येथे ज्ञान-विज्ञान नांदते…

273

>>अनुराधा राजाध्यक्ष

दा. कृ. सोमण… खगोलतज्ज्ञ, पंचांगकर्ते या उपाध्या सहज वागवीत सोमण सर सर्व गणेश भक्तांना आपल्या लेखणीतून, वाणीतून डोळस उपासना करायला सांगून ईश्वर आणि विज्ञानाची सहज सांगड घालतात….

महर्षी व्यास आणि संत तुकाराम यांनी अगदी सोप्या भाषेत पाप-पुण्याची व्याख्या सांगितली आहे. इतरांना त्रास देणं म्हणजे पाप आणि इतरांना मदत करणं म्हणजे पुण्य. ईश्वर, सण-उत्सव या पूर्वापार संकल्पना काय होत्या आणि आता त्या कशा पद्धतीने आचरणात आणल्या जात आहेत? काळानुसार, परिस्थितीनुसार बुद्धीच्या कसोटीवर पारखून, त्या परंपरांचा उद्देश समजून घेऊन त्या कशा पद्धतीनं पाळल्या गेल्या पाहिजेत हा मूलभूत प्रश्न गणेशोत्सवाच्या निमित्तानं विचारावासा वाटला तो खगोलशास्त्र प्रचाराचं काम करणाऱ्या, गेली 45 वर्षं निर्णयसागर, ढवळे पंचांगाचं गणित आणि संपादन करणाऱ्या, उत्सवामागचा हेतू वैज्ञानिक दृष्टिकोनातून लोकांना समजावून सांगणाऱ्या दा. कृ. सोमण यांना.

ते म्हणाले, ‘माणूस निर्माण झाला तेव्हा पूर, भूकंप, वादळ, अतिवृष्टी, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींची त्याला भीती वाटायला लागली. या भीतीपोटी ईश्वराची संकल्पना अस्तित्त्वात आली. पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूतं शांत राहिली तर आपण सुरक्षित राहू असं त्याला वाटायला लागलं. मग त्यांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ संस्कृती जन्माला आली. त्यात वाहिलेल्या सगळ्याच गोष्टी पंचमहाशक्तीपर्यंत पोहचतात या भावनेतून त्यात बळी देण्याची प्रथा सुरू झाली. खरं तर चैतन्य म्हणजे ईश्वर, जो चराचरात आहे. त्यामुळे चैतन्याचा बळी देऊन ईश्वराला प्रसन्न करून घेता येणार नाही असा विचार नंतर समाजप्रबोधन करणाऱया लोकांनी रुजवायला सुरुवात केली. पण अजूनही लोक रूढी आणि परंपरांमध्ये इतके अडकलेले आहेत की त्या पाळत असताना त्यामागचा उद्देशच ते विसरून जातात.

भाद्रपदात शेतात धान्य तयार होतं. पृथ्वीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे गणपती हे कितीजणांना माहीत आहे. म्हणूनच पार्थिव गणेशपूजन असं पंचांगात लिहिलेलं असतं. पृथ्वीची कशी पूजा करणार म्हणून प्रथम पूजन करायच्या गणपतीला नदीकिनारी असलेल्या मातीतून निर्माण करायचं, तिथेच त्याची पूजा करायची आणि लगेच तिथेच विसर्जन करायचं अशी पद्धत होती. अजूनही दक्षिण हिंदुस्थानात हीच प्रथा आहे. आता आपण मूर्ती बाहेरून आणतो. आप्तेष्ट, मित्रमंडळी त्यानिमित्तानं येतात. सणांचा उत्सव होतो तो असा. आपले सगळे सण आरोग्याला प्राधान्य देऊन तयार केलेले आहेत. श्रावण महिना उपवासाचा का तर या महिन्यात शेतीचं काम झालेलं असतं. माणसं घरात असतात. चलनवलन कमी झालेलं असतं म्हणून हलका आहार हवा यासाठी हा उपाय. मनात आलं, सध्या मंडळी उपास करतात ते कसे? साबुदाणे, शेंगदाणे, थालीपीठ खाऊन. मग होतं पित्त आणि येतं आजारपण. मूळ उद्देश समजून न घेता परंपरांचं अंधानुकरण केलं की हेच होणार ना. मांसमच्छी पचायला जड म्हणून आणि कांदा-लसूण खाऊन गॅसेस होतात म्हणून श्रावण महिन्यात ते वर्ज्य करावेत असं सांगितलं गेलं आहे. पण हा हेतू न जाणणारी मंडळी जिवावर आल्यासारखी प्रथा पाळतात.लोकांना शिस्त लागावी म्हणून पाप-पुण्याच्या कल्पना अस्तित्वात आल्या आणि प्रथा सुरू झाल्या.

विषय गणेशोत्सवाच्या आजच्या स्वरूपाकडे जेव्हा वळला तेव्हा सोमण सर म्हणाले, ‘खरं तर जो पूजा करतो त्याच्या व्यक्तिमत्त्वात चांगला बदल होणं हे पूजेनंतर अपेक्षित आहे. व्यसनाधीन माणसानं व्यसनमुक्त होण्यासाठी प्रयत्न करणं, आळस घालवून उद्योगी होणं यात पूजेचे साफल्य आहे. गणपतीनं असुरांचे निर्दालन केलं, तसं या कलियुगात अज्ञान, आळस, अंधश्रद्धा, अनीती या मनातल्या राक्षसांचा नाश आपल्याला करता यावा अशी क्षमता या गणपती पूजनानंतर आली पाहिजे. स्नानानंतर शरीर स्वच्छ झालं नाही तर जसा त्या स्नानाचा उपयोग नाही तसाच पूजेनंतर माणसातल्या विचारात परिवर्तन आलं नाही तर काय उपयोग? कारण केवळ पूजेचा उपचार करून सुखी आणि समाधानी किंवा श्रीमंत होता आलं असतं तर देवळातले सगळे पुजारी तसे व्हायला हवे होते ना. गणपती चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती आहे. केवळ पूर्वापार करत आलो म्हणून प्रथापालन बंद व्हायला हवं. गणपती पूजेच्या वेळी लागणाऱ्या पत्री दूर्वा या औषधी वनस्पती आहेत. त्या पूजेला लागणार म्हटल्यावर लोक त्या आपल्या दारात लावतील अशी अपेक्षा पूर्वजांनी ठेवली. पण सध्या आपण काय करतो? बाजारातून त्या विकत आणतो. त्यासाठी किती झाडांना हे विक्रेते ओरबडत असतील याचा विचारसुद्धा आपण करत नाही.

आपले सण हे निसर्गाचं रक्षण करण्यासाठी आहेत, भक्षण करण्यासाठी नाहीत. गणपती विसर्जनामुळे जलप्रदूषण होऊ नये, लाऊडस्पीकरवर आरत्या, गाणी लावून ध्वनिप्रदूषण करू नये, फटाक्यांनी वायुप्रदूषण करू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. आरत्या आर्त स्वरात म्हणणं अपेक्षित असतं. खरं तर सध्या अगरबत्तीचा धूर हा सिगारेटच्या धुराइतकाच घातक आहे. कारण त्यात केमिकल्स असतात. या सणात, उत्सवात दानधर्म करायला हवं कुणा गरीबाला. पूर्वी ब्राह्मण गरीब होते. प्रत्येक कथेमध्ये सुरुवातीला वाक्य लिहिलेलं असायचं. एका गावात एक गरीब हडकुळा ब्राह्मण राहत होता म्हणून त्यांना दान देण्याची प्रथा होती. आता गरीब जो असेल त्याला ते दिले पाहिजे आणि हे दान एका हातानं दिलं तर दुसऱया हाताला कळणार नाही असं असलं पाहिजे. ढग मूकदान पावसाच्या रूपात देतात म्हणून तर ते सगळ्या जगाच्या वरच्या स्थानावर असतात. पूजा करणं म्हणजे भोंदू असणं नाही तर ज्याची आपण पूजा करतो त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं असतं म्हणून पितृ पक्षात आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं. नवरात्रीत आदिशक्ती म्हणजेच निर्मितीशक्तीचं, आषाढ अमावस्येला दिव्यांचं पूजन करायचं. पूर्वी पावसाळ्यात घरातली वीज गेल्यानंतर दिवे लावता यावेत यासाठी ते दिवे घासून-पुसून योग्य स्थितीत आहेत की नाहीत हे पाहणं हाही त्यामागचा उद्देश होताच.’

वैज्ञानिक आणि संस्कृत पुस्तकांचं भांडार असणारं दा. कृ. सोमण यांचं घर. त्यांच्या घरात त्यांनी आवडीने केलेली स्लाइडिंग बाग ज्यात विविध भाज्या आणि फुलझाडं. सकाळी साडेचार वाजता त्यांचा सूर्योदय होतो आणि लोकाच्या विचारांना प्रकाश देण्यासाठी त्यांचं लिखाण सुरू होतं. वयाची साठी झाली तेव्हा त्यांनी 60 मोफत व्याख्यानं देऊन वाढदिवसाचं वर्ष साजरं केलं. ठाणे विज्ञान परिषदेचे ते अध्यक्ष आहेतच, पण लोकांच्या मनातली प्रथा-परंपरांची भीती नष्ट करण्यासाठी ते सातत्यानं सण-उत्सव यामागच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या संदर्भातली व्याख्यानं देत असतात. मुलगा इंजिनीयर, मुलगी डॉक्टर. दोघंही अमेरिकेत. म्हणून दरवर्षी दोन- अडीच महिने ते सपत्नीक तिकडे जातातच. घरातल्या माणसांची मनं जुळली की घर तयार होतं असं त्यांचं म्हणणं. आज घराघरातला संवाद कमी झाला आहे. या गणेश उत्सवाच्या निमित्तानं माणसांनी मनानं जवळ येणं गरजेचं आहे असं मलाही वाटतं. सोमण सरांशी बोलताना हे जाणवत होतं.

हिंदुस्थानी सणांचं वैशिष्ट्य हेच आहे की प्रत्येक सणामागे उत्तम विचार आहे. पण सध्या विचारांना समजून न घेता कालबाह्य प्रथा अनुकरण्याचा आणि त्यात सुधारणा करण्याऐवजी अविचारी पायंडा पडण्याचा प्रयत्न चाललेला आहे. चप्पल न घालता गणपतीला जाणं, नवरात्रीला एकाच रंगाचे कपडे सगळ्यांनी घालणं वगैरे. पूजा, भक्ती, आदर्शाची करावी. नाहीतर पूजा करण्याला काही अर्थ नाही. श्रीकृष्णाची पूजा करताना विष्णुसहस्रनाम म्हणत हजार तुळशीची पानं वाहण्यापेक्षा त्या तुळशीच्या पानांचा काढा आपण सगळ्यांनी प्यायला तर…! जो विचार मी गेल्या श्रीकृष्ण जयंतीला घरात बोलून दाखवलाच आहे. महाशिवरात्रीला पिंडीवर दूध ओतून गटारीत वाहू देण्यापेक्षा एका भांडय़ात ते साठवून, गरम करून गरीब मुलांना प्यायला दिलं तर…! आरती म्हणताना योग्य शब्द, योग्य सुरात आणि अर्थ समजून घेऊन म्हटले तर…! कुठल्याही शुभकार्याची सुरुवात गणपतीपासून करण्याचा प्रघात आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्तानं या बुद्धी देवतेला स्मरून, स्वतःच्या बुद्धीला जोखण्याची आणि पारखण्याची वेळ आली आहे असं नाही का वाटत…!

summary- article about d k soman by anuradha rajadhyaksha

आपली प्रतिक्रिया द्या