घरगुती हिंसेला पगारी रजेचे मलम

>> आश्लेषा महाजन

घरगुती हिंसाचार हा एक विरोधाभास आहे. घर म्हणजे मायेचा आसरा, अशी आपली समजूत असते. प्रेमविवाहानंतर, ठरवून केलेल्या लग्नानंतर अथवा हल्लीच्या काळात लीव्ह इन रिलेशनशिपच्या निर्णयानंतर दांपत्य एका छाताखाली राहू लागते. नव्याचे नऊ दिवस संपले की खूप जोडप्यांना एकत्र राहणे शिक्षाच होते. जीवनमान, मते, मूल्ये, स्वभाव यांत तफावत असते. मग पटत नाही. काहींच्या बाबतीत केवळ लैंगिक गरज भागवण्याचा समाजमान्य आसरा, एवढाच सांगाडा उरतो. काही जोडपी तर इतकी दुरावलेली असतात की अस्पर्श जीवन त्यांच्या वाटय़ाला येते. प्रत्येक वेळी घटस्फोट घेणे शहाणपणाचे नसते. कधी मुलांच्या संगोपनाचा प्रश्न असतो, कधी प्रतिष्ठsचा. कधी संपत्तीचा तर कधी अहंकाराचा. घटस्फोट घेणे, मग एकटे राहाणे वा पुनर्विवाह करणे अथवा नवा प्रियकर/प्रेयसी शोधणे या गोष्टी सोप्या नसतात. नवा डाव मांडून पुन्हा नवे चटके सोसण्यापेक्षा निरुपायाने एकत्र राहणे क्रमप्राप्त ठरते. हे विरूप जीवन नैराश्यात, विमनस्कतेत, आक्रमकतेत रूपांतरित होते. सहनशक्तीचा कडेलोट झाला की आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका घेतलेल्या व्यक्तींची शारीरिक वा मानसिक हिंसा करण्यापर्यंत मजल जाते. ‘नातिचरामि’चे बेधडक उल्लंघन करून छळ केला जातो. या घरगुती हिंसाचारात सर्वाधिक बळी पडते ती बाई!

हिंदुस्थानात ऑक्टोबर, २००९ मध्ये ‘कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा’ झाला. बाईला कुटुंबात मारहाण, शिवीगाळ, हुंडय़ासाठी धमकावणे, घरातून हाकलणे, दारू पिऊन मारहाण, तिचे पैसे, दागिने लुबाडणे, तिच्या कामाच्या ठिकाणी जाऊन तमाशा करणे इत्यादी प्रकारांनी त्रास दिला जात असेल तर तिला हा कायदा संरक्षण देतो. संरक्षण अधिकारी, पोलीस, वकील, डॉक्टर, समाज कार्यकर्ते वा स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने तिला संरक्षण व छळणाऱया व्यक्तीस शिक्षा देण्याची त्यात तरतूद आहे. अशा प्रकारे कायदा करावा लागणे हे दुर्दैव होय. घरची लक्तरे वेशीवर टांगण्याचाच हा प्रकार, पण घरची लक्तरे घरी वाळत नाहीत, त्यासाठी बाहेरून येणारा सूर्यप्रकाश आणि वाराच महत्त्वाची भूमिका बजावतो, हे सत्य आहेच.

पुरुषप्रधान संस्कृतीचा उद्धार करणाऱया केवळ हिंदुस्थानातच नव्हे, जगभरातील बहुतेक सर्व देशांमध्ये घरगुती हिंसाचाराच्या घटना घडत असतात. न्यूझीलंडमध्ये नुकताच घरगुती हिंसाचारात बळी गेलेल्या व्यक्तीसाठी १० दिवसांची पगारी रजा देण्याचा कायदा संमत झाला. हाही विरोधाभासच. आधुनिक आणि विकसित अशा पाश्चात्य देशांमध्ये न्यूझीलंड हा देश कौटुंबिक हिंसाचार करण्यात आघाडीवर आहे. तिथे प्रत्येक चौथ्या मिनिटाला घरगुती हिंसाचाराची तक्रार पोलिसात दाखल होते. मायेची ऊब असणाऱया घरातच जर हिंसेचा आगडोंब उसळत असेल तर ती आग विझवायला घराच्या चौकटीबाहेरचे उपाय करावेच लागतात.

न्यूझीलंडमध्ये झालेला हा नवा कायदा म्हणजे बाईच्या लढाईचा मोठा विजय आहे, असे (दुर्दैवाने!) मानले जात आहे. कुटुंबातल्या हिंसाचाराचे भयानक स्वरूप पाहता हा कायदा करावा लागल्याचे त्यात नमूद केले आहे. हिंसा किंवा जबरी मारहाण झाल्यानंतर आपल्या सहचऱयाला (नवरा/मित्र) सोडून नवे घर घेणे, गंभीर मारहाण झाली असल्यास औषधोपचार घेणे, विश्रांती घेणे आणि मुलांचे तनामनाचे आरोग्य सांभाळत नवा दिनक्रम सुरू करणे या सगळ्या गोष्टींसाठी ही १० दिवसांची पगारी रजा देण्याची तरतूद आहे. म्हणजे ती स्त्राr ज्या संस्थेत काम करत असेल, तिथल्या अधिकारी व्यक्ती, सहकारीसुद्धा सजग होत तिला मदतीचा हात देऊ शकतील. तिचे काम १० दिवसांसाठी वाटून घेतील. घरातल्या हिंसेला घरात डांबण्यापेक्षा तिला मोकळ्या वातावरणात आणल्याने दुःखाचा निचराही वेगाने होऊ शकेल. हिंसाचाराला बळी पडलेल्या स्त्रियांना नवे काम शोधण्याचीही आवश्यकता भासू शकते. त्यांना लघु वा मध्यम उद्योगांमध्ये सामावून घेणे हेही महत्त्वाचे ठरते.

घरगुती हिंसाचारात बळी पडलेल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्या देशाला प्रचंड पैसा मोजावा लागतो. अशाच प्रकारचा कायदा फिलिपिन्स, कॅनडा इत्यादी देशांमध्येही झालेला आहे. कुठल्याही अत्याचारात जो बळी जातो, तो काही अपराधी नसतो. त्यामुळे अशा व्यक्तीला मदत करणे ही नातलगांची, हितचिंतक मित्रांची, समाजाची व कायद्याची जबाबदारी आहे.

सर्वांत महत्त्वाचे आहे ते अशा हिंसाचाराच्या मूळ कारणांचा नायनाट करणे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्राrला दुय्यम, कमकुवत, क्षुद्र समजण्याची प्रवृत्ती दिसते. तिची तुलनेने कमी असणारी शारीरिक क्षमता, तिला मादी नि माता करणारे तिचे शरीर- विशेषतः गर्भाशय व त्याभोवती निर्माण होणारी नात्यांची नि सामाजिक रचितांची गुंतागुंत या सगळ्याकडे मानव्याच्या स्वच्छ दृष्टीने पाहता यायला हवे. त्यासाठी ‘माणसा’ च्या विवेकाचा विकास व्हायला हवा. त्याच्यामध्ये स्वातंत्र्य-समानतेची, सह+अनुभूती- सहिष्णूतेची, करुणा-औदार्याची मूल्ये रुजायला हवीत. सहजीवन म्हणजे ‘अर्धनारीनटेश्वर’ साकार होणे. नारी आणि नटेश्वर यांनी परस्परपूरक होणे म्हणजे मीलनाची पूजा. भारत, न्यूझिलंडसह समस्त देशांतल्या घरांमधल्या तमाम हिंसाप्रवण स्त्राr-पुरुषांमध्ये ‘अहिंसा परमो धर्मः’ ही मंत्राक्षरे जेव्हा रोमरोमी भिनतील, तो सुदिन.

[email protected]