परदेशातला महाराष्ट्र!

jyotsna-gadgil>>ज्योत्स्ना गाडगीळ

‘महाराष्ट्र मंडळ!’ ही केवळ शाखा, संस्था किंवा संघटना नाही, तर परदेशात विसावलेल्या प्रत्येक मराठी माणसाचा आधारस्तंभ आहे. महाराष्ट्राबाहेर राहून मराठी संस्कृतीचे जतन संवर्धन करणाऱ्या परदेशातील अशाच काही महाराष्ट्र मंडळांचा ५८ व्या ‘महाराष्ट्र दिना’निमित्त घेतलेला आढावा…

संयुक्त महाराष्ट्र लढ्यात १०५ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्या हुतात्म्यांच्या कृपेने स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी संस्कृती सुखेनैव नांदू लागली, वाढू लागली आणि सर्वदूर पसरू लागली. देशातच नव्हे, तर परदेशातल्या मातीतही रुजू लागली, ती `महाराष्ट्र मंडळा’च्या रूपाने!

कामानिमित्त, शिक्षणानिमित्त किंवा अन्य कारणानिमित्त मराठी माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. तिथे जाऊन मराठी संस्कृतीची रुजवण करू लागला. कधी खाद्यपदार्थांच्या रूपाने, कधी साहित्याच्या रूपाने, कधी सणांच्या रूपाने, तर कधी भाषेच्या रूपाने! पैसा, वेळ आणि परिस्थितीअभावी मातृभूमीपासून दुरावलेल्या भूमिपुत्राने जिथे जाऊ तिथे आपला महाराष्ट्र निर्माण केला. `महाराष्ट्र मंडळा’ च्या छताखाली देश-विदेशातला मराठी माणूस संघटित होऊ लागला. सण-उत्सव, भेटीगाठी, स्नेहभोजन, सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम महाराष्ट्र मंडळांतर्फे राबवले जातात. प्रत्येक ठिकाणच्या महाराष्ट्र मंडळांचे नियम वेगवेगळे आहेत, मात्र मराठी माणसाचा उत्कर्ष हेच सर्वांचे ध्येय आहे.

शिकागो महाराष्ट्र मंडळ

शिकागो महाराष्ट्र मंडळाची स्थापना ही १९६९ रोजी उत्तर अमेरिकेत झाली. अमेरिकेतील हे पहिले महाराष्ट्र मंडळ. तसेच बृहन्महाराष्ट्र महाराष्ट्र मंडळाची स्थापना देखील शिकागो येथे झाली. लवकरच सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे मंडळाची वाटचाल होत आहे.

शिकागो महाराष्ट्र मंडळ दर वर्षी अनेक उपक्रम राबवते. २०१८ च्या कार्यकारिणी मंडळाने हे वर्ष आरोग्य या संकल्पनेला अर्पण केले आहे. ‘सर्वे सन्तु निरामया’ हे या वर्षीचे मंडळाचे ब्रीदवाक्य आहे. या संकल्पनेवर आधारित अनेक उपक्रम राबवण्याचा मंडळाचा निर्धार आहे.

मकरसंक्रांत, गुढी पाडवा, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी अशा हिंदू सणांच्या निमित्ताने दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सर्व मराठी बांधवांनी एकत्र यावे हा त्यामागे मुख्य उद्देश असतो. तसेच, नवीन पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी हा ही त्यातला एक महत्वाचा घटक असतो. मराठी रसिकांसाठी भारतातील उत्तमोत्तम कलाकार या निमित्ताने आमंत्रित केले जातात, खास मराठी खाद्यपदार्थ भारतातून आणले जातात, मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मंडळ नेहमीच प्रयत्नशील असते.

मंडळातर्फे नुकताच गुढी पाडव्याचा कार्यक्रम पार पडला. गुढी पाडव्याच्या निमित्ताने सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली होती. नवपरिणीत दाम्पत्याच्या हस्ते ती संपन्न झाली. त्याच दिवशी `पंडित शौनक अभिषेकींचे गायन’ सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते. मंडळातील सभासदांनी गाण्याबरोबर पारंपरिक मराठी भोजनाचाही आस्वाद घेतला. आंबेडाळ, पन्हे हे स्टार्टर होते, तर पुरणपोळी, खीर, पालकाची पातळ भाजी, बटाटा भाजी, गाजराची कोशिंबीर, मसाले भात, थंडाई, असा जेवणाचा फक्कड बेत होता. शेवटी गारेगार आईस्क्रीम खाऊन सर्वांची रसना तृप्ती झाली.

शिकागो मराठी विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी ‘अफजल खानाचा वध’ हे नाटक सादर केले. मुलांचे कौतुक करताना मंडळाच्या कार्यकारिणी सभासद जुईली वाळिंबे म्हणाल्या, ‘अफझलखान वधाचा थरार या शाळेतल्या मुलांनी अतिशय परिणामकारक रीतीने मांडला. मुलांचा उत्साह, त्यांची अतिशय सुसंगत अशी वेशभूषा, त्यांचा आवेश हे सर्व प्रत्यक्ष महाराष्ट्रात जन्म झाला नसताना सादर करणे खरंच कौतुकास्पद आहे. शिवाय, मंडळाच्या कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम, अस्सल मराठमोळा बेत, सुरेख सजावट, अप्रतिम गीतांनी सजलेली मैफिल, यांनी गुढी पाडव्याच्या हा सोहळा दीर्घकाळ स्मरणात राहील.’

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर

एखादे संस्कृत वचन वाटावे, असे मंडळाचे संक्षिप्त नामकरण-ममसिं, अर्थात महाराष्ट्र मंडळ सिंगापूर. लखलखत्या सिंगापूर बेटावरील एक चमकता दीपस्तंभ. हा दीपस्तंभ भारतातील आणि इतर दूरदूरच्या ठिकाणांवरून आलेल्या मराठी लोकांसाठी आपल्या माणसांबरोबर चार घटका गप्पागोष्टी, विचारांची देवाणघेवाण आणि सणवार व मनोरंजन करण्यासाठी एक आपुलकीचे ठिकाण आहे.

ममसिंच्या कार्यवाह मंजिरी कदम ह्यांनी सविस्तर माहिती देताना म्हटले, ‘घरापासून दूर असे आपले आणखी एक घर असे वाटणारे ममसिं हे मराठी बांधवाना एकत्र बाधून मराठी अस्मिता जपण्याचे मोठे कार्य १९९४ पासून करीत आहे. ममसिंचे जवळजवळ ९०० सक्रीय सभासद आहेत. ममसिं सुमारे ३५०० हून अधिक सदस्यांपर्यंत ईमेल वृत्तपत्राद्वारे, फेसबुकद्वारे सुमारे ५२००हून अधिक सदस्यांपर्यंत आणि सिंगापूरमधील १००० मराठी कुटुंबांपर्यंत यांच्या कार्यक्रमांद्वारे पोहोचते. मराठी समाजाला एकत्रित आणून विविध गुणांना वाव मिळवून देण्यासाठी एक मंच असलेले ममसिं म्हणजे महाराष्ट्र आणि अखिल भारताच्या समृद्ध संस्कृतीचे सम्यक दर्शन सिंगापूर रहिवाशांना घडवून आणते.

मराठी संस्कृती जपण्याच्या उद्देशाने ममसिं वर्षभरात विविध कार्यक्रम व सण साजरे करून संगीत, साहित्य, नाट्य, नृत्य कला, क्रीडा यातील कौशल्याला सादर करते, लायब्ररी आणि शाळा उपक्रम चालवते. त्याबरोबरच सिंगापुरमध्ये सामाजिक जबाबदारीची कामे देखील करते. सिंगापुरातील इतर सामाजिक संस्थांबरोबर एकत्रित कार्य करून, ममसिं एक जबाबदार नागरिक संस्था या नात्याने मराठी समाजाला स्थानिक लोकांसोबत जोडण्याचे आणि समाजातील गरजू घटकांना यथाशक्ती मदत करण्याचे महत्वाचे कार्य निभावते. यामध्ये आपण जिथे राहतो त्या समाजाचे देणे निदान काही अंशी तरी चुकते करण्याची भावना आहे.

दरमहा शब्दगंध हा स्वरचित कविताना वाहिलेला कार्यक्रम, ऋतुगंध हे ई-द्वैमासिक तसेच वार्षिक स्मरणिका हे नियमित साहित्यिक उपक्रम म्हणून चालविले जातात. शब्दगंध बैठका गेली अकरा वर्षे अव्याहत सुरु आहेत. यामुळे सभासदांच्या काव्यगुणांना वाव मिळाला आहे.

ममसिंचा स्वरगंध समूह संगीताचे विविध कार्यक्रम सादर करून सभासदांच्या कलेला मंच उपलब्ध करून देतो. शब्दगंधच्या कवितांना स्वरगंधतर्फे संगीत देऊन ममसिंच्या गायकांनी गायलेल्या गाण्यांची सुरेल मैफील २०१५ मध्ये सादर केली होती. ह्याच गाण्यांची ‘अद्वैताची गाणी’ ह्या नावाचा अल्बम ममसिंने प्रकाशित केला आहे. ममसिंने २०११ मध्ये जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद भूषविले आहे. तसेच २०१४ मध्ये एक गाजलेला रंगारंग कलामहोत्सव साजरा केला आहे. २०१७ मध्ये अजय-अतुल गाण्यांचा ‘झिंगाट’ ममसिंच्या गायकांनी सिंगापूर तसेच मलेशिया मध्ये गाजवला.

ह्या व्यतिरिक्त दर वर्षी बालगोपालांसाठी सहल, नाट्य गान, चित्रकला अशा कार्यशाळा इत्यादी उपक्रमातून नवीन मराठी पिढीकडे मराठी संस्कृतीचा वारसा सोपविण्याचे कार्य देखील ममसिं करीत आहे.’

महाराष्ट्र मंडळ फिनलँड

साधारण १०-११ वर्षांपूर्वी काही ठराविक मराठी मंडळींनी एकत्र येऊन फिनलँडमध्ये छोट्या प्रमाणात महाराष्ट्र मंडळ स्थापन केले होते. कालांतराने मंडळी वाढली तशी कार्यक्रमाला उपस्थिती वाढू लागली. कार्यक्रमांमध्ये विविधता येऊ लागली. अलीकडेच `महाराष्ट्र मंडळ फिनलंड’ ची अधिकृत नोंदणी झाली आहे. येत्या काही काळात त्यांचे संकेतस्थळही प्रकाशित केले जाणार आहे. त्या संकेतस्थळाद्वारे कोणताही मराठी व्यावसायिक नाममात्र वार्षिक वर्गणी भरून तिथे जाहिरात करू शकेल. देश-विदेशातील मराठी व्यावसायिकाला मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळवून देणे हा त्यांच्या संकेतस्थळाच्या निर्मितीचा उद्देश आहे.

मंडळाबाबत अधिक माहिती देताना मंडळाच्या सदस्या मुग्धा जोशी म्हणाल्या, `आतापर्यंत मंडळाची अधिकृत नोंदणी झाली नव्हती, तरीदेखील सर्वप्रकारे सण-उत्सव, कार्यक्रम आम्ही निर्विघ्नपणे पार पाडले. आता तर मंडळाची अधिकृत नोंदणीही झाली आहे. त्यानिमित्ताने सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचा आमचा प्रयत्न राहील. फिनलँड महाराष्ट्र मंडळाशी आज मराठी-अमराठी लोक जोडले गेले आहेत. मराठी संस्कृतीची ते कुतुहलाने ओळख करून घेत आहेत. आपल्याला लाभलेला मराठी भाषेचा, संस्कृतीचा, विचारांचा आम्ही योग्य पद्धतीने त्यांच्यापुढे आदर्श ठेवत आहोत, ह्याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. संस्कार वर्गांच्या आयोजनातून हा वारसा आम्ही पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत करत आहोत.’

महाराष्ट्र मंडळ फ्रांस

सध्या फ्रांसमध्ये महाराष्ट्रीयांची संख्या फारच कमी आहे. पण आजच्या जागतिक एकीकरणाच्या काळात मराठी तरुणांची वाढती जागतिक ओढ व आकर्षण लक्षात घेता ही संख्या वाढतच जाणार हे लक्षात घेऊन फ्रांस महाराष्ट्र मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळात केवळ महाराष्ट्रीय लोकांचाच नाही, तर अमराठी असूनही मराठी भाषिक असलेल्या लोकांचा समावेश आहे. जसे की, `भाटिया’ आणि `अय्यर’ नावाच्या अमराठी परंतु अस्खलित मराठी बोलणाऱ्या दोन कुटुंबियांनी मंडळाचे सभासदत्व घेतले.

मंडळातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रीय, भारतीय आणि फ्रेंच कुटुंबियदेखील उपस्थित असतात. गेल्या वर्षी १८ मे २०१७ रोजी फ्रान्सच्या महाराष्ट्र मंडळाचा दशकपूर्ती सोहळा पॅरिस येथे थाटामाटात पार पडला.

महाराष्ट्रातील सांस्कृतिक मूल्यांची जपणूक व त्यांचा योग्य प्रसार हा फ्रांस येथील महाराष्ट्र मंडळाचा पाया आहे. शैक्षणिक व वैज्ञानिक क्षेत्रात नवीन प्रकल्पांचा शोध व मदत, मराठी भाषा व मराठी सांस्कृतिक ठेव्याचा प्रसार व त्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन, तरुण व्यावसायिकांना आवश्यक ती माहिती मिळवून देणे व शक्य ती मदत करणे, ही त्यांची मुख्य ध्येय आहेत.
मंडळाच्या अशा व्यापक विचारांवरून, उपक्रमावरून आणि परभाषिकांनाही मराठी संस्कृतीशी जोडून घेण्याच्या प्रयत्नांतून भविष्यातील घोडदौड वेगवान असू शकेल, अशी खात्री वाटते.’

महाराष्ट्र मंडळ लॉस एंजेलिस, अमेरिका

लॉस एंजिलीसचे महाराष्ट्र मंडळ मागील ४० वर्षांपासून दक्षिण कॅलिफॉर्नियातल्या मराठी माणसांना एकत्र आणण्याचे काम करत आहे. अवघ्या काही कुटुंबांनी एकत्र येऊन सुरू केलेले महाराष्ट्र मंडळ आज हजारो मराठी लोकांना एकत्र आणणारे त्यांचे माहेरघर झाले आहे. आजच्या तारखेस महाराष्ट्र मंडळात २५० ते ३०० कुटुंब सहभागी झाली आहेत. दरवर्षी या सभासदांमधून ११-१३ सदस्यांची कार्यकारिणी निवडली जाते. ही कार्यकारिणी दरवर्षी महाराष्ट्र मंडळातर्फे सगळे मराठी सण पारंपरिक पद्धतीने आयोजित करते. लॉस एंजिलीस सारख्या मोठ्या शहरात विखुरलेल्या मराठी कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी या सणांसारखे दुसरे निमित्त नसते. याशिवाय स्थानिक कलाकारांना आपल्या कलेच्या प्रदर्शनासाठी एक मंच उपलब्ध होतो. अनेक छोट्या मोठ्या संस्थांसह मंडळ दरवर्षी आपली व्याप्ती वाढवीत आहे. आपल्या आई वडीलांचा उत्साह पाहून आज तेथील अनिवासी मराठी मुले मोठ्या संख्येने मंडळात सामील होत आहेत. मंडळाचे काही विषेश उपक्रम म्हणजे फिरते पुस्तकालय, वृत्तपत्र भरारी, दिवाळी अंक, मराठी शाळा आणि समाजोपयोगी उपक्रम मार्ग यांचा येथील मराठीवर्ग मोठ्या संख्येने लाभ घेतात. मराठी वाचनाची आवड असणा-यांना फिरते पुस्तकालय मराठी पुस्तकांचा संग्रह शुल्लक किंमतीत उपलब्ध करून देते. तसेच, मंडळाच्या चालू घडामोडी आणि भविष्यातील उपक्रम यांची समस्त माहिती त्रैमासिक वृत्तपत्र भरारी मधून मिळते.

‘मार्ग’ हा उपक्रम नवीन आलेल्या मराठी बांधवांना येथे स्थिरावण्यास मदत करण्याच्या उद्देशातून सुरू करण्यात आलेला आहे. लोकांच्या घर, गाडी यासारख्या प्रश्नांना किंवा विसा, नागरिकत्व याबाबतीतल्या अडचणीत महाराष्ट्र मंडळ मदत करण्याचा प्रयत्न करते. येथील अनिवासी मराठी मुलांना आपल्या मायबोलीची ओळख व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र मंडळ शाळा चालवते. या शाळा लॉस एंजिलीसमधे चार ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यांना भरभरून प्रतिसाद मिळतो.

अशाप्रकारे, जगभर पसरलेल्या महाराष्ट्र मंडळांमुळे मराठी माणसाचे परदेशातील वास्तव्य अनुकूल बनत आहे. मराठी भाषेला आणि मराठी भाषिकांना दिलासा मिळत आहे. मराठी संस्कृती परदेशात रुजत आहे, हे सर्व सकारात्मक चित्र पाहता महाराष्ट्रासाठी आहुती दिलेल्या १०५ हुतात्म्यांना नक्कीच समाधान लाभत असेल आणि मंगल देशा, पवित्र देशा, दगडांच्या देशा असलेल्या महाराष्ट्रालाही आपल्या भूमिपुत्रांचा अभिमान वाटत असेल.
जय महाराष्ट्र!