पेर्ते व्हा…

991

>> आसावरी जोशी

आपल्या हवामानखात्याची पावसाच्या अनुमानावरून नेहमीच थट्टा केली जाते. पण थोडी संवेदनांची तार निसर्गाशी जोडून पाहूया… निसर्गाने पशु–पक्ष्यांकरवी आपल्यापर्यंत पोहोचविलेले ऋतुमानाचे संकेत कधीही चूकत नाहीत.

उन्हाची काहिली असह्य होऊन पावसाचे वेध लागले आहेत. हवामान खात्याचे अनेक अंदाज, तर्क रोजच्या रोज वृत्तपत्रांतून, वाहिन्यांवरुन वाचायला, ऐकायला मिळत आहेत. मान्सूनपूर्व पाऊस, वळिवाचा पाऊस, मान्सून कधी येणार…कुठे पोहोचला…त्यापूर्वीची वादळे…त्यांचे तानमान इ.इ.बहुतेकदा हे मानवी अंदाज चुकतातच. पाऊस त्याने ठरविलेल्या कालपत्रकानुसारच येत असतो…आणि हे त्याचे कालपत्रक असते निसर्गाकडे…पशुपक्ष्यांकडे.. या निसर्ग जिवांचे अंदाज सहसा चुकत नाहीत…अतिशय इमाने इतबारे हे अंदाज ते आपल्याला विविध संकेतांतून देत असतात. फक्त ते संकेत समजून घेण्याइतका वेळ, संवेदनशीलता आपल्याकडे हवी.

 पशुपक्ष्यांना साधारणतः दीड-दोन महिने आधीपासूनच ऋतुबदलाची चाहूल लागण्यास सुरुवात होते. आणि तेव्हापासूनच त्यांच्या संकेतांनाही सुरुवात होते.

 पाऊस सर्वप्रथम पक्ष्यांना चाहूल देतो. शिवाय संभाव्य हवामानाचे, दुष्काळाचे , ऋतुमानाचे अचूक संकेत त्यांना मिळत असतात आणि त्यानुसार त्यांच्या दिनक्रमात बदल होत असतात.

 पाऊस येणार असल्याची चाहूल आफ्रिकेतून आलेल्या चातक पक्ष्यांना सर्वात आधी लागते. पावसाच्या तानमानानुसार चातक पक्ष्याचे आगमन हिंदुस्थानात होते आणि पाऊस पडण्याच्या सुमारास तो त्याच्या सांकेतिक स्वरात ओरडू लागतो.

 पेर्ते व्हा…असे सांगणारा पावशा ओरडू लागला की हाडाचा शेतकरी शेतीच्या कामास सुरुवात करतो.

 माळरानावर, शेतावर तित्तर पक्ष्यांचे थवे ओरडू लागले की डोळे मिटून येणाऱया पावसावर विश्वास ठेवावा. तित्तर पक्षी नेहमी माणसांना धरुन राहतात.

 कावळ्याने मे महिन्यात गृहबांधणी सुरू केली की पावसाचा अंदाज बांधता येतो. कारण पावसापूर्वी त्यांना त्यांच्या बाळांसाठी एक पक्के घरटे बांधायचे असते. सहसा कावळा झाडाच्या टोकावर घरटे बांधत नाही. पण त्याने तसे केल्यास त्यातून दुष्काळाचे स्पष्ट संकेत मिळतात.

 खूप पूर्वी कावळ्याने किती अंडी घातली यावरही पावसाचे तानमान समजत असे. जेवढी अंडी जास्त तेवढा पाऊस जास्त.

 पावसाच्या विलंबाची चाहूल टिटवी पक्ष्याला लागते. त्यावर तिचा विणीचा हंगाम ठरतो.

 समुद्राच्या अस्वस्थ हालचाली पावसाचा अचूक अंदाज सांगतात.

 किटकांचे जीवनचक्र तर हवामानतज्ञांच्या सर्वतोपरी उपयोगाचे असते. हजारोंच्या संख्येने काळ्या मुंग्यांची लगबग सुरु झाली की पाऊस नक्की पडणार.

 लाकूड पोखरणाऱ्या वाळवीला कधीही पंख फुटत नाहीत. पण पावसाळ्यापूर्वी वाळवीचे थवेच्याथवे बाहेर पडतात आणि हवेत उडू लागतात. तो त्यांचा प्रजननाचा काळ असतो.

 साप-नाग यांसारखे अनेक सरपटणारे प्राणी सर्रास बाहेर पडताना दिसू लागले की ती पावसाची चाहूल समजावी. बिळात पाणी शिरण्यापूर्वीच ते उंच जागांचा आश्रय शोधतात.

 पावसाचे अंदाज हरीण आणि वाघ अतिशय अचूक बांधतात. पाऊस येणार नसेल तर हरिणी पिलांना जन्म देत नाहीत. तीच गोष्ट वाघिणीची. पावसास विलंब होणार असेल विशिष्ट पाला खाऊन वाघीण गर्भपात करवून घेते.

 वृक्षांमधील बदलांतूनही पावसाचे संकेत मिळतात. मराठवाड्यात बिब्ब्याच्या झाडाला बहर येणे म्हणजे अवर्षण. खैर आणि शमीच्या वृक्षांना फुलोरा आल्यास त्यावर्षी पाऊस कमी पडतो. कवठाचा बहर वादळाचे संकेत देतो.

 अवकाशाच्या रंगात होणारे बदल नाविकांसाठी, अत्याधुनिक बोट चालकांसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरतात. सकाळी आकाश लाल असेल तर तो नाविकांना धोक्याचा इशारा असतो. तेच संध्याकाळचा लाल रंग सुखावणारा असतो. कारण या लालस छटेवर वादळाचे तानमान अवलंबून असते.

 रातकिडे तापमापकाचेही काम करतात. उष्ण वातावरणात रातकिडे खूप वेगाने वाढतात आणि हवा थंड झाली की त्यांचा वेग मंदावतो.

निसर्गाशी आपला अतूट बंध. प्राणी-पक्ष्यांनी, झाडा-फुलांनी तो अगदी सहज स्वीकारला आणि अंगीकारलाही…पण माणसाने मात्र वेगळाच मार्ग धरला..प्रगतीच्या, विकासाच्या नावाखाली राक्षसी हव्यासाचा…लालसेचा…यातूनच बुद्धिमत्तेच्या नावाखाली त्याच्यातील असूर वृत्ती बळावू लागली. जी निसर्गाच्याच मुळावर उठली. लाकडाच्या, जागेच्या हव्यासापोटी त्याने बेसुमार अरण्यतोड सुरू केली. कृत्रीम वणवे अरण्यात वारंवार लागू लागले. केवळ आपल्या शहरांपुरतेच….अगदी, शहरांच्या रस्त्यांपुरतेच पाहायचे झाले तर मे महिन्याच्या मध्यावरच रस्त्यावरचे डेरेदार वृक्ष निर्दयपणे छाटून टाकले जातात. कारण पुढे केले जाते पावसाने-वाऱयाने फांद्या पडतात. पण फांद्या कमी करणे वेगळे आणि अमानुषपणे छाटून टाकणे वेगळे. याच फांद्यांवर असंख्य पक्षी मुंबईत निवासाला असतात. अरण्यावरील मानवी अतिक्रमण हा पूर्वापार चालत आलेला संघर्ष आहे. आणि त्यात अमानवी वृत्ती अरण्यावर आसुरी विजय मिळवीत आहे. समुद्राची तर व्यथाच वेगळी. या साऱया भयंकर अतिक्रमणात हे निसर्गाचे संकेत कुठल्याकुठे विरुन जात आहेत. आपला निसर्गाचा ठेवा आपण सांभाळला तर हे निसर्गदान कधी आटणार नाहीच. भरभरून उधळण मात्र आपल्यावर होत राहील…निरपेक्ष भावनेने…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या