मुंबईची ओळख ठरलेला वारसा

18

>> अरुण मळेकर

18 एप्रिल 2019 रोजी जागतिक वारसा दिन आहे. त्याला अनुसरून मुंबई शहराची ओळख ठरलेल्या फ्लोरा फाऊंटन या शिल्पाकृतीसंबंधी हा लेख. या लेखातून फ्लोरा फाऊंटन निर्मितीचा इतिहास, त्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक शिल्पवैभव आणि आता अनेक स्थित्यंतरातून त्याला लाभलेला नवीन चेहरा याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई महानगरीतील अनेक जुन्या इमारती, शिल्पाकृतीच्या अस्तित्वाने त्यांचा परिसर ओळखला जातोय. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ब्रिटिश अमदानीतील अनेक रस्ते, इमारतींचे जरी उच्चाटन झाले तरी पूर्वीच्याच नावांनी तो भाग आजही ओळखला जातोय. असल्या देखण्या इमारतींसह काही शिल्पाकृतींची दक्षिण मुंबई विभागात रेलचेल आहे. त्यातील फ्लोरा फाऊंटन या शिल्पाकृतीचे समाजमनातील स्थान आजही गेली दीडशे वर्षे कायम आहे.

सुमारे साठ वर्षांपूर्वी जरी त्याचे ‘हुतात्मा चौक’ असे नामकरण झाले असले तरी हे नाव रूढ व्हायला अजून समाजमनाची काही तयारी नाही. थोडक्यात म्हणजे रस्ते, शिल्पाकृती, बगिचे, जुन्या इमारती यांचे स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे सरकारदरबारी जरी नामांतर झाले तरी त्यांच्या मूळ नावासह त्यांची प्रतिमा पुसली जात नाही.

150 वर्षांपेक्षा अधिक जुन्या अशा या फ्लोरा फाऊंटनच्या निर्मितीमागे ब्रिटिशांच्या कल्पकतेसह, संकल्पना आणि त्या कलाकृतीच्या निर्मितीची धारणा काय होती हे स्पष्ट होतेय. आपल्या मायभूमीपासून हजारो मैल दूरवर वेगळय़ा संस्कृतीच्या देशात वावरताना त्या ब्रिटिश आणि त्यांच्या परिवाराला आपल्या मातृभूमीची सतत याद येणं तसे स्वाभाविक होते. याच भावनेने मुंबईतील बऱयाच वास्तू, शिल्पाकृतींची निर्मिती झाली. फ्लोरा फाऊंटनची निर्मिती करतानाही इंग्लंडच्या प्रख्यात, सुशोभित ‘पिकॅडली’ सर्कलप्रमाणे त्याची संरचना असावी की, जेणेकरून ब्रिटिश नागरिक आणि त्यांच्या परिवाराला विरंगुळय़ाचे ते एक आकर्षक स्थळ ठरावे. ही भावना निश्चितच त्यामागे होती…

इ.स. 1864 मध्ये हे आकर्षक शिल्प उभारण्यासाठी कर्सेटजी फर्दुमजी पारेख या दानशूर माणसाने आवश्यक ते अर्थसहाय्य देणगी स्वरूपात उपलब्ध करून दिल्यावर ‘ऍग्रो हार्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया’ या प्रख्यात वास्तू विशारद संस्थेने हे शिल्प उभारण्याचे आव्हान स्वीकारून ब्रिटिशांची इच्छा पूर्ण केलेली.
या अजरामर शिल्पाकृतीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी सतत पाण्याचा सुखद वर्षाव करण्यासाठी नेत्रदीपक कारंज्यांची निर्मितीही झाली. नियोजनपूर्वक मुंबई नगरी वसवणाऱया कलाप्रेमी गव्हर्नर सर बार्टले फ्रियर यांच्या स्मरणार्थ हे कारंजे बांधले गेले. त्या काळात निर्माण झालेले हे कारंजे म्हणजे जलव्यवस्थापनाबरोबर जलअभियांत्रिकी तंत्रज्ञानाचे एक आश्चर्यच आहे. प्रारंभीच्या काळात फ्रियर फाऊंटन या नावानेच हे कारंजे ओळखले जात होते.

सुमारे 25 फूट उंचीच्या या शिल्पाकृतीच्या सर्वोच्च भागी असलेल्या ‘फ्लोरा’ या पुष्पदेवतेच्या नावाने ते नंतर ‘फ्लोरा फाऊंटन’ या नावे ओळखले जाई. या कारंजीयुक्त शिल्पाकृतीचा आराखडा ब्रिटिश वास्तुरचनाकार आर. नॉर्मन शॉ यांनी तयार केला असून त्याला साजेसा सौंदर्याचा चेहरा ‘जेम्स फर्सीद’ यांनी कल्पकतेने दिलाय. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर 1961 साली या शिल्पाकृतीशेजारी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांचे स्मारक उभारल्यावर या परिसराचे ‘हुतात्मा चौक’ असे नामकरण करण्यात आले.

फ्लोरा फाऊंटन शिल्पावर गेल्या दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळ नैसर्गिक आणि मानवनिर्मित अनेक स्थित्यंतरांमुळे त्याची अक्षरशः रया जात चालली होती. वारसा वास्तू जतन उपक्रमांतर्गत महापालिका अखत्यारीत याच्या देखभालीचे काम हाती घेऊन हे शिल्पवैभव जतन करण्याचा आव्हानात्मक प्रयत्न केला जातोय. इंग्लंडमधील ‘पोर्टलॅण्ड’ स्टोन या खास दगडातून हे शिल्प साकारले आहे. त्यातील सौंदर्याविष्कार दाखवणाऱया मूर्तींचे अवयव तुटल्याने ते तर केविलवाणे भासत होते. त्याला पूर्ववत करण्यासाठी पोर्टलॅण्ड स्टोनशी मिळताजुळता ‘पोरबंदर’ स्टोनचा वापर करून ही शिल्पाकृती पूर्ववत करण्यात आली..

फ्लोरा फाऊंटनच्या सभोवताली गोलाकृती स्वरूपाच्या जागी पर्यटक, दर्शकांना निवांतपणे बसणे आता शक्य होणार आहे. मूळ स्वरूप देणे हे वास्तुरचनाकारांना एक खडतर आव्हानच होते. तीन टप्प्यांतील या आकर्षक कलाकृतीतील दोन्ही बाजूकडून सिंह आणि डॉल्फिन यांच्या शिल्पांतून सतत पाण्याचा सुखद वर्षाव व्हायचा. मात्र 2007 पासून त्यात बिघाड होऊन प्रवाह बंद झाला होता. हा प्रवाह पूर्ववत करण्यासाठी आपल्या जल अभियंत्यांना बराच काळ शोध घ्यावा लागला. दगडी बांधकामाच्या अंतर्गत कन्सील केलेल्या या जलवाहिन्यांचा शोध घ्यायलाच तीन महिने लागले. आता हे आव्हानात्मक काम दोन टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यासपूर्वक वापर करून या शिल्पाचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी मूळ रंगांचे थर हटवण्यासाठी उष्ण पाण्याचे फवारे मारावे लागलेत. येथे जे खोदकाम करावे लागले तेव्हा भूमिगत अनेक वर्षांचे इतिहासाचे साक्षीदार आढळले. इ. स. 1964 साली बंद झालेल्या एकेकाळची मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या ट्रामगाडीचे लोखंडी रूळ सापडले. त्याचे ऐतिहासिक मोल ध्यानी घेऊन वारसा जतन विभागाने त्याचा योग्य उपयोग करण्याचे योजले आहे.

अनेक शतकांचा ऐतिहासिक – सांस्कृतिक वारसा लाभलेल्या मुंबई महानगरातील अनेक वारसा वास्तूंची आजची स्थिती खूपच उपेक्षित, केविलवाणी आहे. त्यांचे संवर्धन करण्याच्या प्रक्रियेला फ्लोरा फाऊंटनपासून प्रारंभ होत आहे असे समजायला हरकत नसावी, परंतु हे साध्य करण्यासाठी लोकभावनेचा आदर करून सकारात्मक दृष्टीची निश्चितच आवश्यकता आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या