मृत्यूचे भाकीत गुगलवर!

>> अभय मोकाशी

गुगलद्वारा रुग्णाच्या मृत्यूचा केला जाणारा अंदाज ज्योतिषावर आधारित नसून वैद्यकीय शास्त्रावर आधारित आहे. हे गुगलच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशल इंटलीजन्स) अंतर्गत संशोधनातून शक्य आहे. जे माणसाला शक्य नाही ते गुगलने करून दाखविले. हे कार्य गुगलच्या मेडिकल ब्रेन या विभागाने केले आहे. एका रुग्णाचा लवकरच मृत्यू हा निष्कर्ष गुगलकडे असलेल्या २ लाख १६ हजार २२१ रुग्णांचे वैद्यकीय रिपोर्टस् आणि त्यातील ४६ अब्ज प्रकारांची माहिती यावर आधारित होता.

मनुष्याचे जीवनाबद्दलचे एक अजब गणित असते. अनेकांना जगण्याची इच्छा नसते, पण मृत्यूला सामोरे जाण्याचे धाडस देखील नसते.

रुग्णांच्या मनात अनेक प्रश्न येत असतात, जसे आपला रोग बरा होणार का, आपल्याला रुग्णालयात किती दिवस राहावे लागेल, आपण जिवंत स्थितीत घरी जाऊ की मृतावस्थेत आणि आपल्याला झालेल्या रोगामुळे जर मृत्यू येणार असेल तर तो कधी येणार? अशा प्रकारचे प्रश्न रुग्णाच्या आप्तेष्टांच्या मनातदेखील येत असतात आणि अनेक जण त्याच्या उत्तरासाठी ज्योतिषांकडे जातात. रुग्णाच्या रोगाचे निदान करत असताना त्या रोगाची दिशा, म्हणजेच बरा होणार असेल तर किती काळ लागेल, रोग वाढेल का, त्याची गती कशी असेल आणि रोगामुळे जर मृत्यू येणार असेल तर तो केव्हा येईल याचा अंदाज डॉक्टर घेतात ज्योतिषी असो अथवा डॉक्टर, त्यांचा अंदाज चुकू शकतो, मात्र आता गुगलच्या मदतीने रुग्णाचा मृत्यू केव्हा होईल हे सांगणे आता शक्य होईल. हा अंदाज सध्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या बाबतीत शक्य आहे आणि या भाकिताचे यश ९५ टक्के असेल, असा दावा गुगलने केला आहे.

गुगलद्वारा रुग्णाच्या मृत्यूचा केला जाणारा अंदाज ज्योतिषावर आधारित नसून वैद्यकीय शास्त्रावर आधारित आहे. हे गुगलच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशल इंटलीजन्स) अंतर्गत संशोधनातून शक्य आहे.

डॉक्टर एखाद्या रोगाचे निदान करत असताना त्या मागे त्यांचा अभ्यास आणि अनुभव कामास येतो. ज्या डॉक्टरांकडे अधिक माहिती अथवा अनुभव असतो त्या डॉक्टरांनी केलेले निदान अचूकतेच्या जवळ जाते.
आपल्याकडील माहिती वाढविण्यासाठी डॉक्टरांना अनेक रुग्णांच्या रोगाची लक्षणे, विविध चाचण्यांचे रिपोर्टस्, दिलेल्या औषधांचा रोगावर झालेला प्रभाव या सर्वाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. एकदा ही माहिती मिळाली की त्याचे विश्लेषण करून डॉक्टर आपले ज्ञान वाढवितात, मात्र असे किती रुग्णांचा अभ्यास करणे शक्य आहे हा एक मोठा प्रश्न आहे.

डॉक्टरांचे हे काम आता गुगल करत आहे. एका रुग्णाच्या आजाराचे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून विश्लेषण करण्यात आले. त्या आधारे कर्करोग झालेल्या त्या महिलेचा मृत्यू लवकरच होणार असा अंदाज वर्तविला गेला आणि काही दिवसांतच त्या रुग्णाचा रुग्णालयातच मृत्यू झाला. ही माहिती गुगलने नुकतीच जाहीर केली आहे.

जे माणसाला शक्य नाही ते गुगलने करून दाखविले. हे कार्य गुगलच्या मेडिकल ब्रेन या विभागाने केले आहे. या रुग्णाचा लवकरच मृत्यू हा निष्कर्ष गुगलकडे असलेल्या २ लाख १६ हजार २२१ रुग्णांचे वैद्यकीय रिपोर्टस् आणि त्यातील ४६ अब्ज प्रकारांची माहिती यावर आधारित होता. इतक्या माहितीचा अभ्यास कोणत्याही व्यक्तीला अथवा व्यक्तींना करणे शक्य नाही, मात्र हे अंदाज अनेक संगणकांचे जाळे वापरून करण्यात आले आहे. अशा माहितीच्या आधारे गुगल ब्रेन रुग्णाबद्दल अंदाज काढू शकतात की त्याला रुग्णालयात किती दिवस राहावे लागेल आणि पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागेल की नाही.

या संशोधनात युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को; युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो आणि स्टॅनफोर्ड मेडिसिन या तीन शैक्षणिक संस्थांच्या प्राध्यापकांच्या सहभागाने एक संगणकी पद्धत बनविण्यात आली ज्याद्वारे रुग्णांचे वैद्यकीय रेकॉर्ड, त्यांचे भौगोलिक ठिकाण, या पूर्वीचे वैद्यकीय निदान आणि त्यावर करण्यात आलेले उपाय, रुग्णाच्या हृदयाच्या ठोक्यांची आणि श्वासोच्छ्वासाची गती, विविध चाचण्यांचे रिपोर्टस्, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी रुग्णाच्या संबंधात विविध डॉक्टरांनी केलेल्या नोंदी यास सर्वांचे विश्लेषण करण्यात आले. या विश्लेषणाच्या माहितीचा आधार घेऊन कर्करोगाने त्रस्त असलेल्या त्या महिलेचा मृत्यू होणार असा निष्कर्ष काढण्यात आला होता.

गुगल मेडिकल ब्रेन हा गुगल ब्रेनचा एक विभाग आहे. गुगल ब्रेनची स्थापना २०११साली झाली, जेव्हा संशोधक जेफ डीन, ग्रेग कोराडो आणि अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक अन्ड यान-टाक कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधनासाठी एकत्र आले त्यावेळी गुगल ब्रेनचे नाव गुगल एक्स होते.

गुगलने २०१२ साली १६ हजार संगणकांचे जाळे बनवून त्यांचा कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी वापर केला. त्या संशोधकांचा उद्देश होता की मानवी मेंदूप्रमाणे या संगणकांनी कार्य करावे. या संगणकांमध्ये यूटय़ुबवरून घेतलेली एक कोटी छायाचित्रे टाकण्यात आली आणि संगणकांना छायाचित्रातील मांजर शोधण्याचे काम देण्यात आले होते आणि त्या संगणकांच्या जाळ्याने मांजर अचूक शोधले.

अशा प्रकारे लाखो रुग्णांच्या माहितीच्या आधारे गुगल सांगू शकते की दाखल केल्यापासून २४ तासांत कोणत्या रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

या संशोधनाबाबत युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्कोने म्हटले आहे की रुग्णाच्या बाबतीत कोणत्या औषधांचा आणि प्रक्रियांचा उपयोग होतो आणि कशाचा उपयोग होत नाही, तसेच रुग्णांना सहाय्य करण्यासाठी, त्याचा रोग कोणत्या दिशेने जाईल याचे भाकीत करणे महत्त्वाचे आहे.

अशा प्रकारचे भाकीत केल्याने रुग्णाची काळजी घेणे सोयीचे होईल, त्यामुळे जगातील रुग्णसेवा सुरक्षित होईल, असा दावा युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोने केला आहे.

‘मशिनच्या (संगणकाच्या) आधारे उपलब्ध माहिती योग्यरीत्या वापरून योग्य रुग्णसेवा करता येईल याबद्दल आम्ही उत्साहित आहोत,’ असे मत स्टॅनफोर्ड मेडिसिनने मांडले.

इंग्लंडमध्ये रुग्ण, परिचारिका आणि डॉक्टर यांच्या सेवेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ‘डीप माइंड हेल्थ’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था स्थापन करण्यामागचे कारण हे देण्यात आले होते की उत्तम आरोग्यसेवा मिळत असूनदेखील लोकांना टाळता येण्याजोगे रोग होत आहेत आणि दररोज रुग्ण मरत आहेत. जगभरात डॉक्टर आणि परिचारिकांकडे अशी साधने नाहीत ज्याच्या सहाय्याने ते रुग्णाच्या होणाऱया विविध चाचण्यांच्या निकालांचे विश्लेषण ताबडतोब करू शकतील ज्यामुळे रुग्णाला योग्य तज्ञांकडे उपचारासाठी पाठवू शकतील.

डीप माइंडची कार्यपद्धत वेगळी आहे. ही संस्था डॉक्टर आणि रुग्ण यांच्या गरजा आधी समजून घेते आणि त्यानुसार माहिती तंत्रज्ञानाचा वापर करते. डीप माइंडने स्ट्रीम्स नावाचे एक अॅप बनविले आहे, जे लंडन येथील रॉयल फ्री हॉस्पिटल २०१७ सालापासून वापरत आहे. रुग्णाची तब्येत खालावली तर त्याची माहिती त्या रुग्णावर उपचार करणाऱया डॉक्टरांना या ऍपद्वारे त्यांच्या मोबाईल फोनवर लगेच मिळते.

रुग्णाच्या विविध चाचण्याचे रिपोर्टदेखील डॉक्टरांना लगेच मोबाईलवर स्ट्रीम्सच्या सहाय्याने मिळतात. उदाहरणार्थ रक्ताची तपासणी केल्यावर त्याचा रिपोर्ट टेक्निशियनकडे जातो, जे ती माहिती परिचारिकेकडे पाठवितात, तिथून तो रिपोर्ट कनिष्ठ डॉक्टरांकडे जातो आणि कनिष्ठ डॉक्टरांकडून तज्ञ डॉक्टरांना पाठविण्यात येतो. तज्ञ डॉक्टर त्या रिपोर्टच्या आधारे ठरवितात. रुग्णाची परिस्थिती गंभीर आहे की नाही. या सर्वात फार वेळ जातो, मात्र स्ट्रीम्सचा वापर केल्यास तो रिपोर्ट चाचणी करणाऱया यंत्रातून थेट तज्ञ डॉक्टरांकडे त्यांच्या मोबाईलवर जातो यामुळे वेळ वाचतो आणि अनेकदा रुग्णाचा जीवदेखील.

या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या देशात मोठय़ा प्रमाणात करण्याची गरज आहे, विशेषतः सार्वजनिक रुग्णालयात आणि ग्रामीण भागातील रुग्णालयात, ज्या ठिकाणी अनुभवी डॉक्टरांचा अभाव असू शकतो, मात्र हे सर्व करत असताना वैद्यकीय सेवा देणाऱया व्यक्तींनी यंत्रासारखे वागू नये, त्यांनी माणुसकी विसरता कामा नये.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)