चोखंदळ योगेश

1

>> शेफ विष्णू मनोहर

अभिनेते.. चित्रकार योगेश देशपांडे. अभिनयाबरोबरच लेखन, चित्रकला आणि बरंच काही सुरू असतं…

योगेश देशपांडे यांची माझी भेट बऱयाच वेळा होते. मुळात तेही चित्रकार असल्यामुळे आमच्या दोघांचं चांगलं जमतं. उत्कृष्ट चित्रकारितेबरोबर अँकर, लेखन आणि अभिनय अशा वेगवेगळय़ा भूमिका पार पाडत असताना त्यांची माझी भेट ‘66 सदाशिव’ या चित्रपटाच्या निमित्ताने झाली. हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला मराठी चित्रपट.

आपण आज ‘रोटी-शोटी और कबाब’ या थीम रेस्टॉरेन्टमध्ये जाऊयात. इथली थीम त्याला आवडण्याचं कारण म्हणजे तिथे घोडय़ांची पार्क तयार केलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला व्हेजिटेरीयन बारबेक्यूचा आनंद लुटता येतो. आल्याबरोबर सूप घेताना त्या बाजूला असलेला ‘पत्थर के पनीर’ नावाचा पदार्थ योगेशला खूप आवडतो. याचं कारण असं की, हा पदार्थ प्लेटमध्ये सर्व्ह करत नाही तर आपल्याला डायरेक्ट त्या गरम दगडावरून पनीरचा तुकडा टूथपीकने घ्याला लागतो. पत्थर के पनीर घेऊन आम्ही आमच्या गप्पांना सुरुवात केली. बसल्याबरोबर मी तर त्याला पहिले म्हटलं की, आपली मैत्री होण्यामागचं मोठं कारण म्हणजे तुझा आवाज! त्यावर तो हसून म्हणाला, जसं तुमच्या रेसिपी तुमचं धन आहे तसाच माझा आवाजसुद्धा माझं धन आहे समजा.

पदार्थांच्या आवडी-निवडीबाबत विचारलं असताना तो म्हणाला की, माझा खूप वर्षांपासूनचा एक प्रश्न आहे की, पिझ्झा, ब्रेड, पास्ता नेमका कशानी खावा? हे कोडं मला अजूनपर्यंत सुटलेलं नाही, याचं कारण पत्थर के पनीर खायला आम्हाला टूथपीक दिलेल्या होत्या. मी म्हटलं, तसं तर हा अभ्यासाचा प्रश्न आहे, पण अभ्यासापेक्षा शोधाचा सुद्धा विषय होऊ शकतो. ही माहिती नुसतीच न सांगता मी त्याला दाखले द्यायला लागलो. तर तो हात जोडून म्हणाला, पुरे…रे…बाबा… माझ्यामते शेवटी हेच खरं की भूक लागल्यावर उजव्या हाताने खायचं. ऐवढं म्हणेस्तोवर आमच्या समोर कोबी मंचुरीयन, रोटी-शोटी और कबाब, क्रिस्पीकॉर्न, हॉट मँगो बाईट असे वेगळय़ा रंगाचे व चवीचे पदार्थ पुढय़ात यायला लागले. त्यावर ताव मारता मारता आमच्या गप्पा पुन्हा सुरू झाल्यात.

पुढे तो म्हणाला, खरं सागू का? माझ्यासाठी जगातल्या कुठल्याही जेवणापेक्षा घरचं वरण-भात, भाजी-पोळी, चटणी कोशिंबीर हे महाराष्ट्रीयन जेवण खूप आवडते. बायको उत्तम स्वयंपाक करते, पण एखादे वेळी एखादा पदार्थ बिघडला तर मी मुद्दाम तिचं कौतुक करतो यावरून तिला काय समजायचं ते समजते आणि माझ्या स्वतःच्या बाबतीत म्हटलं तर मी तीन पदार्थ खूप छान बनवतो. मुळात असं आहे की, आपण एखादे काम आवडीने केलं तर ते चांगलंच होतं. म्हणून कोबीची भाजी, टोमॅटो, कांदा, कोशिंबीर आणि मुगाची खिचडी हे माझे आवडते पदार्थ. हे पदार्थ मी डोळय़ावर पट्टी लावून जरी बनविले तरी ते छानच होतील हे मी कौतुकाने सांगतो.

बोलता बोलता त्याने एक किस्सा सांगितला की, युरोपमध्ये असताना मला बाकी तेथील पदार्थ काही आवडले नाही, म्हणून मी मनाची तयारी केली की युरोपात पुढील 15 दिवस आपल्याला पाव, ब्रेड, ऑम्लेट, सॉस आणि सॅलड हेच खायचे आहे. म्हणतात ना, की गरज ही शोधाची जननी असते. त्या उक्तीनुसार मला या कॉम्बिनेशनमधल्या बऱयाच रेसिपी तिथे सुचल्या. घरी असताना मला ठरलेले पदार्थ आवडतात. न्याहारीला भरपूर कांदे घातलेले कांदे-पोहे, जेवणात भरलेलं वांग व मेथी-पालकाची पातळ भाजी आणि डोळे मोठे करून म्हणाला आळूचं फदफद नाही!

जाता-जाता म्हणाला की, मलासुद्धा इतर सेलिब्रेटीप्रमाणे स्वतःचं रेस्टॉरेंट काढायला आवडेल. मी जागासुद्धा शोधायला सुरुवात केलेली आहे. तेवढय़ात आमच्या समोर कोळसा भरलेली एक शेगडी आली. त्याबरोबर पनीर, मशरुम, भाज्या यांना वेगवेगळे मसाले लावून तयार केलेल्या सळय़ासुद्धा आल्या. हे खाल्ल्यावर आम्ही आमचा मोर्चा जेवणाकडे वळवला. जेवणसुद्धा गमतीशीर होतं, म्हणजे असं की पंजाबी जेवणाबरोबर चक्क मेतकूट भातसुद्धा ठेवला होता. शेवटी गोडामध्ये आंब्याचा रस घालून तयार केलेला एक सुंदर भाताचा प्रकार खायला मिळाला. अन्नदाता सुखी भवः असं म्हणत मी योगेश देशपांडेंबरोबरची आजची डिनर डेट संपवली.

कांदे पोहे
साहित्य – 2 वाटय़ा भिजवलेले जाड पोहे , 1 चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 2 चमचे बारीक चिरलेली मिरची, 1 वाटी चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ, लिंबू , साखर चवीनुसार, कोथिंबीर.
कृती – पोह्यांना कुस्करून चुरा करून घ्या. एका पॅनमध्ये बारीक चिरलेला कांदा फोडणीला घालून त्यात हिरव्या मिरच्या, हळद, तिखट घालून थोडा पाण्याचा हबका मारा व एक वाफ येऊ द्या. नंतर गरम गरम खायला द्या.

फ्लॉवरची भाजी (सुकी)
साहित्य – 2 वाटय़ा फ्लावरचे तुरे, 1 चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, हळद, तिखट चवीनुसार, मीठ अर्धा चमचा आमचूर पावडर, कोथिंबीर..
कृती – काही भाज्या अशा असतात की त्यांना मुळातच स्वतःची एक चव असते. त्यामुळे या भाजीत कांदा, लसूणचा वापर केलेला नाही. सर्व प्रथम फ्लॉवरचे तुरे तोडून धुऊन मंद आचेत तेलात तळून घ्या. दुसऱया एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ व आमचूर घालून मसाला चांगला परतून घ्या. वाटल्यास थोडी कोथिंबीरसुद्धा घाला. यानंतर तळलेला फ्लॉवर टाकून एकत्र करा.

[email protected]