कोण हे नागू सयाजी?

4

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईतील प्रभादेवी भागात नागू सयाजी वाडी आहे. हे नागू सयाजी कोण? त्यांनी असे काय केले की, त्यांचे नाव या वाडीला लाभले ते जाणून घेऊयात या विशेष लेखातून?

१८ व्या शतकाच्या शेवटी तेलुगू भाषा बोलणारे कष्टकरी मुंबईत आले. त्यांना ‘कामाठी’ म्हणत. ते नागपाडय़ाच्या पलीकडे दलदलीच्या खार जमिनीवर झोपडय़ा बांधून राहात. भरतीच्या वेळी पाणी, ओहोटीच्या वेळी दमट जमीन, अशा क्षेत्राला इंग्रज फोरास म्हणत. त्याच्यावर जो रस्ता झाला तो ‘फोरास’ रोड. मुंबईचा विकास व्हायला लागला. पक्के रस्ते व्हायला लागले. रेल्वे झाली. गिरण्या- कारखाने व्हायला लागले. त्यामुळे बांधकामांना बहर आला. त्यामध्ये ‘कामाठी’ लोक मजूर म्हणून काम करीत. गिरण्या, रेल्वे, मोठे पोस्ट, बँका, विद्यापीठ, कोर्ट, नगरपालिका अशी मोठाली बांधकामे, बंधारे, मैदाने वगैरे या मजुरांच्या कष्टाने उभ्या राहिल्या. त्यातले काही बांधकाम कंत्राटदार झाले. त्यातलेच एक नागू सयाजी. त्यांच्या कामावर खूश होऊन इंग्रजांनी त्यांना ‘रावसाहेब’ ही पदवी दिली.

सध्या आपण जुने सेक्रेटरियट पाहतो त्यात सध्या वेगवेगळी कार्यालये आहेत. त्या वेळी गव्हर्नरांचे सगळे सेक्रेटरी याच इमारतींतून कामकाज पाहत. गव्हर्नरचे वास्तव परळला सध्या ‘हाफकिन’ आहे तिथे होते. हे काम नागू सयाजींनी केले. त्यासाठी परदेशातून मजूर आणण्याचा विचार चालला होता. पण नागू सयाजींनी कामाठी मजुरांच्या सहाय्याने काम यशस्वी करण्याची हमी दिली आणि ते अत्यंत उत्तम पार पाडले. कामाला १२ लाख ८० हजार ७२१ रु. लागतील असे धरले होते. नागू सयाजी यांनी २० हजार वाचवले.

यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठाचे गंथालय व राजाबाई टॉवर या इमारती बांधल्या. सेक्रेटरीयटच्या जवळच्या हायकोर्टाची इमारतही नागू सयाजी यांनी बांधली. माझगावातील भंडारवाडा येथे नगरपालिकेच्या पाणीसाठ्याचे बांधकाम त्यांनी केले. मुंबई बंदरातील अनेक अवघड कामे त्यांनी पार पाडली. महात्मा फुले यांच्याशी त्यांचे जिव्हाळय़ाचे संबंध होते. ८ जून १८९० रोजी पक्षाघाताच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.