नाट्य परिषदेच्या निवडणुकीचा फड

>> शिबानी जोशी

येत्या ४ मार्चला अखिल भारतीय नाट्य परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यानिमित्ताने…

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेची २०१८-२०२३ ची पंचवार्षिक निवडणूक ही नाट्य परिषदेच्या नवीन घटनेनुसार होणारी पहिलीच निवडणूक आहे. यंदा प्रथमच प्रत्यक्ष मतदान करून निवडणूक होणार आहे. या आधी मतपत्रिका टपालाद्वारे टाकून मतदान होत असे. गेल्या निवडणुकीत झालेल्या अभूतपूर्व १०६ टक्के मतदान नाट्यप्रेमींना आठवत असेलच. काही उमेदवारांनी मतपत्रिका पळवल्या, काहींनी पोस्टातून परस्पर काढून घेऊन भरल्या, काहींनी तर डुप्लिकेट छापल्या असंही बोललं गेलं. त्यामुळे कुठल्याही निवडणुकीच्या इतिहासात घडलं नाही ते नाट्य परिषदेच्या निवडणुकीत घडला. १०६ टक्के मतदान…! असे गैरप्रकार टाळण्यासाठी परिषदेची सुधारित घटना वर्ष-सवा वर्षाची मेहनत घेऊन लिहिली गेली. जी धर्मादाय आयुक्तांनी मंजूरही केली. त्या नव्या घटनेनुसार ४ मार्चला मतदान होणार आहे.

सध्याचे परिषदेचे नियामक मंडळ सदस्य मोहन जोशी, दीपक करंजीकर यांनी खूप आधीच आपण निवडणूक लढवणार नाही, असे सांगितलं होतं. परंतु कसे काय माहीत? त्यांनी फॉर्म भरले. फॉर्म भरले, पण मोहन जोशींना अशोक शिंदेंनी दिलेला अनुमोदन चुकीचं ठरलं व त्यांचा अर्ज बाद झाला. तरीही आगामी नियामक मंडळाने सांगितले तर आपण अध्यक्षपद स्वीकारणार असं त्यांनी काही दिवसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितला.

अर्थात, अर्ज बाद झाला हे अनाहूतपणे घडलं. माझ्याकडून चुका झाल्याही असतील, पण माझ्यावर एका पैशाचा आरोप नाही. जे काम केलं ते प्रामाणिकपणे केलं हे त्यांचं म्हणणंही रास्त मानायला हरकत नाही. त्याच काळात पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीला जाव लागणं, त्याचदरम्यान जोशींच्या मातोश्रीसुद्धा रुग्णालयात होत्या व नंतर त्यांच निधनही झालं. त्यामुळे त्यांची ही बाजूही गृहित धरायला हवी. ट्रस्टींनी तुम्ही फॉर्म भरा असं सांगितल्यानंतर आपण सर्वांना फोन केला, परंतु नंतर बोलू असं त्यांनी सांगितलं व नंतर त्यांनीच स्वतःच पॅनेल उभं केल्याच कळलं असंही मोहन जोशी पॅनेलच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.

मोहन जोशी पॅनेलमध्ये दीपक करंजीकर, लता नार्वेकर, विजय गोखले, देवेंद्र यादव, विजय कदम, अमोल कोल्हे, सविता मालपेकर, सुशांत शेलार, चारुशिला साबळे-वाच्छानी असे तगडे उमेदवार आहेत, पण त्यांना सामनासुद्धा तुल्यबळांशीच करावा लागणार आहे.

निवडणूक येत्या ४ मार्चला होणार आहे. निकाल काहीही लागो, नाटकाचा खरा मायबाप हा प्रेक्षकच असतो. सर्वसामान्य नाटय़प्रेमीला निवडणुकीतून काहीच मिळणार नसत, परंतु आपल्या आवडत्या नाट्य कलेची मातृसंस्था ज्याच्या हाती जाईल त्यांनी ‘मालक’ न बनता ‘सेवक’ म्हणून रंगभूमीसाठी कार्य करावं अशी अपेक्षा मात्र या निवडणुकीनंतर त्यांनी बाळगली तर त्यात काय गैर आहे?

मोहन जोशींचा लेखाजोखा तयार
मोहन जोशी पॅनेलनी गेल्या ५-१० वर्षांत जी काम केली त्याचा लेखा-जोखा मांडून प्रसारमाध्यमांवर प्रचार सुरू केला आहे. परिषदेला आर्थिक शिस्त लावली, ६ कोटी खर्चांची विकाम कामे केली, वेब पोर्टल सुरू केले, कार्यालय संगणकीकृत केले, परिषदेकडे साडेपाच कोटी रुपयांच्या ठेवी खात्यात जमा झाल्यात, वृद्ध रंगकर्मींना ७ लाखांहून अधिक पेन्शन देण्यात आलं, ५७२ कामगारांचा विमा काढला, कामगारांच्या हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणं सुरू केलं, बाल नाटय़ संमेलन भरवायला सुरुवात केली अशी विकास कामं त्यांनी नमूद केली आहेत तर भविष्यकाळात माटुंगा इथे एक छोटा रंगमंच, मिनी थिएटर, महिला रंगकर्मी ज्या बाहेरून मुंबईत येतात त्यांच्यासाटी राहण्याची सोय, अत्याधुनिक ग्रंथालय करणार असल्याचं जाहीर केलं. अर्थात १०-१२ वर्षे सत्तेत असताना इतकी कामं करणं अपेक्षितच आहे आणि काम करण्यासाठीच तर आपली निवड होत असते. त्यामुळे सदस्यांना माहीत असलेली ही कामं आकर्षित करतीलच असं नाही.

स्पर्धा चुरशीची होणार!
‘आपलं पॅनेल’ हे प्रसाद कांबळींच्या ११ जणांचं पॅनेल तयार झालं आहे. मुंबई उपनगरासाठी पाच जणांचे पॅनेल तयार झाले. शरद पोंक्षे, अनंत पणशीकर, डॉ. गिरीश ओक, सुनील देवळेकर, मंगेश कदम, अविनाश-ऐश्वर्या नारकर, मधुरा वेलणकर, भरत जाधव अशी तगडी टीम आहे. आपला १३ कलमी कार्यक्रमही त्यांनी जाहीर करून टाकला आहे, तर राजकीय निवडणुकांप्रमाणे अपक्ष उमेदवार म्हणून राहुल भंडारे यांनी ५ अपक्ष उभे केले आहेत. या दोन्ही पॅनेलमध्ये सेलिब्रिटी व बिझी लोक आहेत. ते परिषदेच्या कामाला वेळ देऊ शकतील का? असा सवाल करत आम्ही या कामाला वेळ देऊ शकतो असं दाखवून दिलंय. राहुल भंडारेंबरोबर परिषदेच्या ज्येष्ठ गीता सोमण, सुशील आंबेकर आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान ‘आपलं पॅनेल’नं यशवंत नाटय़गृहाबाहेर मोठा बॅनर लावलाय. त्यावर अपक्ष उमेदवारांनी पत्रकार परिषद घेऊन आक्षेप घेतला आहे.