वेब न्यूज : वायुप्रदूषण रोखणारे टॉवर्स

180

>> स्पायडरमॅन

सध्या जगभरातच वायुप्रदूषण ही सगळ्यात मोठी समस्या बनू पाहते आहे. प्रदूषणामुळे हृदयविकार आणि श्वसनाच्या रोगात प्रचंड वाढ होत असून दरवर्षी जगभरात 7 दशलक्ष लोक यामुळे मृत्यू पावत आहेत. चिंतेची बाब म्हणजे या संख्येत वाढच होताना दिसते आहे. डेलफट युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमधील शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या पेटंट आयन-टेक्नॉलॉजीचा वापर करून वातावरणातील वायू स्वच्छ करणाऱया या टॉवर्सची निर्मिती करण्यात आलेली आहे. या टॉवरची उंची साधारण 7 मीटर आहे. या तंत्रज्ञानाचा वापर मूलतः एमआरएसए बॅक्टेरिया धुळीच्या कणांपासून वेगळा काढण्यासाठी केला गेला. धूळ आणि वायूमध्ये प्रवास करून हा जिवाणू एका माणसापासून दुसऱयापर्यंत पसरतो. या टॉवरमधील ‘एयर आयोनायझर’ प्रणाली या बॅक्टेरियांना पसरण्यापासून प्रतिबंध करते. ईएनएस टेक्नॉलॉजी आणि डेल्फ्ट युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने डच तंत्रज्ञ डॅन रुझगार्ड यांनी मोठय़ा प्रमाणात स्केलेबल असे हे टॉवर्स विकसित केले आहेत ज्यांच्या मदतीने हवेचे प्रदूषण कमी करणे शक्य होणार आहे. मुख्य म्हणजे हे रुझगार्ड टॉवर सध्याच्या प्रचलित अशा डेस्कटॉप एयर प्युरिफायरपेक्षा कमी विजेचा वापर करतात. रुझगार्ड टॉवर हे ओझोनचा वापर न करतादेखील 30,000 क्यूबिक मीटर दूषित हवा प्रतितास साफ करतात आणि सुमारे 1400 वॉटस् विजेचा वापर यासाठी केला जातो. या टॉवरच्या आजूबाजूच्या परिसरातील हवा टॉवर्समध्ये खेचली जाते. त्यानंतर या हवेतील सर्व कणांना विद्युतभारित केले जाते. हे सर्व कण त्यानंतर मोठय़ा कॅलेक्टर प्लेटस् वरती एकत्र केले जातात. या प्लेटस्मध्ये ऑपोझिट अर्थात विरुद्ध विद्युतभर भरलेला असतो. अशा तऱहने शुद्ध करण्यात आलेली हवा पुन्हा टॉवरच्या मागच्या बाजूने मागे वातावरणात सोडली जाते. या टॉवर तंत्रज्ञानाने नुकताच प्रतिष्ठsचा असा ‘German Design Award for Excellent Product Design’ हा ‘German Ministry for Economics and Technology’ चा पुरस्कार मिळवला आहे. सध्या चायनाच्या बीजिंगमध्ये या टॉवरच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या