जलसाक्षरतेची दिंडी चालली…

1

>> अरुणा सबाने

2002 पासून सुरू झालेल्या जलसाहित्य संमेलनाच्या ‘दिंडी’ने एक वातावरण नक्कीच निर्माण केले आहे. ही एक चळवळच झाली आहे. या चळवळीसोबत खूप लोक जोडले गेलेत आणि आमची ही दिंडी आता अशीच सुरू राहणार आहे. त्यातील लोकसहभागही वाढवणार आहोत. जलसाक्षरतेचे काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत साहित्यिकांमार्फत पोहोचवणार आहोत. नागपूर येथील महिला पाणी मंच आणि ‘आकांक्षा’ मासिक यांच्या सहकार्याने 20- 21 ऑक्टोबर रोजी नागपुरात होणाऱया सातव्या अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनातून याची प्रचीती येईल याविषयी मला खात्री आहे.

दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न जटील होत आहे. तरीही आमचा समाज अजूनही जलसाक्षर झालेला नाही. तो जलनिरक्षरच आहे. ‘पाणी’ हा लहानसा शब्द अवघं विश्व व्यापून टाकणारा, जगातल्या प्रत्येक घटकाशी बांधून ठेवणारा; पण गावातल्याच नव्हे तर शहरातल्या स्त्राrलाही पाण्यासाठी तीन-तीन, चार-चार कि.मी. भटकंती करावी लागते. तरी पाण्याचं महत्त्व अद्यापही सामान्यच काय, सुशिक्षित माणसाच्या लक्षात येत नाही. मात्र मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांना घसा फोडून पाण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यापेक्षा लेखक म्हणून माध्यमांद्वारे जर पाण्याचे महत्त्व पटवून दिले तर ते त्यांच्या पटकन लक्षात येते. कवितेतून, पथनाटय़ातून हा प्रश्न त्यांच्या हृदयाला जाऊन भिडतो.

या प्रश्नावर जगभर विचारमंथन सुरूच असते. त्यासाठी ‘जागतिक जल परिषद’ व जागतिक जलसहभागिता या दोन स्वयंसेवी संस्था United Nations Organisation यांच्या मदतीने कार्यरत आहेत व या दोन्ही संस्थानिर्मितीत ज्येष्ठ जलतज्ञ माधवराव चितळे यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांच्यासोबत महाराष्ट्रात अनेक संस्था कार्यरत आहेत. नागपूरची महिला पाणी मंच ही आमची संस्थादेखील याच कार्यात मग्न आहे. महिला पाणी मंच गेल्या अनेक वर्षांपासून जलप्रबोधनाचे कार्य करते आहे. पाण्यासंदर्भात काम करत असताना मला वारंवार हा प्रश्न छळत होता की, कार्यकर्ते आणि शासकीय अधिकारी यांच्याशिवाय या विषयाला कुणाला जोडून घ्यावं?

नेपाळला South Asia Water Conference मध्ये पेपर रीडिंगसाठी मी गेले होते. त्या ठिकाणी अचानक माझ्या डोक्यात आलं की, आपण जलसाहित्य संमेलन घ्यायचं. मी जे शोधत होते ते मला सापडलं. या प्रश्नाशी आपण साहित्यिकांना जोडावं. मी स्वतः लेखिका आहे. मला प्रश्न दिसतात म्हणून मी लिहिते. मग आपण साहित्यिकांचाच यासाठी उपयोग का करून घेऊ नये? लगेच मी माधवराव चितळे सरांना माझी कल्पना बोलून दाखविली. त्यांनी ती उचलून धरली आणि मी नागपुरात येताच कामाला लागले. या कामात सर्वप्रथम मला पाठिंबा दिला तो माझे मित्र पाटबंधारे विभागाचे त्यावेळचे सचिव अशोक जाधव यांनी. दुर्दैवाने आज ते हयात नाहीत.

जलसाहित्य संमेलन घेतेय हा विचार मी ज्यांच्या ज्यांच्या जवळ बोलून दाखविला, त्या प्रत्येकानं मला प्रश्न केला. म्हणजे काय? प्रत्येक जण माझ्याकडे प्रश्नांकित नजरेनं बघत होते. काही लोक मला विचारायचे, “अरुणाताई, तुमची संकल्पना स्पष्ट आहे ना?’’ मात्र काहींनी मनापासून माझं अभिनंदन केलं. कौतुक केलं. त्यांच्या कौतुकाच्या थापेमुळेच मी साऱयांना उत्तरं देऊ शकत होते. जलसाहित्य संमेलनाद्वारे मला पाणीप्रश्न घराघरात पोचवायचा होता. पण तो प्रश्न म्हणून नव्हे, तर लालित्यपूर्णपणे, माध्यमांद्वारे. कोणतीही नवीन गोष्ट आपण करू म्हणताच माध्यमांचं लक्ष आपल्याकडे जातंच. दूरदर्शन, आकाशवाणी, वर्तमानपत्रं. साऱयांनी पहिल्या अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनाची दखल घेतली, त्याला प्रचंड प्रतिसाद दिला. कार्यक्रमाला घराघरात पोहोचविलं. माध्यमांद्वारे जलसाहित्य माणसाच्या काळजापर्यंत पोहोचलं. आम्ही हिंदुस्थानातल्या साऱया जलदूतांनी 8-9 ऑगस्ट 2002ला नागपुरात पाण्यासंदर्भात नवीन कल्पना, नवीन विचार सांगितला. त्यामुळे सामान्य माणूस साहित्यदृष्टय़ा जागृत झाला. याचाच अर्थ जलसाहित्य संमेलनाने सामान्य माणसाची सृजनशक्ती जागी करण्याचं काम केलं. ज्यांनी ज्यांनी मला वेडय़ात काढलं होतं, त्या साऱयांना आम्ही 8-9 ऑगस्ट 2002 ला कृतीनं उत्तर दिलं.

आज सृजनशक्ती लोप पावली आहे. आज ‘युज ऍण्ड थ्रो’चा जमाना आहे. तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे दुरुस्ती नाहीच. म्हणूनच पाण्यासारख्या गोष्टींकडेही आपण तांत्रिकदृष्टय़ाच पाहतो. ही केवळ तांत्रिकता नष्ट व्हावी आणि मंगेश पाडगावकर, ना. धों. महानोर, बा. भ. बोरकर, ग. दि. माडगूळकर तर थेट आजच्या सदानंद देशमुखांपर्यंत या साऱया कवी-लेखकांच्या काव्यदृष्टीनं लोकांनी पाण्याकडे बघावं, ते समजून घ्यावं, त्याचा योग्य तोच विनियोग करावा, पाण्याची बचत प्रत्येकानं करावी, आपली जबाबदारी प्रत्येकानं समजून घ्यावी म्हणून ही आमची धडपड.

जलसाहित्यातूनून जलजागृती करणे हाच आमच्या महिला पाणी मंचचा हेतू आहे. जलसौंदर्य, जलसामर्थ्य, जलविनियोग यांचे दर्शन घडविणारे साहित्य म्हणजे जलसाहित्य. साऱयांनाच नवी असलेली ही संकल्पना आता हळूहळू रुजू पाहते आहे. नवीन संकल्पना घेऊन आमची पंढरीची वारी मोजक्याच मावळ्यांनिशी अनवाणी पायांनी 2002 मध्ये निघाली होती. पुढे ती नागपुरातून पुणेमार्गे कोकण, नाशिक, नंतर जळगाव, नांदेड अशी फिरत फिरत पुनश्च नागपुरात दाखल झाली आहे आणि पुढल्या वर्षी तर चक्क तिला दुबईचं निमंत्रण येऊन पोहोचलं आहे. मी सुरू केलेलं हे छोटंसं काम; पण त्याची एवढी दखल घ्यायला लावेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण माध्यमांद्वारे हे काम एवढं पसरलं की, 2003 च्या तिसऱया जागतिक पाणी परिषदेसाठी जपानने मला खास निमंत्रण देऊन बोलावलं आणि मला 25 मिनिटं त्या स्टेजवरून बोलण्याची संधी दिली. पुढे मी स्वीडन, सिंगापूरच्याही कॉन्फरन्समध्ये सामील झाले.

महिला पाणी मंच फक्त संमेलनं घेत नाही, तर पाणी बचतीचे अनेक उपक्रम राबविते. घरकाम करणाऱया स्त्रियांची कार्यशाळा घेतो. रोज सकाळी उठून एक-एक तास भटकतो. पाणी वाया घालविणाऱया लोकांना शहाणं करण्याचा प्रयत्न करतो. पाण्याची नासाडी करणाऱयांचं शूटिंग करतो. पाणी प्रश्नावर काम करताना अनेक अडचणी येतात. कुणी म्हणतं, “तुमच्या काय बापाचं जातं, आमच्याकडे पाणी भरपूर आहे.’’ कुणी म्हणतं, ‘‘तुम्हाला काय कामधंदे नाहीत काय? आल्या सकाळी सकाळी आम्हाला शहाणपणा शिकवायला. घरात पोरंबाळं नाहीत काय?’’ मात्र हे तर चालणारच. अडथळे येतात म्हणून आपले काम आपण का थांबवायचे? ते आम्ही सुरूच ठेवले आहे.

2002 पासून सुरू झालेल्या जलसाहित्य संमेलनाच्या ‘दिंडी’ने एक वातावरण नक्कीच निर्माण केले आहे. ही एक चळवळच झाली आहे. या चळवळीसोबत खूप लोक जोडले गेलेत आणि आमची ही दिंडी आता अशीच सुरू राहणार आहे. त्यातील लोकसहभागही वाढवणार आहोत. जलसाक्षरतेचे काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत साहित्यिकांमार्फत पोहोचवणार आहोत. 20- 21 ऑक्टोबर रोजी होणाऱया सातव्या अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनातून याची प्रचिती येईल याविषयी मला खात्री आहे.

(आयोजक, सातवे अखिल भारतीय जलसाहित्य संमेलन)

[email protected]