नीलकंठ

2

>> विद्या कुलकर्णी

नीलकंठ. निळय़ा–नारिंगी रंगाचा सुंदर मिलाफ म्हणजे या अस्सल हिंदुस्थानी पक्ष्याचे आकर्षक सौंदर्य.

निळ्या आणि नारींगी रंगाचा सुंदर अविष्कार व हवेमध्ये अतिशय आकर्षक गिरक्या घेणारा असा पक्षी म्हणजे नीलपंख / नीलकंठ. नीलपंख हा नावाप्रमाणे देखणा पक्षी! ‘इंडियन रोलर’ अशी याची इंग्रजीतील ओळख. जवळजवळ संपूर्ण हिंदुस्थानात आढळणारा कबुतराएवढय़ा आकाराचा हा पक्षी त्याच्या रंगसंगतीने लक्ष वेधून घेतो. ह्या पक्ष्याचे दर्शन झाले तर त्या माणसाचे भाग्य उजळून त्याला चांगले दिवस येतात असे मानले जाते. नीलपंख हा कर्नाटक, ओरिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश व वर्धा राज्यांचा राज्यपक्षी आहे. हे पक्षी हिंदुस्थानात सर्वत्र आढळतात. तसेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार येथेही त्यांचे वास्तव्य आहे. रंग आणि आकारावरून याच्या किमान तीन उपजाती आहेत. ते शेते, विरळ जंगले, गवताळ प्रदेश येथे वास्तव्य करतात.

हिंदुस्थानी नीलपंख
या पक्ष्याचे वजन 150 ग्रॅम्स असून त्यांची लांबी 26 – 27 से.मी. असते. डोक्यावर निळसर रंगाची टोपी, साधारण याच रंगातील पोट असते. त्यांची छाती आणि पाठ तपकिरी-तांबूस रंगाची असते. पंखाखाली गडद निळा, फिकट निळा आणि पांढरा अशा तीन रंगांचे पट्टे असतात. एखाद्या जागी स्थिर बसलेला नीलपंख जेवढा प्रेमात पाडतो, याहून तो उडू लागला, की त्याचे हे दडलेले रंग पाहणाऱयाला थक्क करून टाकतात. त्यांची मान व गळ्यावर जांभळ्या रंगांच्या छटा असतात. डोळ्याभोवतील भाग गेरुसारखा पिवळसर तपकिरी रंगाचा असतो. त्यांची पुढची तीन बोटे एकत्र जोडलेली असतात व चोच लांब असून तिचे टोक आकड़य़ासारखे वाकडे असते. नर व मादी सारखेच दिसतात.

असा हा नीलपंख गावा-शिवारापासून ते पाणथळीचे प्रदेश, जंगल-राई सर्वत्र आढळतो. फांद्यांवर किंवा तारेवर बसून तो सभोवतालची टेहळणी करतो. तेथून जमिनीवर झेप घेऊन तिथला किडा घेऊन परत आपल्या जागी येतो किंवा दुसऱया एखाद्या ठिकाणी जाऊन त्या किडयाचा निकाल लावून त्याला खाऊन टाकतो. पिकांचा नाश करणाऱया कीटकांना हा खाऊन टाकीत असल्यामुळे तो शेतकऱयांचा मित्र आहे.

मार्च ते जुलै महिना हा काळ हिंदुस्थानी नीलपंखचा प्रजननाचा काळ असून गवत, काडय़ा वगैरे वापरून झाडाच्या ढोलीत, भिंतीतील छिद्रात तो आपले घरटे बांधतो. या काळात नर मादीसमोर नाना प्रकारचे हवाई खेळ करून दाखवितो. कधी कधी तो खूप उंच उडतो व डोके खाली करून व पंख मिटून अग्निबाणासारखा खाली येतो. कोलांटय़ा उडया मारतो. हे सर्व कसरतीचे खेळ चालू असताना कर्कश्य आवाज काढतो व पसरलेल्या पंखांमुळे त्याचे मनोवेधक रंग सूर्यप्रकाशात चमकतात. मादी एकावेळी 4 ते 5 पांढरी शुभ्र लंबगोल आकाराची अंडी देते. मादी 17 ते 19 दिवस अंडी उबवते. साधारण एक महिन्याने पिल्ले स्वतंत्र होतात. नर व मादी दोघे मिळून पिल्लांचे संगोपन करतात. हे पक्षी सकाळी जागे झाल्यावर प्रथम आपले अंग चोचीने साफ करतात व मगच आजूबाजूच्या परिसरात बागडण्यास बाहेर पडतात. हे पक्षी उघडया पाण्यात सूर मारून अंघोळ करतात. ह्या पक्ष्यांचे आयुष्यमान 17 वर्षापर्यंत असते.

युरोपियन नीलकंठ
युरोपियन नीलकंठ ह्या पक्ष्यांचे प्रजनन युरोपमध्ये ओक, पाइनच्या जंगलात होते. इतर वेळी ते उष्ण प्रदेशात स्थलांतर करताना आढळतात. हे पक्षी मध्य पूर्व, मध्य आशिया, मोरोक्कोमध्ये आढळतात. हे पक्षी गुबगुबीत असून त्यांची लांबी 29 – 32 सें. मी. असते. पंखांचा पिसारा 52 – 58 सें. मी. असतो. ह्या पक्ष्याचा रंग मुख्यत्वे निळा असून पाठीकडील भाग नारिंगी – तपकिरी रंगाचा असतो. ह्या पक्ष्यांचे राहणीमान हिंदुस्थानी नीलपंख प्रमाणेच असते.

ह्या पक्ष्यांची फोटोग्राफी मी बऱयाच जंगलांमध्ये केलेली आहे, परंतु एक प्रसंग मी कधी विसरू शकणार नाही. राजाजी जंगलामध्ये सफारीतून जात असताना, अचानक सापाचे पिल्लु चोचीमध्ये घेतलेला नीलपंख पक्षी दिसला. आम्ही तिथेच फोटो घेण्यासाठी थांबलो, नीलपंख त्या पिल्लाला इतक्या क्रूरपणे खेळवत होता, त्याला सर्व शरीरभर चोचीने जखमा करीत होता, क्षणभर कसेतरीच वाटले. जीवो जीवस्य जीवनम् हेच खरे !!

[email protected]