं तर त्या अतिशय साध्या व स्वभावानं भोळय़ा आहेत. पदार्थ जजिंगसाठी पुढय़ात आल्यावर त्याला एकदा अथवा वेळ पडल्यास दोनदा खाऊन त्याचं पृथ्थकरण करणं हा त्यांच्या आवडीचा विषय. बोलता-बोलता त्यांनी चहा बनवायला घेतला. त्यांना आल्याचा तिखट चहा आवडतो हे मला माहीत होतं. म्हणून मी त्यांच्याकरिता चहा बनवायचो. त्या दिवशी त्या म्हणाल्या, आज तू गप्पा मार, चहा मी बनविते. त्या चहा बनवीत असताना त्यांना म्हटलं की, रोहिणीताई तुम्ही ‘केमोफ्लॉश’ हा शब्द खूप वापरता. प्रत्येक स्पर्धकाला रेसिपी कशी होती हे सांगताना हा शब्द वापरण्यामागचं कारण काय? तर त्या हसल्या आणि म्हणाल्या, मुळात या शब्दाचं उच्चारण करायला मला आवडतं.

लहानपणी मुलांना डब्बा देताना भाज्या खाव्यात म्हणून भाज्यांवर काहीतरी केमोफ्लॉश करून पदार्थ बनविणे मला आवडायचे. तेवढ्यात चहा तयार झाला. चहा घेता-घेता त्यांना विचारलं की, तुमच्या आवडी-निवडी काय? तशा तर त्या आधीच मला माहिती होत्या, त्यांना सगळ्या पद्धतीचं थोडं चटपटीत जेवण आवडतं. स्वतः स्वयंपाक करायला आवडतं. मेजवानीच्या सेटवर स्पर्धेच्या वेळी त्या चांगल्या स्पर्धकाला किचनमध्ये जाऊन टीप्स देत असत, जेणेकरुन त्याने चांगला पदार्थ सादर करावा. मी त्यांना जेव्हा विचारल की चित्रपट, नाटक व सिरीयलमध्ये ऐवढया व्यस्त असतांना तुम्हांला मेजवानीमध्ये जजींगसाठी एवढा वेळ कसा देता, त्यावर त्या हसून म्हणाल्या की मेजवानीमूळे माझा स्वतःचा स्वयंपाक करण्याचा आत्मविश्वास वाढला. मी खाण्याची शौकीन आहे, पदार्थातलं कमी-जास्त समजतं पण मेजवानीमूळे बेकींग करण्याचा माझा आत्मविश्वास फारच वाढला. जयदेवजींना माझ्या हातचा बांगडा आवडायचा, मूळातच मी मासे करायला सासूबाईंकडून शिकले कारण माहेर पुण्यातलं आणि तेही कोकणस्थ त्यामूळे माहेरी अंड चालायचं. बाकी मांसाहारी प्रकार मी सासरीच शिकले. सुनबाई नागपूरच्या असल्यामूळे वेगवेगळया पदार्थांसाठी वेगवेगळं तेल वापरणे, वरुन फोडण्या घालणे, फोडणीला लाल मिरची वापरणे इत्यादी प्रकार मला सुनबाईकडून कळाले.

मी टीव्ही सिरीयलमधे जास्तीत जास्त फुडशी निगडीत कार्यक्रम बघते. मास्टर रेसीपी ऑस्टेलिया बघायला खूप आवडतं. अजूनही फावल्या वेळात मी युट्युबवर वेगवेगळे पदार्थ बघून बनवायला शिकते. हे मात्र खरं की याही वयात त्यांचा या विषयातील उत्साह अजून कायम आहे.

[email protected]