ज्ञानगंगेच्या तीरावर…

फाईल फोटो

>> अनंत सोनवणे, [email protected]

ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य हे शुष्क पानगळीचं जंगल आहे. जंगलाजवळून ज्ञानगंगा नदी वाहते. त्यामुळे विविध पशु-पक्ष्यांचं हे आश्रयस्थान बनलं आहे.

विदर्भाला वन्यजीवप्रेमींची पंढरी मानलं जातं. देशातली अत्यंत महत्त्वाची अभयारण्यं तसंच व्याघ्र प्रकल्प विदर्भात आहेत. मात्र याच विदर्भात कुणाला फारशी माहीत नसलेली इतरही अनेक जंगलं आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य. बुलढाण्यापासून आठ किलोमीटरवर तर खामगावपासून २० किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे. या जंगलाचं एकूण क्षेत्र कमी असलं तरी इथली जैवविविधता अत्यंत वैशिष्टय़पूर्ण आहे. त्यामुळेच ९ मे १९९७ रोजी या परिसराला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.

ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य हे शुष्क पानगळीचं जंगल आहे. जंगलाजवळून ज्ञानगंगा नदी वाहते. तसंच अभयारण्याच्या आत दोन तलाव आहेत. त्यामुळे विविध पशु-पक्ष्यांचं हे आश्रयस्थान बनलं आहे. धरण परिसर, लाखाचा झिरा, नळकुंड, ब्रिटिशकालीन तलाव ही ठिकाणं अभयारण्यात येणाऱया पर्यटकांच्या विशेष पसंतीची. वन विभागानं इथं निसर्ग परिचय केंद्रही उभारलं आहे. त्याशिवाय इथलं प्रमुख आकर्षण स्थळ म्हणजे नक्षत्र वन.
बोथा शिवारात नक्षत्रानुसार वृक्ष लागवड करून वन विभागानं हे नक्षत्र वन निर्माण केलंय. प्रत्येक झाडावर त्याचं नाव व वैशिष्टय़ दर्शवणारी पाटी लावण्यात आली आहे.

अर्थात हाडाच्या वन्यजीवप्रेमीला या लागवड केलेल्या वृक्षराजीपेक्षा नैसर्गिक झाडाझुडुपांमध्ये अधिक रस असतो. ज्ञानगंगाच्या जंगलात धावडा, ऐन, साग, मोह, चिंच, आवळा, आंबा, वड, पिंपळ, बेहडा, अंजन, बेल, बहावा, पळस, पांगारा, निवस, भेरा, चारोळी, सालाई इत्यादी प्रकारचे वृक्ष जोमाने वाढलेले दिसतात. इथे निरगुडी, बोराटी, भराडी यासारख्या झुडूप प्रजातीही आहेत. याशिवाय बांबूबरोबरच तिखाडी, कुसळी, पवन्या, कुंदासारख्या गवताच्या प्रजातीही पाहायला मिळतात.

ज्ञानगंगा अभयारण्यात वाघाचा वावर असल्याचं बोललं जातं. मात्र पाणवठय़ांवरच्या वन्यप्राणी गणनेत इथं बिबटय़ाचं अस्तित्व अत्यंत ठळकपणे सिद्ध झालं असून दिवसाही त्याचं दर्शन होतं. याशिवाय इथं चितळं, सांबर, नीलगाय, चौशिंगा, झपरे अस्वल, रानडुक्कर, रानमांजर, उदमांजर, मुंगूस, ससा, कोल्हा, लांडगा, रानकुत्रे, तरस, साळींदर, खवले मांजर इत्यादी वन्यप्राणीही आळतात.

या अभयारण्यात पक्ष्यांच्या १६५ पेक्षा जास्त प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. त्यात स्थानिक तसंच स्थलांतरीत पक्ष्यांचा समावेश आहे. इथं सोनपाठी व मराठा सुतार, मोठा तांबट, राखी धनेश, मोर, तित्तर, टकाचोर, रानकोंबडा, लावा, रंगीत भटतित्तर, भारद्वाज, महाभृंगराज, पोपट, नकल्या खाटीक, उघडचोच बलाक, रंगीत करकोचा, टिबुकली, पावशा, चातक, परटेरी वटवटय़ा, पाणथळ पिपीट, लालमुखी टिटवी, सर्पगरुड, शिक्रा, बहिरी ससाणा, लाल मुनिया इत्यादी विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात.

ज्ञानगंगा अभयारण्याला सर्वात मोठा धोका आहे तो वणव्याचा. गेल्या काही महिन्यांमध्ये अभयारण्याच्या परिसरात तब्बल १५ वेळा वणवा पेटला आणि त्यात अनेक हेक्टर जंगल जळून गेलं. वनसंपदेचं प्रचंड नुकसान झालं. हे वणवे थांबणं गरजेचं आहे. त्यासाठी वन विभागाने प्रामाणिक व अधिक प्रयत्न करायला हवेत. तसंच स्थानिक नागरिक व पर्यटकांनीही जंगलाचे नियम पाळून वन विभागाच्या प्रयत्नांना साथ द्यायला हवी. तरच हे वैशिष्टय़पूर्ण समृद्ध जंगल टिकून राहील.

ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य
प्रमुख आकर्षण – बिबळय़ा व अस्वल
जिल्हा – बुलढाणा
राज्य – महाराष्ट्र
क्षेत्रफळ – २०५ चौ. कि. मी.
निर्मिती – १९९७
जवळचे रेल्वे स्थानक – खामगाव (२० कि. मी.)
जवळचा विमानतळ – संभाजीनगर (१९० कि. मी.)

निवास व्यवस्था – खामगावात खासगी हॉटेल्स.
सर्वाधिक योग्य हंगाम
डिसेंबर ते जून.
सुट्टीचा काळ – नाही.
साप्ताहिक सुट्टीचा काळ – नाही.